बारामती : साखर कारखाना आपला ऊस नेत नसल्याचा आरोप करीत एका शेतकऱ्याने कार्यकारी संचालक यांच्याच कक्षात अंगावर रॉकेल ओतून घेतले पण तातडीने त्यांना रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला!
ऊस उत्पादक शेतकरी गेल्या काही काळापासून प्रचंड अडचणीत आलेला आहे. कर्ज काढून आणि घाम गळून शेतकरी ऊस पिकवतो परंतु त्याला त्याचा योग्य मोबदला तर मिळत नाहीच पण जो मिळणार आहे तो देखील मोबदला वेळेत मिळत नाही. कारखान्याला गाळपासाठी दिलेल्या उसाचे बिल आल्यावर त्याला बरीच देणी चुकवायची असतात पण कारखाने लवकर उसाचे बिल देत नाही. शेतकऱ्याचे संपूर्ण अर्थकारण त्याच्या शेतीवर असते त्यामुळे बिलाअभावी तो पूर्णपणे अडचणीत येत असतो. राज्यात अनेक कारखान्यांनी मागील वर्षीच्या ऊसाचे बिल अद्याप दिले नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आलेला आहे. त्यातच कारखान्यांनी उस नेण्यास टाळाटाळ केली की तो पुरता खचून जातो . असाच काहीसा प्रकार घडल्याने एका युवक शेतकऱ्याने टोकाचे पाउल उचलले.
बारामतीचा माळेगाव सहकारी साखर कारखाना आपला उस नेत नाही असा आरोप करीत एका युवक शेतकऱ्याने आक्रोश केला. कारखान्याच्या कार्यकरी संचालकाच्या कक्षात घुसून धुमाळवाडी येथील युवक शेतकरी समीर शहाजी धुमाळ यांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले. अचानक घडलेल्या या प्रकाराने कारखाना परिसरात एकच खळबळ उडाली. धुमाळ हे पुढचे काही पाउल उचलण्याआधीच त्यांना रोखण्यात आले त्यामुळे पुढील अनर्थ टळला. एकाएकी आणि अनपेक्षितरित्या हे सर्वकाही घडल्याने कारखाना प्रशासनाचीही मोठी तारांबळ उडाली. वास्तविक जमिनीच्या कौटुंबिक वादातून हा प्रकार धुमाळ यांनी केला असल्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी सांगितले आहे.
भावाभावांत असलेल्या जमिनीच्या वादातून ही समस्या निर्माण झाली असल्याची माहित समोर येऊ लागली आहे. या वादामुळे उसाची तोडणी रखडली असल्याने आजची घटना घडली. वाद सुरु असल्याने तुम्हीच तुमचा उस तोडून आणून कारखान्याला द्या असे कारखाना सांगत आहे तर कारखान्यानेच उस तोडून न्यावा अशी मागणी समीर धुमाळ यांची आहे. भावाभावाच्या वादामुळे ऊसाची तोड करणे कारखान्याला अडचणीचे झाले आहे. त्यामुळे तोडणी रखडली असून समीर धुमाळ हे तरुण शेतकरी रॉकेल घेऊनच कारखान्यावर आले आणि त्यांनी कार्यकारी संचालकांच्या कक्षात प्रवेश करून अंगावर रॉकेल ओतून घेतल्याची घटना आज घडली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !