सोलापूर : राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांनी एस टी चा संप अधिक ताणला असताना सोलापुरात एस टी चालकाच्या तरुण मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचाऱ्यांनी गेल्या अडीच महिन्यापासून संप पुकारल्याने आधीच अडचणीत असलेली एस टी आणखीच गोत्यात आली आहे, त्याबरोबर संप अधिकच ताणला गेल्या एस. टी. कर्मचारी देखील आर्थिक संकटात सापडले आहेत. आर्थिक ताणतणावांत काही कर्मचाऱ्यांना मृत्यू आला आहे तर काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एस टी कर्मचाऱ्यांना तुटपुंजे वेतन मिळते याच्याशी सगळेच सहमत आहेत परंतु या संपात राजकारण घुसल्याने संप ताणला गेला आहे आणि सामान्य एस टी कर्मचारी अधिक अडचणीत येत गेले. एकीकडे कर्मचारी आत्महत्येचे पाऊल उचलत आहेत तर दुसरीकडे या संपामुळे एस टी चालकाच्या मुलाने आत्महत्या केल्याची वाईट घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील कोंडी (राहुटी) येथील तुकाराम माळी हे २२ वर्षांपासून राज्य परिवहन महामंडळात चालक पदावर सेवेत आहेत. संपात सहभागी असल्यामुळे त्यांना मागील दोन महिन्यांपासून वेतन मिळाले नाही, त्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबावर झाला. वेतन नसल्याचे घरखर्च भागविणे अशक्य झाले शिवाय मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी देखील त्यांच्याकडे पैसे नाहीत. घरातील आर्थिक चणचण तुकाराम माळी यांच्या कुटुंबाला त्रस्त करीत आहे. घरातील ही आर्थिक अडचण माळी यांचा २० वर्षे वयाचा तरुण मुलगा अमर याला असह्य होत गेली आणि त्याने टोकाचे पाऊल उचलत राहत्या घरीच आत्महत्या केली.
संपात सहभागी असलेले तुकाराम माळी हे रोजच्याप्रमाणे बस स्थानकाच्या परिसरात आंदोलनाच्या ठिकाणी आले आणि याचवेळी त्यांना त्यांच्या तरुण मुलाने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. ही दुःखद बातमी ऐकल्यानंतर त्यांच्यातील त्राणच निघून गेला आणि त्यांनी हंबरडा फोडला. तुकाराम माळी हे सन २००० मध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत चालक म्हणून दाखल झाले होते. अत्यंत कमी वेतनावर ते काम करीत होते. दोन मुले, पत्नी, आई, भाऊ असा त्यांचा परिवार आहे. माळी यांची दोन्ही मुले महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहेत.
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप सुरु केल्यानंतर माळी देखील या संपात सहभागी झाले आहेत. संपातील कर्मचाऱ्यावर निलंबन आणि बडतर्फ करण्याची कारवाई सुरु झाल्यापासून ते तणावातच आहेत. त्यात घरखर्च भागविणे जिकिरीचे झाले आहे. लोककंडून उधार उसनवार घेऊन त्यांच्या कुटुंबाची उपजीविका सद्या सुरु आहे. अशा संकटात असतानाच त्यांच्या तरुण मुलाने आत्महत्या केल्याने माळी कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. आपल्या सहकाऱ्याच्या कुटुंबात घडलेल्या या दुर्दवी घटनेमुळे संपकरी कर्मचारीही प्रचंड दुःखी झाले आहेत. संपकरी कर्मचारी माळी यांच्या घरी गेले आणि त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला. तरुण मुलाच्या आत्महत्येच्या घटनेने कोंडी परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !