BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२१ मे, २०२२

उजनी धरणाचे पाणी धरणाच्या कार्यक्षेत्रातच !



सोलापूर : उजनी धरणाचे पाणी  हे बाहेर कुठेही गेलेले नसून ते उजनी धरणाच्या कार्यक्षेत्रातच गेले आहे अशी अत्यंत स्पष्ट प्रतिक्रिया सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आज सोलापुरात दिली आहे. 


उजनी धरणाचे पाणी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरला पळविल्याचा आरोप रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी काल केला होता. खोत यांच्या या आरोपाला खोडून काढताना धनंजय मुंडे यांनी अत्यंत स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सोलापूर जिल्ह्यात उजनीच्या पाण्यावरून असंतोष निर्माण झाला आहे आणि याबाबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना जबाबदार धरले जात आहे.  शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेतच परंतु सोलापूर शहरातून देखील भरणेमामा यांच्यावर अत्यंत कडक शब्दात टीका करीत पाणी पळविले जात असल्याचा आरोप होत आहे. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी देखील पालकमंत्र्यांवर सडकून टीका केली आहे त्यामुळे उजनीच्या पाण्याचा वाद अधिकच पेटू लागला आहे. 


टेंभुर्णी येथील कार्यक्रमात रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी उजनी धरणाचे पाणी पळविले जात असल्याचा आरोप कालच केला होता. या आरोपावर बोलताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'सदाभाऊ खोत यांनी काय बोलावे हा त्यांचा प्रश्न आहे पण उजनी धरणाचे पाणी आत्तापर्यंत उजनीच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर गेलेले नाही. (Water of Ujani dam is in the working area) उजनीच्या कार्यक्षेत्रातच पाणी असून लवादाने या पाण्यावर ज्यांचा हक्क ठरवून दिला आहे त्या हक्काबाहेर कुणीही जाणार नाही' असे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. 


आ. प्रणिती शिंदे आक्रमक !

महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी उजनीच्या पाण्याबाबत अत्यंत आक्रमक पवित्रा घेत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 'सत्तेशी आम्हाला काही देणेघेणे नाही, उजनीचे पाणी पळवाल तर खबरदार, रान पेटवल्याशिवाय राहणार नाही' असा आक्रमक इशारा आ. प्रणिती शिंदे यांनी नुकताच दिला आहे. सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या आमदारांनीच सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला उघड आव्हान दिले आहे. 


सुभाषबापूंचाही इशारा !

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी तर राष्ट्रवादीचे नेते आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना निष्ठुर, स्वार्थी अशा उपमा देत इशारा दिला आहे. उजनीचे पाणी पळविण्याचा प्रयत्न केला तर भरणे यांना सोलापूर जिल्ह्यात पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा देखील देशमुख यांनी दिला आहे. 


पालकमंत्री बदलणार ?

उजनीच्या पाण्यावरून सोलापूर जिल्ह्यात असंतोष निर्माण झाला असून राष्ट्रवादी आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात वातावरण तयार होत असतानाच पालकमंत्री बदलले जाणार असल्याच्या हालचाली सुरु झाल्याची कुजबुज सुरु झाली आहे. मागील वर्षी देखील उजनीच्या पाण्याचा वाद असाच उफाळून आला होता आणि त्यावेळी देखील पालकमंत्री बदलले जाणार अशा वावड्या उडाल्या होत्या. त्यावेळचा निर्णय शासनाने मागे घेतला पण पालकमंत्री बदलले गेले नाहीत. आता पुन्हा या बदलाची चर्चा मात्र जिल्ह्यात सुरु झाली आहे.   


हे जरूर वाचा : >>> खालील बातमीला टच करा !



अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !