BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ मार्च, २०२२

--तर महावितरण कार्यालयाच्या दारात जनावरे बांधू !

 


मोहोळ : वीज पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत गावातील सगळी जनावरे महावितरणच्या कार्यालयात आणून बांधण्याचा इशारा पेनूर येथील सरपंच शिवाजी भोसले यांनी दिला आहे. (Solapur Mahavitaran) 


वीज वितरण कंपनीकडून राबविण्यात येत असलेल्या वसुली मोहिमेत वीज पुरवठा खंडित करण्यात येत असल्यामुळे पिके तर धोक्यात आलेलीच आहेत पण मुख्य जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न कठीण बनत चाललेला आहे. शेतकरी आणि महावितरण यांच्यातील संघर्ष आता अधिक तीव्र वळणावर पोहोचू लागला असून तो आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महावितरण आणि थकित शेतकरी यांच्यात समन्वयाचा मार्ग निघण्याची आता काहीच शक्यता दिसत नाही. त्यातच मोहोळ तालुक्यातील पाटकूल गावाचे सरपंच शिवाजी भोसले यांनी अत्यंत महत्वाच्या बाबीकडे लक्ष वेधले आहे. (Sarapanch Mohol)


उन्हाळयाचे दिवस सुरु झाले असून पिकांना पाण्याची मोठी गरज भासू लागली आहे आणि त्यासाठी विजेचा पुरवठा सुरळीत असणे आवश्यक आहे. पिकांचा विषय रोजच चर्चिला जात आहे पण मुख्य जनावरांच्या समस्येकडे सरपंच शिवाजी भोसले यांनी लक्ष वेधले असून त्यांनी महावितरणला वेगळाच इशारा दिला आहे. दहा हजार लोकसंख्या असलेल्या पाटकुल गावच्या पाणी पुरवठ्याची वीज तोडली असल्याने माणसासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. एका दुभत्या जनावरांना किमान शंभर लिटर पाणी दिवसाकाठी लागते परंतु वीज तोडल्यामुळे जनावरांना देखील पिण्याच्या पाण्याची समस्या त्रस्त करू लागली आहे. पर्यायाने दूध उत्पादनावर देखील विपरीत परिणाम होऊ लागला आहे.


जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कठीण बनल्याने सरपंच भोसले यांनी गावातील सगळी जनावरे पेनूरच्या महावितरण कार्यालयासमोरील मैदानात आणून बांधली जातील असा रोखठोक इशारा दिला आहे. गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील ऐन उन्हाळ्यात गंभीर बनत असून गावातील एकही विहिरीला पायऱ्या नाहीत. त्यामुळे विहिरीतून पाणी काढणे देखील सोपे राहिलेले नाही. विहिरीतील पाणी काढताना कुणाचा मृत्यू झाला तर त्याला महावितरणला जबाबदार धरले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.  


पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्याने ऐन उन्हाळ्यात ऊस तोडीवर देखील विपरीत परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. उन्हाळा असल्याने पिण्याच्या पाण्याची गरज वाढली आहे. ऊस तोडणी कामगारास पिण्याचे पाणी न मिळाल्यास या टोळ्या निघून जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली असून उस तोडण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता देखील सरपंच भोसले यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान शेतकरी आणि महावितरण यांच्यात संघर्ष वाढताना दिसत असून शेतकऱ्यासाठी महावितरण कार्यालासमोर आंदोलन करणाऱ्या जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्यावर महावितरणने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ पाटकुल आणि कुरूल गावात बंद पाळून महावितरणचा निषेध करण्यात आला. सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप करून देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा खोटा असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. (MSEDCL - Farmers' dispute began to grow )    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !