BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ मार्च, २०२२

खा. रणजीतसिंह निंबाळकर यांनी कोट्यावधीची फसवणूक केल्याची तक्रार !

 


फलटण : माढा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी आपली कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली असल्याचा आरोप त्यांच्याच एकेकाळच्या जवळच्या सहकाऱ्याने केला असून पोलीस ठाण्यात तशी तक्रार देखील दाखल केली आहे.


 भारतीय जनता पक्षाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या  कधीकाळी अत्यंत जवळच्या असलेल्या दिगंबर आगवणे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अर्ज देऊन अत्यंत गंभीर आणि मोठा आरोप केला असल्याने एकच खळबळ उडाली आहे.  'स्वराज साखर कारखाना' आणि स्वराज नागरी सहकारी पतसंस्था' यांच्या माध्यमातून खा. निंबाळकर यांनी आपली कोट्यवधींची फसवणूक केली असल्याची तक्रार आगवणे यांनी केली आहे. 


व्यवसायाच्या माध्यमातून २००७ साली निंबाळकर यांच्यांशी आपला संपर्क आला. त्यांच्या स्वराज्य दूध डेअरीसाठी आपण त्यावेळी लाकडाचा पुरवठा करीत होतो त्यामुळे त्यांच्याशी आर्थिक व्यवहार होते. त्यांनी मात्र उपळवे येथे असलेल्या स्वराज साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमनपद देतो असे आपणास अमिष दाखवले आणि आर्थिक मदतीची विनंती केली होती असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत भाजप तिकिटावर आगवणे यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. 


याच दिगंबर आगवणे यांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निंबाळकर यांच्या विरोधात तक्रारीचा अर्ज दिला आहे, फलटण शहरातील विविध जमिनीवर काढलेल्या कर्जत चार कोटींच्या पेक्षा अधिक रक्कम खा. निंबाळकर यांच्या खात्यात जमा करण्यात आली. शिवाय दिगंबर आगवणे यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर असलेली  साखरवाडी येथील जमीन गहाण ठेवून २२६ कोटी  कर्ज काढून दिले असल्याचे आगवणे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. 


आपण सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे येथील कॅम्प शाखेकडून ५० कोटी आणि पुणे शाखेतून ४७. १३ कोटी, कॅनरा बँकेकडून ४५ कोटी कर्ज मिळण्यासाठी पिंपळवाडी येथील जमीन गहाण ठेवली. त्यानंतर त्याच वर्षी म्हणजे २०१४ साली कारखान्याच्या व्हाईस चेअरमनपदावर आपली नियुक्ती केल्याचे पत्र देण्यात आले. त्यानंतर देखील जमीन बँकेकडे गहाण ठेवून ८४ कोटीं असे एकूण २२६ कोटी रुपये कर्ज साखर कारखान्याच्या चेअरमन रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि संचालक मंडळाने तिन्ही बँकेच्या संमतीने काढले. 


रणजितसिंह निंबाळकर चेअरमन असलेल्या स्वराज नागरी  पतसंस्थेतून पत्नी जिजामाला याना पंचायत समितीची निवडणूक लढवायची होती त्यामुळे आपल्या नावावर कर्ज घेतले गेले.  त्यानंतर २०१६-१७ मध्ये त्यांनी स्वराज पतसंस्थेत वाद सुरु असलेल्या जमिनीवर वहिवाट आणि बोजा दिसावा यासाठी ही जमीन गहाण ठेवून एक कोटींचे कर्ज घेतले होते. कर्ज प्रकरणात आपल्या साह्य घेतल्या पण संबंधित रक्कम आपल्याला मिळालीच नाही. यातील ५९ लाख रुपयांचे कर्ज कारखान्याने पतसंस्थेत भरले असल्याचे समजले आहे. कर्ज प्रकरणी आपल्या सह्या असल्यामुळे निंबाळकर यांनी न्यायालयात दावा दाखल केला आहे असे देखील आगवणे यांनी तक्रारीत म्हटले आहे. 


खासदार नाईक निंबाळकर, स्वराज इंडिया ऍग्रो लि. चे सर्व संचालक, स्वराज नागरी पतसंस्थेचे सर्व संचालक यांच्याविरोधात विश्वासघात, खोटी कागदपत्रे तयार करणे व फसवणूक करणे याबाबत गुन्हा दाखल करावा अशी विनंती आगवणे यांनी फलटण पोलिसांकडे एका अर्जाद्वारे केली आहे. सदर तक्रार दिल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे नाईक निंबाळकर आणि आगवणे या दोघांचेही जबाब नोंदले गेले आहेत. पोलिसात केवळ तक्रार दाखल असून अद्याप तरी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही. 


तक्रारदार कोण ?

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात एवढी मोठी तक्रार करणारे दिगंबर आगवणे हे फलटण तालुक्यातील गिरवी येथील असून त्यांनी तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली आहे. यातील दोन वेळा काँग्रेस आणि एक वेळा भाजपच्या वतीने विधानसभा निवडणूक लढवली आहे. लोकसभा निवडणुकीत नाईक निंबाळकर यांच्या खांद्याला खांदा लावून आगवणे यांनी काम केले आहे आणि आपल्या विजयात आगवणे यांचा मोठा वाटा असल्याचे खा. निंबाळकर यांनी जाहीरपणे सांगितले होते. खा. निंबाळकर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे दिगंबर आगवणे हेच आता त्यांच्याविरोधात तक्रारदार म्हणून पुढे आलेले आहेत. सदर कर्ज प्रकरणी आपण रस्त्यावर आलो असून न्याय मिळाला नाहीत तर आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे, शिवाय आपल्या जीविताला धोका असल्याचे देखील त्यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे.   

वाचा आपलीच चिता रचून वारकरी शेतकऱ्याने केली आत्महत्या !


आरोप खोटे आहेत !

दिगंबर आगवणे यांनी केलेले आरोप खोटे आहेत असे खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी सांगितले आहे. कर्ज प्रकरणाला इतर प्रॉपर्टी देखील मॉरगेज आहे असे खा. निंबाळकर यांनी म्हटले आहे. आगवणे यांनी केलेले आरोप खोटे आहेत असेच निंबाळकर यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी मात्र या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.  




खा. निंबाळकर यांच्या कधीकाळी अत्यंत जवळ आणि खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे दिगंबर आगवणे यांनी ही तक्रार केल्यानंतर सातारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. माढा मतदारसंघात देखील या विषयाची चर्चा सुरु झाली आहे. 






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !