BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ मे, २०२२

तीन बालकांचा बंधाऱ्यात बुडून दुर्दैवी अंत !



जळकोट : विवाह सोहळ्याच्या आनंदात सगळे असतानाच लग्न समारंभासाठी आलेल्या तीन शाळकरी मुलांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज जळकोट तालुक्यात लाळी खुर्द येथे घडली आणि विवाह सोहळ्याचा आनंद आक्रोशात गुदमरून गेला. 


लहान मुलांच्या बुडून मृत्युमुखी पडण्याच्या घटना गेल्या काही काळात सतत घडत आहेत. विशेषत: शेततळ्यात बुडून लहान मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना अधिक घडत आहेत. आज लाळी खुर्द येथे मात्र कोल्हापूर टाईप बंधाऱ्यात एकाचवेळी तीन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आणि अवघे गाव प्रचंड शोकात बुडून गेले. लाळी खुर्द येथील तुळशीराम तेलंगे यांच्या मुलीचा विवाह समारंभ आज गावात आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे तेलंगे परिवार आणि पाहुणे यांच्यात आनंदाचे आणि मंगलमय वातावरण होते. घरात पाहुण्यांची मोठी गर्दी झाली होती. लग्नाच्या निमित्ताने आलेल्या पाहुण्यात लहान मुलांचाही सहभाग होता आणि त्यातीलच तीन मुलांचा आज बुडून करुण अंत झाला आहे. 


लग्नाची लगबग आणि घरात पाहुण्यांची असलेली गर्दी त्यामुळे लग्नासाठी बाहेरगावावरून आलेली तीन शाळकरी मुले तिरू नदीवरील कोल्हापूर टाईप बंधाऱ्यावर अंघोळीसाठी गेली आणि तेथेच घात झाला. गेलेल्या तीन मुलांच्यापैकी दोन मुले पाण्यात पोहोण्यासाठी उतरली परंतु त्यांनी काठावरील तिसऱ्या मुलाला देखील पाण्यात उतरण्यास सांगितले आणि येथेच खरा घात झाला. (Three children drowned during wedding ceremony) तिसऱ्या मुलाला पोहोता येत नसताना दोन मुलांनी बोलाविल्यामुळे तिसरा पाण्यात उतरला. 


आणि तिघेही बुडाले !

दोन मुलांनी बंधाऱ्यात येण्यास सांगितल्यामुळे तिसरा मुलगा पोहोता येत नसताना पाण्यात उतरला आणि तो बुडू लागला. त्याची ही परिस्थिती पाहून पोहोता येणारी दोन्ही मुले त्याला वाचविण्यासाठी धावली. तिसऱ्या मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला जात असताना तो तर बुडालाच पण त्याला वाचविणारी दोन्ही मुले देखील पाण्यात बुडून मृत्युमुखी पडली. 


दोन सख्खे भाऊ मयत 

उदगीर येथील पंधरा वर्षे वयाचा एकनाथ हणमंत तेलंगे आणि बिदर जिल्ह्यातील चीमेगाव येथील चिमा बंडू तेलंगे (वय १६), संगमेश्वर बंडू तेलंगे (वय १४) हे तिघे  बुडून मृत्युमुखी पडले. मृत्यू झालेल्या  तिघात चिमा आणि संगमेश्वर हे  दोन सख्खे भाऊ होते. 


आनंद सोहळ्यात शोक 

विवाह समारंभात आनंदी वातावरण असताना ही करूण घटना समोर आली आणि आनंदी सोहळा शोकात बदलून गेला. शोकाकुल वातावरणातच लग्नाचा सोहळा आटोपण्यात आला. तीन शाळकरी अल्पवयीन मुलांच्या बुडून मृत्यू होण्याच्या या दुर्घटनेने प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

 

हे देखील वाचा :>>>>

खालील बातमीला टच करा !


अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !