BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२६ मे, २०२२

पंढरपूर बस स्थानकावर पुन्हा दोन लाखांची चोरी !

 




पंढरपूर : येथील बस स्थानकात पुन्हा एकदा प्रवाशांची चोरी झाली असून ठाणे येथील वकिलाच्या पत्नीचे दोन लाखांचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहेत त्यामुळे आता प्रवाशांची सुरक्षितता पूर्ण धोक्यात आल्याचे दिसत आहे. 


इंदापूर तालुक्यातील अवसरी येथील शुभांगी रेवणनाथ यादव यांच्या गळ्यातील मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना पंढरपूर बस स्थानकावर नुकतीच घडली होती. या घटनेची चर्चा सुरु असतानाच आता दुसरी घटना समोर आली असून प्रवाशांसाठी पंढरपूर बस स्थानक धोक्याचे ठरू लागले आहे. बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरटे प्रवाशांची चोरी करू लागले आहेत. सलग दुसरी घटना पंढरपूर बस स्थानकावर घडली असल्याने प्रवाशात देखील आता चिंता निर्माण झाली आहे. महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून नेण्याची घटना घडल्या पाठोपाठ आता प्रवासी महिलेची दागिन्यांची पर्स चोरट्यांनी लंपास केली आहे. 


मुंबई उच्च न्यायालयात वकील असलेल्या ऍड नामदेव मेटकरी (ठाणे) यांच्या पत्नी शीतल मेटकरी या मंगळवेढा तालुक्यातील मेटकरवाडी या आपल्या मूळ गावी गेल्या होत्या. ऍड. मेटकरी यांच्या पत्नी शितल, मुलगा उत्कर्ष आणि मुलगी गाथा हे म्हसवड येथे निघाले होते त्यामुळे ऍड मेटकरी यांनी आपल्या गाडीतून त्यांना पंढरपूर बस स्थानकात सोडले. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ऍड. मेटकरी यांच्या पत्नी शीतल आणि दोन मुले तुळजापूर - सातारा या बसमध्ये बसली. परंतु बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन शितल मेटकरी यांची दागिन्यांची पर्स अज्ञात चोरटयांनी लंपास केली होती. 


शितल मेटकरी यांच्या पर्समध्ये रियल डायमंड पेंडेंट सोन्याचे टॉप्स, साखळी,  वेल, सोन्याची अंगठी, चैन, चांदीची जोडवी, कानातील जोड असे सोन्याचांदीचे दागिने होते. एकूण १ लाख ९० हजार ३०० रुपयांचा ऐवज असलेली पर्स चोरटयांनी लंपास केली. 


चोरी लक्षात आली पण --

बसमध्ये बसल्यानंतर पर्स चोरी झाल्याचे शितल मेटकरी यांच्या लक्षात आले पण त्यांनी भीतीपोटी आपल्या पतीला याची माहिती दिली नाही. दुसऱ्या दिवशी मात्र त्यांनी फोनवरून आपले पती ऍड नामदेव मेटकरी याना या घटनेची माहिती दिली. (Theft of passengers at Pandharpur bus stand) त्यानंतर मेटकरी यांनी पंढरपूर शहर पोलिसात सदर चोरीबाबत फिर्याद दिली आहे. 


सलग दुसरी घटना 

इंदापूर तालुक्यातील अवसरी येथील  शुभांगी रेवणनाथ यादव पती आणि मुलांसोबत नातेवाईकांना भेटून त्या परत आपल्या गावी निघाल्या असता पंढरपूर बस स्थानकावर बसमध्ये चढताना त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने हिसकावले. मंगळसूत्रातील काही मणी यादव यांच्या हातावर ओघळले तेंव्हा हा प्रकार लक्षात आला परंतु पन्नास हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरून चोरटा पसार झाला. 


मंगळवेढा कनेक्शन !

दोन्ही घटनात मंगळवेढा कनेक्शन आहे हा योगायोग आहे की यामागे दुसरे काही नियोजन आहे हा प्रश्न आहे. शुभांगी यादव या देखील मंगळवेढा तालुक्यातील घरनिकी येथून पंढरपूर बस स्थानकात आल्या होत्या आणि दुसऱ्या घटनेतील मेटकरी कुटूंब देखील मंगळवेढा तालुक्यातील मेटकरवाडी येथून पंढरपूर बस स्थानकात आलेले होते.  


बसमध्ये चढताना चोरी !

पंढरपूर बस स्थानकावर झालेल्या दोन्ही चोरीच्या घटना या बसमध्ये चढताना झाल्या आहेत. फलाटावर बस लागली की जागा मिळविण्याच्या हेतूने प्रवाशी बसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत असतात. बसच्या दरवाजाजवळ मोठी गर्दी केली जाते. यावेळी ढकलाढकली आणि रेटारेटी होत असते. याच गर्दीचा फायदा घेत चोरटे कौशल्याने चोरी करून पसार होत आहेत.  


हे देखील वाचा :>>>>

खालील बातमीला टच करा !



अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा ! 


      


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !