BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ मार्च, २०२२

महावितरणचे बडे अधिकारी आले गोत्यात, फौजदारी दाखल होणार !

 



सांगली :मासिक बिलातील घोटाळयाप्रकरणी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी चांगलेच  गोत्यात आले असून फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत त्यामुळे आता अधिकारी, कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. 


थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी महावितरणने मोहीम सुरु केल्याने अधिकारी, कर्मचारी ग्राहकांच्या रोषाला बळी पडत आहेत. शेतकरी वर्गात तर महावितरणबाबत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे आणि याच परिस्थितीत वीज बिलाच्या घोटाळ्याचे प्रकरण समोर आले असून अधिकारी कर्मचारी यांचे धाबे दणाणले आहेत. सांगली महापालिकेच्या पथदिवे मासिक वीज बिलाचा हा घोटाळा उघडकीस आला असून महावितरणचे तत्कालीन अतिरिक्त कार्यकारी अभियंता आणि बोगस बिले तयार करणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा असा आदेश आयुक्तांनी सहाय्यक आयुक्त यांना दिला आहे. विजेची ऑफलाईन बिले अपहार करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आल्याचे दिसून येत असल्याचे मुख्य कायदा सल्लागार यांनी अभिप्राय दिले होते त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. 


पथदिवे वीज बिलात अनियमितता असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास सप्टेंबर २०२० मध्येच आले होते. महापालिका विद्युत विभागाने महावितरणला दिलेल्या धनादेशातील १ कोटी २९ लाख ९५ हजार ८९८ इतर ग्राहकांच्या खात्यावर वर्ग झाल्याचे दिसून आले होते. एप्रिल २०१९ ते सप्टेंबर २०२० दरम्यानच्या काळात हा अपहार झाल्याचे म्हटले आहे.  मागील पाच वर्षातील पथदिवे बिलांची कागदपत्रे तपासणे, दोषी असलेल्यावर जबाबदारी निश्चित करणे यासाठी सी ए ची नियुक्ती करण्यात आली होती.Fraud from electricity bill-by-executive engineer )


सी.ए. कडून तपासणी होऊन त्यांनी महापालिकेला अहवाल सादर केला आहे.  तत्कालीन कार्यकारी अभियंता यांच्या सहीने महापालिकेला दिलेल्या प्रत्यक्ष बिलात आणि महावितरणच्या संकेतस्थळावर असेलेल्या बिलात फरक दिसून आला असल्याचे देखील या अहवालात सांगण्यात आले आहे. संकेतस्थळावरून काढण्यात आलेल्या बिलामध्ये थकबाकी आणि व्याज या स्वरुपात ही रक्कम दिसत आहे तर अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या सहीने देण्यात आलेल्या बिलात तीच रक्कम 'इतर आकार' म्हणून दाखविण्यात आली आहे. त्यामुळे ते बोगस आढळून आले आहे. 


रकमेचा अपहार करण्याच्या हेतूनेच ही बिले तयार करण्यात आल्याचे दिसून येत असून याची व्याप्ती देखील मोठी असण्याची शक्यता मुख्य कायदा सल्लागार यांच्या अभिप्रायात म्हटले आहे. संबंधित कार्यकारी अभियंता यांनी दुर्लक्ष तर केलेच आहे पण या गुन्ह्यात त्यांचा थेट सहभाग असल्याचे देखील दिसून आले आहे. त्यामुळे कार्यकारी अभियंता आणि बोगस बिले तयार करणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर फौजदारी दाखल करता येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणाने महावितरणमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.  


++हे देखील वाचा : 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !