BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ मार्च, २०२२

सुपारीच्या छोट्या खांडाने घेतला तरुणाचा जीव !

 



औरंगाबाद : गुटख्यातील सुपारीच्या एका छोट्या खांडाने एका तरुणाचा जीव घेतला असून काही कळायच्या आधीच या तरुणाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.  (Betel nut stuck in throat) 



व्यसन कुठलंही असेल तरी ते वाईट असतं आणि हे सगळ्यांना माहितही असतं तरीही वेगवेगळ्या व्यसनाच्या आहारी (Victim of addiction) गेलेले लोक आजूबाजूला पाहायला मिळत असतात. गेल्या काही वर्षापासून तर शाळा महाविद्यालयात शिकणारी तरुण मुले आणि कित्येकदा लहान मुले देखील व्यसनात गुरफटलेली दिसतात. गुटखा, मावा खाणारे तर अगणित दिसतात आणि खेळात पैजाही गुटक्याच्या पुड्या विचारात घेतल्या जातात. गुटखा विकण्यास कायद्याने मनाई असली तरी सगळीकडे आणि अत्यंत महागड्या दरात गुटखा विकला जात असल्याचेही जागोजागी दिसत असते.  


अशाच गुटख्याच्या नादात एका तरुणाने आपला जीव गमावला आहे. गुटख्याची पुडी तोंडात सोडली आणि त्याला ठसका लागला. रेल्वे स्टेशन परिसरात राहणारा ३७ वर्षे वयाचा गणेश जगन्नाथ दास हा राहुल सहुजी यांच्याकडे कामाला होता. गेल्या वीस वर्षांपासून तो त्यांच्याकडे काम करीत होता,  राहुल सहुजी यांच्या घरी टीव्ही डिश बसविण्याचे काम करीत असताना त्याला गुटखा खायची तलफ झाली. त्याने गुटखा तोंडात सोडताच त्याला जोराचा ठसका लागला आणि त्याच क्षणी तो तेथेच बेशुद्ध पडला. अचानक बेशुद्ध पडल्याने सगळेच गोंधळून गेले पण नेमके काय झाले हे कुणाच्याही लक्षात आले नाही. 

मृत्यूबाबत शंका !

काम करता करता आणि प्रकृती व्यवस्थित असताना गणेश बेशुध्दावस्थेत गेल्याने सगळेच गोंधळून गेले होते. गणेशची अवस्था पाहून त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरनी तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाला असल्याचे दिसून आले. काम करता करता अचानक मृत्यू आल्याने त्याची माहिती उस्मानपुरा पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी मृत्यूची नोंद केली परंतु मृत्यू कशामुळे आला याचे कारण समोर येणे आवश्यक होते. ठसका लागला आणि मृत्यू झाला ही गोष्ट कुणाला पटणारी नव्हती, पोलिसांना तर शंका येणे स्वाभाविक आहे. 

धक्कादायक कारण !
डॉक्टरांनी गणेशचा मृत्यू झाल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी शव विच्छेदन करण्याचा निर्णय घेतला. शवविच्छेदन करण्यात आले परंतु मृत्यूबाबत कुटुंबाला आणि इतरानाही कोडे पडले होते. दुसऱ्या दिवशी अहवाल प्राप्त झाला आणि मृत्यूचे कारण पाहून प्रत्येकाला धक्का बसला. गणेशच्या घशात गुटख्यातील सुपारीचे छोटे खांड घशात अडकले असल्याचे आढळून आले. गुटखा तोंडात टाकताच त्यातील सुपारीचा तुकडा थेट त्याच्या घशात गेला आणि तो तेथेच अडकला. त्यामुळे त्याचा श्वास कोंडला गेला. यातूनच तो लगेच बेशुद्ध झाला आणि त्याचा जीव देखील गेला. 

धडा घेण्याची वेळ !
तरुण मुलांत गुटखा खाण्याचे प्रमाण अधिक असून यापूर्वीही गुटखा खाल्यानंतर मृत्यू येण्याच्या घटना घडल्या आहेत. महाविद्यालयीन आणि शाळकरी मुलेही गुटख्याचे तोबरे भरलेले चौकाचौकात दिसतात. बंदी असलेला गुटखा विकला जातोच पण तो तोंडात टाकल्याशिवाय बहुसंख्य तरुणांना चैन पडत नाही. किरकोळ तलफ भागविण्यासाठी आपल्याच प्राणाशी खेळायचे की नाही याचा धडा या घटनेने दिला आहे. चिमुटभर गुटखा एका तरुणाच्या जीवावर उठल्याने गुटखा खाणाऱ्याने काही बोध घ्यावा अशीच ही घटना आहे. Gutakha took the life of a young man) 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !