सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांना न्यायालयाने तीस हजाराच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
भाजपचे आमदार नितेश राणे यांना शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. दरम्यान राणे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल केले आहे. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर जामिनासाठी राणे यांनी न्यायालयात अर्ज केला होता. ४ फेब्रुवारीस दाखल केलेल्या अर्जावर ८ फेब्रुवारीस सुनावणी पूर्ण झाली होती आणि त्यावर जिल्हा सत्र न्यायालयाने आज आपला निकाल दिला आणि तीस हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर नितेश राणे यांना जामीन मंजूर केला आहे.
संतोष परब हल्ल्यात नाव आल्यापासून राणे यांनी प्रचंड धावाधाव केली होती. अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्यांनी धाव घेतली होती. पोलिसांची अटक टाळण्यासाठी त्यांनी अखंड आणि अविरत प्रयत्न केले परंतु त्यांना कुठल्याची न्यायालयात दिलासा मिळाला नाही. अखेर त्यांना या प्रकरणात अटक होऊन मगच जामीन मिळाला आहे. नितेश राणे यांचे वडील आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या प्रकरणात राज्यातील महाविकास आघाडीला बरेच सुनावले होते. अलीकडेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यानाही अटक झाली होती आणि त्यांना जामीनही लगेच मिळाला होता. नितेश राणे यांना मात्र जामीन मिळविण्यासाठी मोठी धावाधाव करावी लागली.
काही अटींवर जामीन !
आमदार नितेश राणे यांना जामीन देण्यात आला असला तरी न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत. राणे यांना कणकवली तालुक्यात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. कणकवली सोडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ते कुठेही जाऊ शकतात. दोषारोप पत्र दाखल होईपर्यंत त्यांना कणकवली प्रवेश बंद करण्यात आला आहे. शिवाय आठवड्यातून एकदा राणे यांना ओरस पोलीस ठाण्यात हजेरी द्यावी लागणार आहे.
वाचा ::>
महावितरण अभियंता प्रकरण : दोन पत्रकारासह तिघांवर खंडणीचा गुन्हा दाखल !

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !