अहमदाबाद : रस्त्यावरील होणारे बहुसंख्य अपघात हे चालकाला आलेल्या झोपेमुळे होतात, पण आता असा चष्मा तयार झालाय की. तुमच्या डोळ्यावर झोप आली की हा चष्माच 'सावध' करणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे आणि अपघातात होणाऱ्या मृत्यूंची संख्याही रोज वाढतच आहे. त्यात रस्ते चकाचक झाल्याने वेगावर तर काही मर्यादाच राहिली नाही आणि माणसांच्या जीवांची पर्वाही उरलेली नाही. त्यात रात्री आणि विशेषत: पहाटे होणारे अपघात अधिक असतात. हे अपघात झोपेवर नियंत्रण न राहिल्यामुळे होत असतात. डोळ्यावर केंव्हा झापड येते आणि डुलकी लागते हे कळायच्या आत तर सगळे काही घडून गेले असते. एक डुलकी अनेकांच्या जीवावर उठत असते आणि झोपेवर नियंत्रण ठेवणे ठरवूनही शक्य होत नसते. माणसाच्या नकळत डोळ्यावर आक्रमण करणारी झोप आता केवळ एक चष्मा नियंत्रित करू शकणार आहे. गुजरातमधील एका विद्यार्थ्याने तयार केलाय असा जादुई चष्मा की, तोच आता अपघातावर नियंत्रण आणू शकेल.
बारावीत शिकणाऱ्या नवाब सुफियान शेख या विद्यार्थ्याने असा एक चष्मा तयार केलाय की त्यामुळे अपघात आणि प्राण देखील वाचू शकणार आहेत. नवाबच्या जवळच्या काही लोकांचा अपघातात मृत्यू झाला आणि तो अस्वस्थ झाला. अपघातावर काहीतरी उपाय शोधला पाहिजे असं त्याला वाटलं आणि लोकांचे अपघातात होणारे मृत्यू टाळण्यासाठी तो कामाला लागला. प्रयत्न केल्यावर काहीही अशक्य नसतं असं म्हणतात ते काही खोटं नाही. हजार रुपयापेक्षा कमी खर्चात त्याने असा एक चष्मा बनवलाय की तोच आता अपघात होण्यापासून वाचवतोय !
नवाबने चष्म्यात असे एक सेन्सर बसवले आहे की ते सतत तुमच्या डोळ्यावर लक्ष ठेवत असते. तुमच्या डोळ्यावर झोप यायला लागली की हे सेन्सर वाजायला लागते. त्याचा आवाज एकट्यापुरताच नव्हे तर आजूबाजूला बसलेल्या अन्य लोकांनाही ऐकायला जातो आणि मग सगळेच सावध होतात. चालकाला झोप लागायला लागली हे सगळ्यांनाच कळतं आणि मग संभाव्य अपघातही टळतो आणि अपघातात होणारे मृत्यूही टळतात. या चष्म्याला त्याने एक बॅटरी बसवली आहे, ही बॅटरी सेन्सरसाठी आवश्यक आहे. आता प्रत्यक्षात अशा चष्म्याचा वापर सर्रास करता येईल काय ? हे मात्र पाहावे लागणार आहे. पण काही असो, बारावीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या कल्पनेचं मात्र कौतुक होऊ लागलं आहे. त्याच्या कल्पनेचा आता विकास होण्याची गरज आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !