मंगळवेढा : साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरला अपघात होऊन ऊसाखाली दबून ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऊसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर हे रस्त्यावरील यमदूत ठरत आहेत. अत्यंत बेफिकीर आणि बेपर्वाईने ऊसाची वाहतूक करतात आणि वाहतुकीचे कसलेही नियम पाळले जात नाहीत. कर्णकर्कश आवाजात गाणी वाजवत आणि अवघा रस्ता आपल्याच मालकीचा असल्याप्रमाणे बहुतांश चालक ट्रॅक्टर चालवत असतात आणि रस्त्यावरील इतरांचे जीव घेत असतात. ट्रॅक्टरमुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाण प्रचंड असून या वाहतुकीत कसलीही सुधारणा होताना दिसत नाही. मंगळवेढा तालुक्यात मात्र ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकालाच प्राण गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे.
ट्रॅक्टरचालक दत्तात्रय दोलतोडे हा एम एच १३ डीई हा ट्रॅक्टर ऊस घेऊन भैरवनाथ साखर कारखान्याकडे निघाला होता. हा ट्रॅक्टर विश्वनाथ कनशेट्टी यांच्या शेताजवळ आलेला असताना एका क्रुझर गाडीने ट्रॅक्टरला धडक दिली. उमदीकडून मरवडे गावाकडे निघालेली क्लूजर जीप (एमएच १३, एसी ००३१) ही भरधाव वेगाने आणि चुकीच्या बाजूने आली आणि ट्रॅक्टरच्या मागील बाजूस जोराची धडक दिली. या धडकेमुळे गिअर बॉक्स तुटला आणि ट्रॅक्टरचे दोन भाग झाले. यावेळी ट्रॅक्टरला जोडलेला दोन चाकी गाडा पलटी झाला. या अपघातात मरवडे येथील ट्रॅक्टर चालक दत्तात्रय दोलतोडे या ४२ वर्षे वयाच्या चालकाच्या अंगावर ऊस पडला आणि या उसाखाली दबल्याने त्यांचा मृत्यू झाला.
या अपघाताची नोंद मंगळवेढा पोलीस ठाण्यात करण्यात आली असूनउमदी येथील जीप चालक संतोष आण्णाप्पा माने याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात दोन्ही वाहनांचे सुमारे ३ लाखांचे नुकसान झाले आहे. सदर अपघातात जीपचालक देखील जखमी झाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !