BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२९ मे, २०२२

लाकडी निंबोडी सिंचन योजनेच्या कामाला गती !

 


पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातून विरोध झाला तरी इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेच्या कामास गती येऊ लागली असून या कामाचे टेंडर देखील काढण्यात आले आहे.


इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा सिचन योजनेसाठी उजनीचे पाणी पळविले जात असल्याचा आरोप करीत या योजनेला सोलापूर जिल्ह्यातून विरोध होत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तर या विषयावर आंदोलन सुरु केले असून सदर योजनाच रद्द करण्याची मागणी केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि शेतकरी विरोधात उभे राहिले असताना आणि यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा राजीनामा मागितला जात असताना इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी योजनेच्या कामाला प्रशासकीय पातळीवर गती देण्याचे काम सुरु झाल्याने सोलापूर जिल्ह्यातून होत असलेला विरोध डावलून या योजनेला पाणी दिले जाणार हे आता स्पष्ट झाले आहे. (Work on the Lakadi Nimbodi scheme begins)


सदर योजनेसाठी शासनाने निधी मंजूर केल्यानंतर योजनेचे काम सुरु होणार हे उघड होते. त्यानुसार महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत भीमा कालवा मंडळ सोलापुर यांच्याकडून या योजनेसाठी दरपत्रक मागविण्यात आले आहे. डीपीआर तयार करण्यासाठी पूर्वानुभव असलेल्या मान्यताप्राप्त एजन्सीकडून हे दरपत्रक मागविले गेले आहे. या टेंडरचे प्रसिद्धीकरण वृत्तपत्रातून करण्यात आले १ जून पर्यंत संबंधित एजन्सीना दरपत्रक सादर करण्यास सांगण्यात आले आहे. उजनी कालवा विभाग क्रमांक ८ हा विभाग या योजनेला गती देत असून आता काही झाले तरी ही योजना होणार आहे. 


काम बंद पाडू - घाटणेकर 

सोलापूर जिल्ह्यात या योजनेला विरोध होत असला तरी प्रशासकीय पातळीवर या कामास वेगाने प्रारंभ झाला आहे त्यामुळे काही नेतेमंडळीत प्रचंड अस्वस्थता असून या योजनेच्या सर्वेक्षणासाठी नेमलेल्या एजन्सीचे काम बंद पाडण्याचा इशारा देत कोणत्याही परिस्थितीत उजनीच्या पाण्याला हात लावू दिला जाणार नाही असा निर्धार शेतकरी नेते संजय पाटील घाटणेकर यांनी केला आहे. 


स्वाभिमानी आक्रमक 

इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी (Lakadi Nimbodi) उपसा सिंचन योजनेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपला प्रखर विरोध कायम ठेवला आहे. शासनाने निधी दिला असला तरी सदर योजना रद्द करावी अशी मागणी शेतकरी संघटनेने लावून धरली असून त्यासाठी आंदोलन सुरु केलेले आहे. 


ही योजना जुनीच !.

सदर योजना ही जुनीच असून कुणाच्याही वाट्याचे पाणी इंदापूरला नेले जात नसल्याचा खुलासा वारंवार राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून करण्यात येत आहे तर सोलापूर जिल्ह्याप्रमाणे इंदापूर तालुक्यातील देखील शेतकरीच आहेत, शेतकऱ्यांनी दुसऱ्या शेतकऱ्यांना विरोध करू नये अशी अपेक्षाही काही जण व्यक्त करीत आहेत. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !