BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२० मे, २०२२

अडतीला नेले कांदे, रुपया मिळायचे झाले वांदे !

 




माढा : कष्टाने पिकवलेला कांदा मोठ्या अपेक्षेने अडतीला घेवून गेलेल्या शेतकऱ्याला रुपयाही मिळाला नाही उलट पदरचे सात रुपये देवून रित्या हाती माघारी परतावे लागल्याची घटना समोर आली आहे.


काळ्या आईची सेवा करताना पैशाबरोबर घामही गाळावा लागतो आणि या घामाचा दाम मिळेल या आशेने शेतकरी आर्थिक गणिते जुळवत असतो पण घाम ही गेला आणि दामही नाही अशी अनेकदा शेतकऱ्यावर वेळ येते. शेतकरी मोठ्या परिश्रमाने शेतात राबून उत्पादन घेतो आणि ते जेंव्हा बाजारात नेतो तेंव्हा त्याच्या कष्टाची किंमत मातीमोल असल्याचे पाहून तो निराश होत असतो. शेतीमालाला अपेक्षित भाव कधीच मिळत नाही पण बियाणे, खते, औषधे यांचासुद्धा खर्च निघत नाही आणि मग तो वेगळ्याच आर्थिक दुष्टचक्रात अडकतो. हा प्रकार अलीकडे तर नित्याचाच झाला आहे. माढा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यास असाच अनुभव आला आणि बाजारातून रुपयाही आणता आला नाही उलट खिशातलेच सात रुपये देवून त्याला घरी परतावे लागले आहे. 


कांद्याचा बाजार भरवशाचा कधीच राहिलेला नाही. कांद्याला चांगला भाव आहे असे वाटत असतानाच कांदा फुकट देण्याची अथवा शेतात खत म्हणून वापरण्याची वेळ अनेकदा शेतकऱ्यावर येत असते. कधी कांद्याला भाव मिळतो तर कधी दोन पाच रुपयावर देखील विकावा लागतो. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव एकदमच खाली आले असल्यामुळे अनेक उत्पादकांनी कांद्याची काढणीच केली नाही. ज्यांनी धाडस केले त्यांच्याही हाती काही लागले नाही. अडतीला नेण्याचा खर्च देखील निघताना दिसत नसून माढा तालुक्यातील अंजनगाव (खे.) येथील एका तरुण शेतकऱ्याची कथा अशीच आहे. कांद्याने डोळ्यात पाणी येईल की नाही हे सांगता येत नाही पण या शेतकऱ्याच्या कहाणीने मात्र डोळे ओलावाल्याशिवाय राहत नाहीत.


अंजनगाव (खेलोबा) येथील शेतकरी ओंकार पाटेकर यांनी दोन एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली. मोठ्या कष्टाने कांदा वाढवला. त्यासाठी एक लाखभर रुपये खर्च देखील करावा लागला. या कांद्यातून चार पैसे मिळतील ही आशा त्यांना होती पण कांदा काढणीला आला आणि बाजारात कांद्याला कवडीमोल किंमत येवू लागली. चार पैसे मिळण्याची आशा तर मावळलीच पण निदान केलेला खर्च तरी निघेल या आशेने त्यांनी ८५ पोती कांदा विभागून सोलापूर मार्केट कमिटीत नेला. (Onion prices cheaper, farmers disappointed) ४५ पोती कांदे अडतीला दिल्यावर केवळ गाडीचा खर्च निघाला पण उरलेल्या ४० पोत्यांनी त्यांना पुरते ओशाळून टाकले.  


पदरचे द्यावे लागले !
चाळीस पोती असलेला कांदा त्यांना अवघ्या एक रुपया किलो दराने द्यावा लागला. चाळीस पोती कांद्याचे  १ हजार ८८३ रुपये झाले पण तेवढी रक्कमही त्यांच्या नशिबात नव्हती. गाडीखर्च, हमाली, तोलाई याचा खर्च १ हजार ९५४ एवढा झाला. कांद्याच्या किमतीपेक्षा बाजारात नेण्याचा खर्चच अधिक झाला आणि पदरचे सात रुपये अडत व्यापाऱ्याला देवून त्यांना घरी परतावे लागले. 


कांदा सडलेला बरा !
पाटेकर यांना बाजारातील हा अनुभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यांच्या शेतात अजूनही ८० पोती कांदा पडून आहे. कांदा विकायला नेऊन पदरचे पैसे देण्यापेक्षा हा कांदा शेतातच सडलेला बरा अशी त्यांची भावना झाली आहे. भाव चांगला म्हणून कांदा लावला आणि फसगत झाली असे त्यांचे म्हणणे आहे. मागील वर्षी कांदा उत्पादकांना झालेला चांगला फायदा पाहून कांद्याची लागवड केली आणि कांद्यावर आर्थिक नियोजन केले होते पण फसगत झाली असे पाटेकर सांगत आहेत. 


हे जरूर वाचा : >>> खालील बातमीला टच करा !


अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !    



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !