BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ डिसें, २०२२

धावत्या एस टी त चालकाला आली चक्कर आणि --




शोध न्यूज : घाटातील मार्गावर एस टी बस धावत असतानाच चालकाला अचानक चक्कर आली आणि  प्रसंगाचे गांभीर्य ओळखून वाहकाने बसवर ताबा मिळविल्याची अत्यंत थरारक घटना सांगली जिल्ह्यातील भिवघाटात घडली आहे.


बस चालवत असतानाच चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने या बसने रस्त्यावरील सहा जणांना चिरडल्याची घटना अलीकडेच घडली होती. वाहन चालवत असताना चालकाचे लक्ष जरी इतरत्र गेले तरी वाहनाला अपघाताचा धोका असतो. धावत्या वाहनात चालकाला हृदयविकाराचा झटका आला तर त्याचे स्वत:वर नियंत्रण राहू शकत नाही त्यामुळे बसवर नियंत्रण ठेवणे केवळ अशक्य असते. पण अशा वेळी कुणी देवदूत धावून येतो अशाही काही घटना घडल्या आहेत. चालकाला वाहन चालवत असताना हृदयविकाराचा झटका आला असताना पुण्यातील एका प्रवासी महिलेने बसवर नियंत्रण मिळवले आणि या महिलेने ही बस चालवत रुग्णालयापर्यंत आणली होती. हा थरारक प्रसंग राज्यभर गाजला होता आणि या प्रवासी महिलेचे अभिनंदन होत होते. 


सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील भिवघाटाजवळ असाच एक थरारक प्रसंग घडला आणि तेथेही वाहक हाच देवदूत बनला त्यामुळे तीस जणांचे प्राण वाचले आहेत.  राज्य परिवहन महामंडळाची परळी - चिपळूण ही बस प्रवाशांना घेवून भिवघाट मार्गाने विट्याकडे निघाली होती. बस धावत असतानाच अचानक बस चालकाला चक्कर आली आणि बसमधील तीस प्रवाशांचे प्राण धोक्यात आले. याचवेळी चालकाच्या शेजारीच बसलेल्या कंडक्टरने प्रसंगावधान राखत बसचा ताबा मिळवला आणि बसमधील सर्व प्रवाशांचे प्राण बचावले.  चालक, वाहक यांच्यासह बसमध्ये एकूण ३० जण प्रवास करीत होते. अचानक घडलेल्या या घटनेने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला होता पण वाहकाच्या प्रयत्नाने सगळे सुखरूप राहिले आहेत. 


राज्य परिवहन महामंडळाची बस धावत होती आणि बस चालवता चालवता चालकाला अचानक चक्कर आली. त्यांनी ब्रेक दाबत बसवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केलाही परंतु बस तशीच उजव्या बाजूला जाऊ लागली. चालकाने चक्कर आल्याने डोक्याला हात लावलेला होता. योगायोगाने चालकाच्या शेजारीच वाहक संतोष वाडमारे बसलेले होते. एकूण परिस्थिती त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी लगेच स्टेअरिंगवर ताबा मिळवत बस बाजूला वळवली.  चालकाचा पाय ब्रेकवर होताच त्यामुळे बस रस्त्याच्या बाजूला घेवून थांबवता आली. अचानक होत असलेला हा प्रकार पाहून  बसमधील प्रवासी घामाघूम झाले होते. 


प्रवाशांच्या मदतीने चालकास बाजूला घेण्यात आले आणि वाहक वाडमारे हे चालकाच्या जागेवर बसले. तेथून वाहकानेच बस चालवत रूग्णालयापर्यंत आणली आणि चालकाला रुग्णालयात दाखल केले. दरम्यान बेशुद्ध पडलेले चालक शुद्धीवर आले असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. (The driver got dizzy while running ST) कठीण काळात वाहकाने क्षणाचाही विलंब न लावता दाखवलेले प्रसंगावधान यामुळे मोठा अनर्थ टाळला गेला आणि संकट येवूनही सुखरूप राहिल्याने प्रवाशांनी वाहकाला धन्यवाद दिले. काही काळ मात्र प्रवासी प्रचंड हादरून गेले होते. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !