BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ मे, २०२२

रस्त्यावर मोटारीतच बेकायदा गर्भलिंग परीक्षण !

 



इंदापूर : कायद्याने गुन्हा असताना देखील रस्त्यावर एका वाहनात बेकायदेशीररित्या गर्भलिंग परीक्षण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 


गर्भलिंग परीक्षण करणे हा कायद्याने गुन्हा असला तरी काही गल्लाभरू डॉक्टर चोरून असे प्रकार करीत असल्याचे अधूनमधून प्रकाशात येत असते. आजवर अनेक रुग्णालये आणि असा बेकायदेशीर प्रकार करणारे डॉक्टर तुरुंगात गेले आहेत तरीही चोरट्या मार्गाने पैसा कमविण्याच्या उद्देशाने असे प्रकार घडताना दिसतात. आजवर रुग्णालयात काही डॉक्टर गुपचुपपणे हा बेकायदा उद्योग करीत होते परंतु एक टोळी गावोगाव फिरून मोटारीतच रस्त्यावर गर्भवती महिलांचे गर्भलिंग परीक्षण करीत असल्याचे आढळले आहे. मिळालेल्या माहितीवरून इंदापूर येथील वैद्यकीय पथकाने या मोठ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात यश मिळवले आहे. 


इंदापूर तालुक्यात सुरवड - भांडगाव रस्त्यावर बेकायदेशीर गर्भलिंग परीक्षण करणाऱ्या पाच जणांच्या एका टोळीवर वैद्यकीय पथक आणि पोलीस यांनी संयुक्तपणे कारवाई करून लिंगपरीक्षण करणाऱ्या दोन यंत्रासह मोबाईल संच आणि अन्य वैद्यकीय साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे. सदर प्रकरणी इंदापूर उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष खामकर यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. खामकर यांना एका वाहनातून गर्भलिंग परीक्षण केले गेल्याची माहिती मिळाली होती. एमएच ११ सीजी ८०१६ क्रमांकाच्या या वाहनातून गावोगाव फिरून एक टोळी बेकायदेशीर गर्भलिंग परीक्षण करीत असल्याची माहिती त्यांना प्राप्त झाली होती. 


वैद्यकीय अधीक्षक डॉ. खामकर यांनी इंदापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून या टोळीबाबत माहिती दिली आणि वैद्यकीय पथकासह पोलिसांचे पथक घेवून ते या गाडीचा मागोवा घेण्यासाठी निघाले. सदर वाहनाचा शोध घेतला जात असताना सदर क्रमांकाचे वाहन सुरवड - भांडगाव रस्त्यावर हे वाहन त्यांच्या निदर्शनास आले. डॉक्टरांच्या पथकाने या वाहनाची तपासणी केली असता दोन व्यक्ती एका गर्भवती महिलेचे गर्भलिंग परीक्षण करीत असताना त्यांना आढळून आले. (Illegal gynecological examination in the vehicle) त्यांना ताब्यात घेतल्यानंतर अनेक महिलांचे गर्भलिंग परीक्षण त्यांनी केले असल्याची माहिती समोर आली. 


पाच जणाविरुद्ध गुन्हा 

सदर प्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील कोळेगाव येथील डॉ. सुशांत हनुमंत मोरे, डॉ. हनुमंत ज्ञानेश्वर मोरे, त्यांची पत्नी कमल हनुमंत मोरे, फलटण तालुक्यातील राजाळे येथील लॅब टेक्निशियन प्रवीण देशमुख, वाहन चालक रौसिफ अहमद शेख यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !