सोलापूर : एका अंध मातेला फुकटच्या धान्याची हूल देऊन तिच्या तीन वर्षे वयाच्या लहान लेकराला पळवून नेण्याची हृदयाला पीळ पाडणारी घटना सोलापूर शहरात घडली आहे .
अंध असलेल्या गरीब महिलेला एक तीन वर्षाचा मुलगा आहे आणि तोच आपल्या आईचे डोळे बनलेला आहे. अशा अंध मातेच्या चिमुकल्या मुलाला पळवून नेण्याचे पाप केल्याची ही घटना अत्यंत क्लेशकारक ठरली आहे. अंबिका नावाची ही अंध माता शहरात भीक मागून आपले आणि आपल्या लेकराचे पोट भरते. या अंध महिलेस दुसऱ्या एका भीक मागून जगणाऱ्या महिलेनेच फसविले असल्याचे दिसून येत आहे. शहरात भीक मागून जगणारी एक महिला अंबिकाजवळ आली आणि एक नगरसेवक मोफत धान्य वाटप करीत असल्याची बतावणी तिने केली.
भीक मागून पोट भरीत असलेल्या अंबिकाला ही बातमी ऐकून आनंद झाला. थोडेफार मोफत धान्य हे तिच्यासाठी मोलाचे होते. त्या महिलेच्या सोबत अंबिका आपल्या तीन वर्षाच्या चिमुकल्या लेकरास घेऊन निघाली. सोबतच्या महिलेने मात्र अम्बिकाच्या अंधत्वाचा गैरफायदा उठवला. विजापूर वेस येथे आल्यावर त्या महिलेने अंध अंबिकेला तेथेच सोडला आणि तिच्या लहान मुलाला घेऊन ती पसार झाली. अंध अंबिका आणि या महिलेचा आधीच परिचय झालेला होता. दोघीही भीक मागून पोट भरीत असल्याने त्यांची दोन तीन वेळा भेट देखील झाली होती. अंबिकाला लहान मुलगा असल्याचे त्या महिलेस माहित होते.
अंबिका आणि या महिलेत काही कारणावरून भांडण झाले होते. त्यानंतरही ही महिला या अंध महिलेजवळ आली आणि एक नगरसेवक मोफत धन्य वाटत असल्याची माहिती देत तिला घेऊन गेली आणि वाटेत डाव साधला. या महिलेच्या लहान मुलाला पळवून नेण्याची दोन कारणे समोर येत आहेत. आधी झालेल्या भांडणाच्या रागातून या महिलेने अम्बिकाच्या मुलाला पळवून नेले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलिसांना देखील तसाच संशय आहे. शिवाय लहान मुलाला सोबत घेवून भीक मागितल्याने जादा भीक मिळू शकेल यामुळे देखील लहान मुलाला या भिकारी महिलेने पळवून नेले असावे असा देखील संशय पोलिसांना आहे.
सोलापूर सदर बजार पोलीस सर्व दिशेने तपास करू लागले आहेत. सदर प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अनोळखी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने या मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली असून बस स्थानक, रेल्वे स्थानक अशा ठिकाणी त्या महिलेचा शोध घेतला जात आहे. एका गरीब आणि अंध मातेच्या मुलाला पळवून नेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. आपल्या मुलाच्या आधाराने ही महिला चालत होती आणि त्याच्या डोळ्यानीच पाहत होती. अशा आधार असलेल्या मुलालाच पळवून नेण्याचा प्रकार दुसऱ्या एका भिकारी महिलेनेच केला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !