शोध न्यूज : वाळू वाहतूक सुरळीत चालू देण्यासाठी तहसीलदार यांच्या वाहनावरील चालकानेही तब्बल दरमहा पंधरा हजार रुपयांची लाच मागितल्याचे प्रकरण समोर आले असून, या चालकाला रंगेहात पकडण्यात देखील आले आहे. राज्यातील वाळूत कुणाकुणाचे काय काय मुरतेय हेच यातून पुन्हा एकदा समोर आले आहे.
वाळूचोरी आणि महसूल विभाग यांच्यातील नाते कशा प्रकारचे असते याबाबत आता कुणीही अनभिज्ञ राहिलेले नाही. राज्यभर वाळूचोर फोफावले आहेत आणि महसूल विभाग त्यांच्यावर कारवाई करीत आहे. गुन्हे दाखल करीत आहे, वाळू चोरीच्या बोटी फोडत आहे, पोलीस वाळू चोरांना हद्दपार करीत आहे. वाळू चोरीच्या कारवाया केल्याच्या बातम्या झळकतात पण वाळू चोरी मात्र काही केल्या थांबत नाही हे जळजळीत वास्तव आहे. वाळू व्यावासायीकांकडून लाच घेताना महसूल विभागाचे अनेक अधिकारी कर्मचारी रंगेहात पकडले गेलेत हे देखील एक वास्तव आहे. त्यामुळे वाळू चोरी का फोफावते ? त्याना कुणाची साथ मिळते? अशा प्रश्नाची उत्तरे या घटनाच देत असतात. आता तर तहसीलदार यांचा वाहन चालक महिन्याला पंधरा हजार रुपयांचा हप्ता मागत असल्याचे एक धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तहसीलदार यांच्या वाहनावर वाहन चालक म्हणून काम करीत असलेल्या अनिल शिवराम सुरवसे याने पंधरा हजार रुपयांच्या लाचेचा मासिक हप्ता मागितला आणि आठ हजार रुपयांचा पहिला हप्ता घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले आहे. लोहारा येथील असलेला हा अनिल सुरवसे कळंब येथे तहसील कार्यालयात कार्यरत आहे. कळंब तहसीलदार यांचा वाहन चालक म्हणून कार्यरत असताना त्याने, एकाकडे वाळू वाहतूक सुरळीत सुरु ठेवण्यासाठी दरमहा पंधरा हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी केली. अखेर यात तडजोड होऊन, दर महिन्याला या सुरवसे याला आठ हजार रुपयांचा हप्ता लाच म्हणून देण्याचे ठरले. वाळूची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीला मात्र ही लाच देणे मान्य नव्हते त्यामुळे त्याने थेट लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले.
सदर व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर या विभागाने आपली कारवाई सुरु केली. लाचेच्या मागणीची पडताळणी केल्यानंतर या विभागाच्या पथकाने सापळा लावला. ठरल्यानुसार आठ हज्रार रुपयांचा हप्ता अर्थात लाचेची रक्कम स्वीकारत असताना, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सुरवसे याला रंगेहात पकडला. आपल्या भोवती लावलेल्या सापळ्याची सुरवसे याला कसलीही जाणीव झाली नाही. (Sand business, bribe driver caught red-handed) लाचेची रक्कम स्वीकारताच पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. कळंब पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी पगाराशिवाय मिळणाऱ्या हप्त्याचा मोह त्याला झाला पण पैसे मिळण्याऐवजी हातात बेड्या आणि तुरुंगात रवानगी त्याच्या नशिबी आली. वाहन चालक देखील हप्ते घेत असल्याचे पाहून सर्वसामान्य नागरिकांना मात्र धक्का बसला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !