सोलापूर : उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कैद्याने भलताच राडा केला असून सिव्हील हॉस्पिटलमध्ये त्याने आत्महत्येचा देखील प्रयत्न केला आहे.
सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका तरुण कैद्याने पोलिसांचा घाम काढला आहे. जिल्हा कारागृहात ठेवलेल्या प्रेम संजय हलकवडे या कैद्याची प्रकृती बिघडली होती. प्रकृती ठीक नसल्यामुळे सोलापूर येथील प्रेम हलकवडे या कैद्यास सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही संधी साधून पोलिसांच्या हातावर तुरी ठेवून तो तेथून पळून गेला होता. या घटनेने पोलिसात प्रचंड खळबळ उडाली होती. फौजदार चावडी पोलिसांनी मात्र चोवीस तासांच्या आत त्याच्या मुसक्या आवळल्या आणि पुन्हा जेरबंद करून त्याला तुरुंग प्रशासनाच्या हवाली केले होते.
कैदी प्रेम हलकवडे हा आजारी असल्यामुळे त्याला पुन्हा सोलापूर येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या कैद्याने रुग्णालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचा गुन्हा पोलिसांनी त्याच्यावर दाखल केला आहे. सदर कैद्याने रुग्णालयात प्रचंड धिंगाणा घातला. उपचारासाठी त्याच्या हाताला सलाईन लावण्यात आले होते ते काढून टाकले आणि खिडकीवर तसेच भिंतीवर डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न त्याने केला. यावेळी पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता पोलिसाच्या मांडीला त्याने जोरदार चावा घेतला आणि सलाईनच्या पाईपने पोलिसाला मारहाण केली.
रुग्णालयाच्या वार्डात या कैद्याने जोरदार राडा केला. आरडाओरडा करीत डॉक्टरांना देखील शिवीगाळ केली. खिडकीला लावलेली मच्छर जाळी त्याने तोडून टाकली. सदर कैद्याने शनिवारी घातलेल्या या धिंगाणा प्रकरणी तसेच आत्महत्येचा प्रयत्न करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सोलापूर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सलगर वस्ती पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध आधीचाच गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती. १९ वर्षाचे वय असलेल्या या कैद्याने पोलिसांच्या नाकात दम आणलेला आहे. आधी पळून गेला आणि नंतर त्याने रुग्णालयात असा धिंगाणा घातला आहे. सदर प्रकरणी पोलीस कर्मचारी अतुल राऊत यांच्या फिर्यादीवरून सदर बझार पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला आहे.
.............................
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !