BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२० जाने, २०२२

सोमवार पासून राज्यातील सर्व शाळा सुरु होणार !



मुंबई :  कोरोनाचा  प्रादुर्भाव असला तरी सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरु होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. शाळा सुरु करण्याबाबत पालक आणि विद्यार्थी यांच्यातून सतत मागणी होत होती. 


कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली असताना आणि कोरोनाचे रुग्ण वाढत असताना शासन एकेक निर्बंध लागू करीत आहे पण आज मात्र राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत मोठा निर्णय झाला आहे. राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्री यांच्याकडे एक प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाद्वारे येत्या सोमवारपासून शाळा सुरु करण्याबाबत विनंती करण्यात आली होती. या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनुकुलता दर्शविल्याने आता सोमवार २४ जानेवारी पासून राज्यातील सर्व शाळा पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीच ही माहिती दिली आहे. शाळा सुरु करण्याबाबत मान्यता देण्यात आली आहे परंतु स्थानिक प्रशासनाने याबाबत निर्णय घ्यावा असे या प्रस्तावात म्हटले गेले होते.  

 

पालक, शिक्षणतज्ञ आणि समाज माध्यमाद्वारे अनेकांकडून शाळा सुरु करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होत होती त्यामुळे या काळात आम्ही अनेक स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांच्याशी चर्चा केली आणि  त्यानंतर हा निर्णय घोषित करण्यात येत असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.  कोरोनाची तिसरी लाट आली असली तरी ती ओसरत असल्याचे गेल्या चार दिवसापासून दिसून येत आहे आणि त्यामुळेच शाळा सुरु करण्याची मागणी वाढत आहे. याआधी शाळा टप्प्याटप्प्याने सुरु व्हाव्यात मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले होते. 


कोरोनामुळे बंद पडलेल्या शाळा पुन्हा सुरु झाल्या आणि लगेचच पुन्हा बंद कराव्या लागल्या होत्या. गेल्या वीस दिवसांपासून या शाळा बंद होत्या पण आता त्या पुन्हा सुरु होत आहेत. त्यामुळे १५ फेब्रुवारीच्या आधीच ऑफलाईन वर्ग सुरु केले जाणार आहेत. जेथे रुग्णांची संख्या कमी असेल अशा स्थानिक पातळीवर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी अथवा आयुक्त यांना शाळा सुरु करण्याबाबत अधिकार दिले आहेत शाळा सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री यांना प्रस्ताव सादर केलेला होताच पण मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहितीही वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. 


शाळा पुन्हा सुरु करण्यासाठी काही नियमावली निश्चित करण्यात आली असून स्थानिक प्रशासनाला शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले असणे आवश्यक आहे. शाळेत जाऊन लसीकरण करता येईल का याचीही पडताळणी करण्यात येणार आहे. सोमवार पासून म्हणजे येत्या २४ जानेवारी पासून पहिली ते बारावी पर्यंत सर्व शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाची स्थानिक परिस्थितीचा अंदाज स्थानिक प्रशासनाने घ्यावा, केवळ एकाने निर्णय घेतला म्हणून दुसऱ्याने तसा निर्णय घेऊ नये असे देखील सांगण्यात आले आहे.    



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !