BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२८ मे, २०२२

लाखो रुपयांचे सोने असलेली पर्स झाली बेपत्ता आणि ---

 


पंढरपूर : पंढरपूरमधील आपल्या मुलीस देण्यासाठी चालविलेले २१ तोळे सोने हॉटेलमध्येच विसरले पण हॉटेल चालकांनी ते सोने परत केल्याने आजही समाजात प्रामाणिकपणा (Honesty) शिल्लक उरला आहे याचेच प्रतिबिंब दिसून आले. 


बदलत्या युगात दुसऱ्याचे ओरबाडून आणि हिसकाऊन आणि चोरून घेत असल्याच्या घटना रोज आपल्या आजूबाजूला घडताना दिसतात. घरात चोरी होण्याच्या घटना घडत असतात तशा बाहेर पडल्यावर देखील महिलांच्या गळ्यातील दागिने देखील सुरक्षित रहात नाहीत. पैशासाठी समाजाची पातळी अत्यंत ढासळली असताना आणि स्वार्थ साधण्यासाठी माणूस माणसांच्या जीवावर उठलेला असताना आजही समाजात काही चांगली माणसं आहेत याचा प्रत्यय अधूनमधून येत असतो. टेंभुर्णी येथील हॉटेल वैष्णवी चे चालक गणेश खटके आणि रवी खटके यांनी समाजातील हाच चांगुलपणा दाखवून आजच्या काळात 'सॅल्यूट' करावा असे काम केले आहे. 


करमाळा येथील शिक्षक दाम्पत्य पंढरपूर येथील आपल्या मुलीकडे निघाले होते. मुलीला देण्यासाठी २१ तोळे सोन्याचे दागिने त्यांनी आपल्या सोबत घेतले होते. पंढरपूरकडे येत असताना ते टेंभुर्णी येथील कुर्डुवाडी पुलाजवळ असलेल्या 'हॉटेल वैष्णवी' येथे नाष्टा करण्यासाठी थांबले होते. तेथून ते पुढे पंढरपूरला पोहोचले. मुलीच्या घरी पोहोचल्यावर त्यांना धक्का बसला. २१ तोळे सोने आणि एक लाख रुपये रोख असलेली त्यांची पर्स प्रवासात हरवली असल्याचे लक्षात आले. करमाळा ते पंढरपूर मार्गावर ही पर्स नक्की कुठे हरवली याचा काहीच अंदाज त्यांना नव्हता. लाखो रुपयांचे सोने आणि रोख रक्कम ठरविल्याने शिक्षक दांपत्य अस्वस्थ झाले. महिलेच्या डोळ्यातून तर अश्रूधारा बरसू लागल्या होत्या. ही पर्स शोधायची कुठे ? कुणाला सापडली असेल तरी एवढे सोने परत करण्याचे मोठेपण कुणाजवळ असणार आहे? असे अनेक प्रश्न त्यांच्या समोर होते. 


सोने आणि रोख रक्कम असलेल्या हरवलेल्या पर्समध्येच त्यांचा मोबाईल देखील होता. या मोबाईलवर त्यांनी कॉल करून पहिला असता सदर कॉल घेतला गेला. खरे तर एव्हाना सोने गायब करून मोबाईलची सीम कार्ड काढून फेकून दिले गेले असते पण हा कॉल घेतला गेला. 'हॉटेल वैष्णवी' चे चालक खटके बंधू यांनीच हा कॉल घेतला आणि 'तुमची पर्स आमच्याकडे सुखरूप आहे. आपण काहीही काळजी करू नका' असे खटके बंधूनी सांगितले. (Millions of gold returned to hotel forgotten) शिक्षक दांपत्यांना हे सगळे अविश्वसनिय वाटत होते. लाखो रुपयांचे दागिने सुरक्षित असल्याचे आजच्या काळात कुणी सांगतेय याचे त्यांना कौतुक वाटत राहिले. 


आणि पर्स मिळाली !

हरवलेल्या पर्सचा ठावठिकाणा मिळताच शिक्षक दांपत्य पंढरपूर येथून टेंभुर्णीला पोहोचले. हॉटेल वैष्णवीचे चालक गणेश खटके आणि रवी खटके यांनी सदर पर्स त्यांच्या ताब्यात दिली. पर्स पाहून महिलेच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू वाहू लागले. आजच्या जमान्यात विश्वास न बसण्यासारखी घटना घडलेली होती. हरवलेली लाखो रुपयांची पर्स या शिक्षक दांपत्याला सुरक्षित परत मिळाली होती. 


बक्षीस नाकारले !

खटके बंधूनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाची तुलना अनमोल असून त्याची कशाशीही तुलना होऊ शकत नाही तरीही या दांपत्याने अंत्यंत आनंदाने पर्समधील रोख रक्कम प्रामाणिकतेचे बक्षीस म्हणून देऊ केली पण खटके बंधूनी हे बक्षीस घेण्यास नकार दिला. "सदर दागिने आणि रक्कम तुमचीच असून तुम्हाला ती परत देणे हे आमचे कर्तव्यच आहे " असे सांगत अंत्यंत नम्रपणे त्यांनी बक्षिसाची रक्कम नाकारली! 


खटके बंधूंचा सन्मान !

हिंदवी स्वराज्य प्रतिष्टानचे संस्थापक विजय खटके पाटील यांच्या वतीने खटके बंधूंच्या प्रामाणिकतेचा सन्मान सभापती विक्रम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. खटके बंधूंच्या या प्रामाणिकतेची चर्चा आधी टेंभुर्णी परिसरात आणि नंतर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात सुरु झाली आहे.  


हे देखील वाचा :>>>>

खालील बातमीला टच करा !


अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !