BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२० फेब्रु, २०२२

पोलिओ डोस दिल्याने बालिकेचा मृत्यू झाल्याचा आरोप !

 



 

वाशीम : पालघर येथील एक घटना नुकतीच पोलीस ठाण्यापर्यंत गेली असताना आता वाशीम येथे चुकीचा पोलिओ डोस दिल्याने दोन महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे.


कोरोनाला अटकाव करणाऱ्या कोरोना प्रतिबंधात्मक लस वरदान ठरली असल्याचे दिसत असताना या लसीबाबत देखील अशा प्रकारच्या तक्रारी पुढे आल्या आहेत परंतु आता पोलिओ डोसमुळे एका बालिकेचा मृत्यू झाल्याची तक्रार पालकांनी केली आहे. त्या आधी पालघर येथे एम. आर. आणि ट्रिपल बुस्टर डोसमुळे १६ महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप झाला आहे. पालघर जिल्ह्यातील कोशिमशेत या गावातील ही घटना आहे आणि या आरोपावर आता पोलीस आणि आरोग्य विभाग यांच्याकडून लगेच चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. सदर आरोपामुळे पालकवर्गात मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील निम्बी गावात दोन महिन्याच्या एका बालिकेस पोलीस डोस देण्यात आला होता. त्यानंतर तिच्या मेंदूने  काम करणे बंद केले. या बालिकेला तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान बालिकेचा मृत्यू झाला. डोक्यात ताप गेल्याने हा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. कासोळा आरोग्य केंद्राच्या अंतर्गत हा डोस देण्यात आला होता. डोस दिल्याच्या रात्रीच या मुलीच्या मेंदूने काम करणे बंद केले होते याबाबत तिच्या पालकांनी तक्रार केली आहे. खाजगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथून अकोला येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आला होता. 


चुकीचा पोलिओ डोस पाजल्यामुळे या बालिकेचा मृत्यू झाला असल्याचा आरोप पालकांनी केला असून या घटनेने खळबळ उडाली आहे.  आरोग्य विभागाने मात्र आपली जबाबदारी झटकली असून डोस दिल्याने असे काही घडलेले नाही असे त्यांनी म्हटले आहे. शासनाच्या नियमाप्रमाणेच लसीकरण करण्यात येत असून २४ तासात त्याचे परिणाम जाणवतात. या बालिकेचा मृत्यू डोस दिल्याने झाला नसल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. या घटनेमुळे मात्र पालकांची झोप उडाली आहे.  काही दिवसांपूर्वीच पालघर येथे देखील अशा प्रकारची घटना घडल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. 


बालकाच्या मृत्यूची तक्रार !


पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील या गावात सर्वेश अशोक धोंडी या १६ महिन्याच्या मुलास एका नर्सने घरी जाऊन एम.आर. आणि ट्रिपल बुस्टर डोस दिला. १० फेब्रुवारी रोजी हा डोस देण्यात आला त्यावेळी ९ तारखेलाच मुलाला १६ महिने पूर्ण झाले आहेत त्यामुळे उशिराने डोस द्यावा असे आपण सांगूनही नर्सने ऐकले नाही असा आरोप मयत सर्वेश अशोक धोंडी याच्या आईने केला आहे. नर्सने डोस दिल्यानंतर थोड्या वेळातच सर्वेशला ताप आला पण डोस दिल्याने ताप आला असेल असे समजून नर्सने दिलेले औषध त्याला देण्यात आले पण त्याला आराम मिळाला नाही. 


सर्वेशची प्रकृती अधिकच बिघडत गेल्याने त्याला जवळच्याच खाजगी दवाखान्यात नेण्यात आले पण मुलाला खूप ताप असल्याने आणि आकड्या येत असल्याने तेथे उपचार दिले गेले नाहीत. तेथील डॉक्टरांनी सर्वेशला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले पण उपचाराच्या आधीच १६ महिने वयाच्या सर्वेशचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांनी म्हटले आहे. या घटनेने प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत असून आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.  


मृत्युमुखी पडलेल्या सर्वेशच्या कुटुंबीयांनी मोखाडा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली असून संबंधित दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. आरोग्य विभागाने देखील याची गंभीर दखल घेतली असून आरोग्य विभागाच्या वतीने देखील चौकशी सुरु केली आहे. अवघ्या १६ महिन्याच्या मुलाचा अशा प्रकारे प्राण गेल्याने मात्र परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर तशाच प्रकारची दुसरी घटना समोर आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !