BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ मे, २०२२

उजनीच्या पाण्याबाबत अजितदादांनी स्पष्टच सांगितलं ---

 



बारामती : उजनी  धरणाचे पाणी पळविण्याचे आरोप होत असताना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत स्पष्ट भाष्य केले असून सोलापूरकरांनी उजनीच्या पाण्याबाबत वस्तुस्थिती समजावून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे .


उजनी धरण हे सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले असून उजाड माळरानावर देखील या पाण्याने नंदनवन उभे केले आहे. हरितक्रांती केलेले उजनीचे पाणी अनेकदा संघर्षाची आग देखील ओकत असते आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ओतलेल्या या धरणाचे पाणी अधूनमधून पेटत असते. उजनीच्या पाण्याची पळवापळवी करण्याचे प्रकार आधीपासूनच घडत असल्याचे आरोप आहेत पण गेल्या दोन वर्षांपासून इंदापूरला पाणी नेण्याचा होत असलेला प्रयत्न अधिकच चिघळत गेला आहे. (Ajit Pawar's clarification regarding Ujani water and Guardian Minister) हा विषय राजकारणाच देखील होऊ लागला आहे.


सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे इंदापूर मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. इंदापूर तालुक्याला उजनीचे पाणी नेण्याचा विषय यापूर्वी देखील पेटला होता आणि लाभक्षेत्रातील शेतकरी आक्रमक झाल्यानंतर शासनाला देखील निर्णय फिरवावा लागला होता. राष्ट्रवादीचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीने काढावे अशी मागणी देखील होत होती.  त्यानंतर आता पुन्हा इंदापूरला उजनीचे पाणी नेण्याचा विषय ऐरणीवर आला आणि सोलापूर जिल्ह्यातील वातावरण पुन्हा चिघळू लागले आहे. आ. प्रणिती शिंदे, भाजपचे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनीही राष्ट्रवादी आणि पालकमंत्री यांना आव्हान दिले आहे. 


राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी कालच हा विषय झटकला आहे. उजनीच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर पाणी गेलेले नसून लवादाने ठरवून दिलेल्या हक्काप्रमाणेच पाणी दिले जात असल्याचे त्यांनी काल स्पष्ट केल्यानंतर आज राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरकरांना पाण्याची वस्तुस्थिती समजून घेण्याचे आवाहन केले आहे. उजनीच्या पाण्याचे पूर्वीच वाटप झाले आहे, उपसा सिंचन योजनेसह अन्य पाण्याचे हे नियोजन असून इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी योजना ही देखील त्याच काळातील आहे. ही योजना रखडली होती परंतु आता तिला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ही वस्तुस्थिती असून सोलापूरकरांनी ती लक्षात घ्यावी असे अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. 


इंदापूरला पाणी जाणार !

उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या या विधानाचा अर्थ स्पष्ट असून उजनीचे पाणी इंदापूर तालुक्यात जाणार हे आता उघड झाले आहे. हे पाणी देण्याचे नियोजन पूर्वीचेच असून ठरल्याप्रमाणे पाणीवाटप होणार असे दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि शेतकरी संघटना यांनी कितीही आंदोलने केली तर लाकडी निंबोडी योजनेस पाणी दिले जाणार हेच आता ठळकपणे समोर येत आहे. 


पालकमंत्री बदल होणार ?

कालपासून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना बदलले जाणार असल्याची चर्चा सोलापूर जिल्ह्यात सुरु झाली आहे. सोलापूरच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यानी बारामती येथे जाऊन शरद पवार यांची याबाबत भेट घेतलेली होती तेंव्हापासून या चर्चेला उधाण आले असले तरी पालकमंत्री बदलण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेत असतात. तशी कुणी मागणी केली असेल तर मला माहिती घ्यावी लागेल पण हा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्री यांचाच असतो असे सांगून तशी शक्यता नसल्याचे अजितदादा यांनी स्पष्ट केले आहे.    


अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !