पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट प्रबळ होत असतानाच पंढरपूर आणि बार्शी तालुक्यात मात्र कोरोना सुसाट सुटला आहे. मागच्या दोन्ही लाटेत देखील पंढरपूर कायम आघाडीवर राहिलेला तालुका आहे.
देश आणि राज्यभरात सगळीकडेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने झोप उडवली आहे. मोठ्या शहरापासून ग्रामीण भागापर्यंत कोरोनाची व्याप्ती आता भलतीच वाढू लागली असून सोलापूर जिल्हयांतही नव्या कोरोना रुग्णांची वाढ होत असून जिल्ह्यात पंढरपूर आणि बार्शी तालुक्यात सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथे दररोज हजारो भाविकांची ये जा असते आई राज्याच्या विविध भागातून हे भाविक पंढरीत येत असतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार आणि संसर्ग अधिक होण्याचा धोका असतो. मागील दोन्ही लाटेत पंढरपूर तालुक्याचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये मागील दोन्ही लाटेत रुग्णसंख्येत आणि मृतांच्या संख्येतही पंढरपूर सर्वाधिक आहे त्यामुळे पंढरपूरसाठी नागरिक आणि प्रशासनाने अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
काल प्राप्त झालेल्या अहवालात सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पंढरपूर आणि बार्शी या तालुक्यात अधिक रुग्ण असून या दोन तालुक्यातील बाधितांची संख्याही सर्वाधिक आहे
सोलापूर जिल्ह्यात कालच्या अहवालानुसार एकूण ४७२ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत . त्यातील २२४ रुग्ण हे बार्शी आणि पंढरपूर तालुक्यातील आहेत. बार्शी तालुक्यात १२१ तर पंढरपूर तालुक्यात १०३ रुग्णांची भर एका दिवसात पडली आहे. त्यात पंढरपूर शहरातील ६४ आणि तालुक्यातील ३९ रुग्णांचा समावेश आहे. बार्शी तालुक्यातील १२१ रुग्णांत शहरातील ९४ तर ग्रामीण भागातील २७ रुग्णांचा समावेश आहे. सोलापूर जिल्हयात १ हजार ७६८ रुग्णांवर उपचार सुरु असून यात पंढरपूर तालुक्यातील ४१८ आणि बार्शी तालुक्यातील ४४३ रुग्ण आहेत. सोलापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत झालेल्या कोरोना मृत्यूच्या संख्येत पंढरपूर तालुका सर्वाधिक असून या तालुक्यात ६५९ मृत्यूंची नोंद झाली आहे.
अक्कलकोट - ९, बार्शी - १२१, करमाळा - ३१, माढा- ७४, माळशिरस- ३६, मंगळवेढा- २६, मोहोळ- १६, उत्तर सोलापूर- ९, पंढरपूर- १०३, सांगोला- ३२, दक्षिण सोलापूर -१५ अशी तालुकानिहाय कालची वाढ आहे. उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या माढ्यात २०० तर करमाळा तालुक्यात १३५ एवढी आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस सोलापूर शहरात केवळ ४ बाधित होते तर ग्रामीण भागात ही संख्या ८४ होती. नव्या वर्षात ही संख्या आता तब्बल २५ पटीने वाढलेली दिसत आहे. जिल्हा ग्रामीणच्या तुलनेत सद्या सर्वाधिक रुग्ण पंढरपूर आणि बार्शी तालुक्यात असल्याने या दोन तालुक्यानी तर अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली असून प्रशासनाने या दोन तालुक्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
कोरोनाचे नवे रुग्ण झपाट्याने वाढत असले तरी लोक अजूनही बेफिकीर दिसत आहेत. कोरोना नियमांचे पालन केले जात नसल्याचे रस्त्यारस्त्यावर दिसत असून विनामास्क लोक मोकाट फिरतात परंतु त्यांना रोखणारे आणि दंड करणारे कुणी फारसे दिसत नाही. पंढरपूर शहरात तर सतत भाविकांची वर्दळ असते आणि कोरोना नियमांचे पालन केले जात नाही. बाजारात गर्दी करून उभे असलेले अनेक लोक दिसत आहेत पण कारवाई होत नसल्याने प्रशासनाची भीतीही कुणाला वाटत नाही. पंढरपूर तालुक्याला मागच्या दोन्ही लाटेत मोठा तडाखा बसला आहे त्यामुळे यावेळी तरी नागरिकांनी स्वयंशिस्त बाळगण्याची गरज आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !