BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१७ जाने, २०२२

कोरोना झाला की आता थेट कोविड सेंटर !

 


सोलापूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा आवाका वाढत असताना सोलापूर जिल्हाधिकारी यांनी नवा निर्णय घेतला असून कोरोनाची बाधा होताच थेट कोविड सेन्टरमध्ये दाखल व्हावे लागणार आहे.


कोरोनाची तिसरी लाट आता सुरु झालेलीच आहे आणि रुग्णांची संख्या रोज आणि झपाट्याने वाढत चालली आहे. शासन आणि प्रशासन यांनी  कितीही कोकलून सांगितले तरी नियमन पायदळी तुडविणारे आणि कोरोनाबाबत बेफिकीर असणारे लोक आपल्याच पद्धतीने समाजात वावरताना दिसत आहेत. मास्कचा वापर करण्यात काहीही अडचण नसली तरी मास्क न वापरणारे रस्त्यारस्त्यावर  मोठ्या संख्येने आजही दिसत आहेत. हे लोक समाजाचे खऱ्या अर्थाने शत्रू असून कोरोनाचे वाहक आणि प्रसारक आहेत. स्वतःच्या आरोग्याची आणि प्राणाची चिंता याना नसली तरी दुसऱ्यांचे प्राण यांच्यामुळे संकटात येतात याची जाणीवही याना होत नाही. अशा बेफिकीर लोकांमुळे प्रशासनाला निर्बंध अधिक कडक करण्याची वेळ येत आहे. 


सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आता आणखी एक निर्णय लागू केला असून कोरोना पॉझिटिव्ह आल्यास त्या रुग्णाला आता घरी राहून उपचार घेता येणार नाहीत. त्याला थेट तालुक्यातील कोविड सेंटरमध्येच दाखल व्हावे लागणार आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात अधिक तीव्र स्वरूपाची लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरणात ठेवून उपचार दिले जात होते. सुरुवातीला रुग्णांनी काळजी घेतली आणि इतरांशी संपर्क होऊ दिला नाही परंतु नंतरच्या काळात हे घडत नव्हते. कोरोना पॉझिटिव्ह असले तरी बाहेर फिरून संसर्ग वाढीस कारणीभूत ठरत होते. नंतर प्रशासनाने घरातील विलगीकरण बंद केले आणि प्रत्येकाला कोविड सेंटर बंधनकारक केले होते. आता पुन्हा त्याच पद्धतीने कोरोना बधिताला कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावे लागणार आहे. 


ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत आणि सोलापूर जिल्ह्यात देखील ही वाढ सुरूच आहे त्यामुळे प्रशासन कुठलीही रिस्क घेण्याच्या तयारीत नाही. मागील दोन्ही लाटेत सोलापूर जिल्ह्यात  कोरोनाने प्रचंड धुमाकूळ घातला आणि मोठा विध्वंस केलेला आहे. त्यासाठी दक्षता म्हणून जिल्हा प्रशासनाने प्रत्येक तालुक्यात दोन कोविड सेंटरची निर्मिती केली आहे. शहर आणि ग्रामीण भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना आता घरी उपचाराची परवानाही देण्यात येणार नाही. पॉझिटिव्ह आलेल्या प्रत्येक रुग्णांना कोविड सेंटरमध्येच दाखल होणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोना पॉझिटिव्ह असूनही घरीच उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे त्यामुळे अशा रुग्णांना कोविड सेंटरमध्ये भरती करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दोन कोविड सेंटर तयार करण्यात आले असून पुढील आठवड्यापर्यंत कोविड सेंटरमध्ये वाढ केली जाणार आहे


कोरोना रुग्ण वाढत असल्याने प्रशासन अधिक सतर्क आणि गतिमान झाले असून लसीकरण मोहिमेस गती देण्यात येत आहे. सद्या दररोज दोन हजारापर्यंत कोरोना चाचण्या करण्यात येत असल्या तरी काही दिवसांत या चाचण्या तिपटीने वाढविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे. प्रत्येक तालुक्यात शहरी भागात २४ तास चाचण्या सुरु ठेवण्यात येणार आहेत. लसीकरण मोहिमेला देखील अधिक गती देण्यात येणार असून जिल्ह्यातील २१ हजार बचत गटांना सहभागी करून त्यांना लसीकरणाचे उद्दिष्ठ दिले जाणार आहे. आत्तापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील १५ ते १८ वयोगटातील ६० हजार मुलांना लस देण्यात आली आहे.    




 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !