चाकूर : पोलिसांनीच छापा टाकून शासकीय निवासस्थानात जुगार खेळताना पकडलेल्या पोलिसासह चौदा जुगाऱ्याना न्यायालयाने एक महिना साधी कैद आणि दंड अशी शिक्षा सुनावल्याने आरोपींना तुरुंगात घालणाऱ्या पोलीस दादालाच जेलची हवा खाण्याची पाळी आली आहे.
होत असलेले गुन्हे रोखणे आणि गुन्हा केलेल्या आरोपींना वठणीवर आणण्याचे काम पोलीस करीत असतात पण अनेकदा पोलिसच कायद्याच्या विरोधात वागताना दिसतात आणि मग त्यांनादेखील कायद्याप्रमाणे शिक्षा भोगण्याची वेळ येते. असाच प्रकार लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे घडला आहे. पंचायत समितीच्या परिसरातील सभापती निवासस्थानात तिर्रट नावाचा जुगार खेळताना पोलिसासह पंधरा जणांना पोलिसांनी छापा टाकून पकडले होते आणि त्यांच्यावर गुन्हा दाखला केला होता. या पंधरा जणांना एक महिन्याची साधी कैद आणि प्रत्येकी दोनशे रुपये दंड अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.
चाकूर पंचायत समिती सभापती यांच्या निवासस्थानी ५ नोव्हेंबर २०१४ रोजी पैसे लावून तिर्रट नावाचा झुगार खेळला जात होता. याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर तत्कालीन उप विभागीय पोलीस अधिकारी वैशाली शिंदे यांनी छापा टाकून जुगार खेळताना रंगेहात पकडले होते. यावेळी जुगाराच्या साहित्यासह १५ हजार २३० रुपये जप्त करण्यात आले होते. त्यावेळचे पंचायत समिती सभापती चंद्रकांत मारापाल्ले हे देखील यावेळी उपस्थित होते परंतु प्रत्यक्षात जुगार खेळत नव्हते. विशेष म्हणजे जुगार खेळणाऱ्यात मल्लिकार्जुन पलमटे या पोलिसाचाही समावेश होता. त्याच्यावरही कारवाई करण्यात आली होती.
जुगार खेळत असलेल्या सर्वावर पोलिसांनी मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४ आणि ५ नुसार गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी चाकूर न्यायालयात झाली आणि न्यायालयाने त्यांना दोषी धरले. राजकीय वैमनस्यातून कट रचून पोलिसांनी ही कारवाई केली असल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वतीने करण्यात आला पण न्यायालयात हा राजकीय कट असल्याचे सिद्ध करता आले नाही त्यामुळे न्यायालयाने पोलिसासह सर्वाना एक महिना साधी कैद आणि प्रत्येकी दोनशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास पाच दिवसांचा अधिक कारावास भोगावा लागणार आहे. सभापती भवनात हा प्रकार सुरु असल्याचे उघडकीस आले होते तेंव्हा संपूर्ण लातूर जिल्ह्यात या घटनेची चर्चा सुरु होती. न्यायालयाच्या निकालाने पुन्हा एकदा हा विषय चर्चेला आला आहे.
- पंढरपूर कारागृहात कोरोनाचा शिरकाव !
- सोमवारपासून शाळा होणार सुरु !
- नवजात बालकाला फेकले कडाक्याच्या थंडीत उघड्यावर !
- तरुणाची आत्महत्या ! एस टी संपामुळे आर्थिक अडचण !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !