गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी पंढरीत येऊन विठूमाउलीचे दर्शन घेतले. पंढरीत 'सावरकर साहित्य संमेलनाचे' आयोजन करण्यात आले होते. यासाठी लता दीदींना निमंत्रण देण्यात आले होते, या प्रत्यक्ष भेटीचा अनुभव सांगताहेत गोविंद रघुनाथ तथा बंडू सबनीस.
एक अवस्मरणीय अनुभव .... साधारणपणे १९८३-८४ मधील गोष्ट..... पंढरपूरमध्ये 'सावरकर साहित्य संमेलनाची' गडबड सुरू झाली होती . कै.वा ना उत्पात ,बापू जोशी यांच्याबरोबर रोजच बैठकी होत होत्या. नामवंत वक्ते आणि सावरकरप्रेमी मंडळी मुंबईतच असल्यामुळे, मुंबईच्या सर्व कामांची जबाबदारी मी घेतली. रेल्वेचा पास व मुंबईत काढलेले दिवस, यात मंडळाची बचत होणार होती व मला मुंबई पूर्णपणे माहीत होती. हातात मंडळाचे लेटर पॅड घेऊन मी सावरकर सदनांमध्ये, बाळाराव सावरकराना भेटलो . संमेलनासंबंधी चर्चा झाली . मग बाळाराव म्हणाले "तुझ्या हातात सावरकर नावाचे हुकमी पान आहे, तू कुठेही जा तुला मुक्त प्रवेश असेल" एवढाच आशीर्वाद दिला.
बाळाराव सावरकर यांचा निरोप घेऊन मी सुधीर फडके यांच्या घरी शिवाजी पार्कला गेलो. तिथे ज्येष्ठ कवी सुधीर मोघे बसले होते, बाबूजींना मी संमेलनाचे निमंत्रण दिले .त्याच वेळी सुधीर मोघे यांनी १९८२ च्या" बेस्ट डॉक्युमेंटरी ऑफ द इयर वीर सावरकर "विषयी सांगितले ही डॉक्युमेंट्री फिल्म डिविजनचे डायरेक्टर श्री. प्रेम वैद्य यांनी तयार केलेली होती. निरोप घेऊन मी फिल्म्स डिविजन, पेडर रोड या ठिकाणी प्रेम वैद्य यांना भेटलो. संमलानाविषयी त्यांना सांगितले .त्यांनी मला सर्व सहकार्य दिले . माझ्या लेटरपॅडवर त्यांनी मला फिल्मची तीन रीळ पंढरपुरात दाखवण्याकरता दिली.
सुधीर फडके यांच्या निवासातून बाहेर पडलो आणि समोर बघितलं, तर "प्रभू कुंज"! लतादीदींच्या निवासस्थानाची इमारत होती. मी तिथंच बसून एक पत्र तयार केलं, आणि प्रभू कुंज मध्ये प्रवेश केला. दुसऱ्या मजल्यावर एकीकडे आशाताईचे घर व समोर लता दीदीचे घर होतं. दरवाज्यावरची बेल दाबून मी घरात प्रवेश केला . कोण कुठला काय काहीही रेफरन्स नसताना मी घरात घुसलो होतो. समोर माई बसल्या होत्या त्यांना नमस्कार केला. मी म्हणालो, 'मला दीदीने भेटायचं आहे'. थोडा वेळ गेला आणि दीदी आल्या . ओले केस पुसत. साक्षात सरस्वती देवी समोर उभी ठाकली. त्यानी विचारलं, काय काढलंत ? मी सावरकर प्रेमी मंडळाचे पत्र दिले, आणि सावरकर साहित्य संमेलनाविषयी,थोडक्यात सांगितले, आणि आपण यावे अशी विनंती केली .
किंचित हसून दीदी म्हणाल्या, मला येणे अवघड आहे. मग मी म्हणालो निदान शुभ आशीर्वाद द्या ,त्या म्हणाल्या, तात्यारावांच्या कार्याला आशीर्वाद देण्याएवढी, मी मोठी नाही. त्यांनी असं म्हणताच 'शुभेच्छा तरी द्या' अशी विनंती केली त्या म्हणाल्या, 'कार्य शुभ आहेच, मग शुभेच्छा तरी कशाला ?' असं म्हणत त्यांनी मला गप्प केलं. पाच मिनिटे गेली, मी स्तब्धच झालो होतो. साक्षात सरस्वती देवीच गानसम्राज्ञी समोर उभी होती .निरोप घेतला आणि मी बाहेर आलो. एवढ्या मोठ्या, सम्राज्ञीच्या घरात , कोणतीही अपॉईंटमेंट न घेता, केवळ बेल दाबून आत गेलो होतो, आणि प्रेमळ , वात्सल्यमुर्ती देवीचं मला दर्शन घडलं होतं .यथावकाश मी पंढरपूरला आलो. सावरकर साहित्य संमेलन पार पडलं.. . दीदीने आठवणीने संमेलनाला शुभेच्छा पाठवून दिलेल्या होत्या. दीदी गेल्या, त्यांच्या या अविस्मरणीय भीतीची आठवण पुन्हा ताजी झाली ! भावपूर्ण श्रद्धांजली ll
- गोविंद रघुनाथ तथा
बंडू सबनीस
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !