BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२० मे, २०२२

पंढरपूर तालुक्यात वादळी पावसाने विध्वंस !

 



पंढरपूर : ऐन उन्हाळ्यात आलेल्या अवकाळी वादळी पावसाने पंढरपूर परिसरात विध्वंस केला असून पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा तडाखा दिला आहे. 


अवकाळी पावसाचा फटका शेतकरी बांधवाना नेहमीच बसत असतो पण यावर्षी अवकाळी पावसाच्या सततच्या येण्यामुळे उन्हाळ्यात शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. पंढरपूर तालुक्यात द्राक्ष बागा वाढत असताना वादळी वारे, गारपीठ आणि पाऊस याचा या आधीच मोठा तडाखा बसलेला असून शेतकरी संकटात आला आहे. त्यातच कालपासून पुन्हा पाऊस आणि वादळी वारे यामुळे अवकाळीच्या संकटाचा पुन्हा सामना करण्याची वेळ आली आहे. 


वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने आधीच व्यक्त केला होता पण उभ्या पिकांना या संकटापासून वाचविण्याचा काहीच मार्ग नसल्याने उघड्या डोळ्यांनी शिवारात होत असलेले नुकसान पहावे लागत आहे. पंढरपूर परिसरातील अनेक द्राक्षबागा अजूनही विकल्या गेल्या नाहीत त्यामुळे या द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसू लागला आहे. द्राक्षांचे दर कमी झाले असल्याने उत्पादक चिंतेत असताना आता सगळी स्वप्नं मातीमोल होण्याची परिस्थिती निसर्गाने केली आहे. 


कालच्या पावसाने सोलापूर जिल्ह्यात प्रचंड नुकसान केले आहेच शिवाय केळीच्या बागा अक्षरश: झोपल्या आहेत. आंब्यांचा सडा पडला आहे तर  डाळिंब, शेवगा यांचेही मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वारे यामुळे काही मिनिटात शेतकरी उध्वस्त झाला आहे. पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष बागांसह बेदाणा शेडचे नुकसान होऊन बेदाण्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अनवली, कासेगाव, भंडीशेगाव, वाखरी, पटवर्धन कुरोली, सुस्ते, मगरवाडी, फुलचिंचोली, बाभूळगाव, रोपळे या परीसरातील केळीच्या बागा जमिनीवर झोपल्या आहेत. झाडावरचे आंबे जमिनीवर विखरून पडलेले आहेत तर द्राक्ष बागा पुरत्या उध्वस्त झाल्या आहेत. (Damage caused by unseasonal rains in Pandharpur area) डोळ्यादेखत शेतकऱ्यांना हे भयावह चित्र पाहण्याची अत्यंत दुर्दैवी वेळ आली आहे. 


द्राक्ष उत्पादक कोसळले !

पंढरपूर तालुक्यातील अनेक द्राक्ष बागावर अजूनही द्राक्षांचे घड लटकत होते, द्राक्षांचे दर पडल्याने द्राक्ष उत्पादक अस्वस्थ असतानाच उभ्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे पण बेदाणा आणि शेड देखील उध्वस्त झाले आहेत. बेदाणा शेडचे पत्रे, जाळी वादळी वाऱ्याने उडून गेल्याने तर नुकसान झालेच पण बेदाणा देखील पावसात भिजला आहे. शेवग्याची फुले गळून गेली आहेत. एका दिवसात शेतकऱ्यांना हा खूप मोठा तडाखा बसला आहे. 


१९७ मिमी पावसाची नोंद !

पंढरपूर तालुक्यात एका दिवसात पडलेल्या पावसाची १९७ मिमी एवढी नोंद झाली आहे. करकंब - १३ मिमी,  पटवर्धन कुरोली २३ मिमी,  भंडीशेगाव ३० मिमी,  भाळवणी २२ मिमी,  कासेगाव १४ मिमी, पंढरपूर १९ मिमी,  तुंगत ३७ मिमी,  चळे २३ मिमी,  पुळूज १६ मिमी अशा  पावसाची मंडळनिहाय नोंद झाली आहे.


सांगोला, मंगळवेढ्यातही नुकसान 

पंढरपूर परिसरात सांगोला आणि मंगळवेढा तालूक्याती देखील वादळी पावसाने मोठे नुकसान केले  आहे. ज्वारीचे कोठार असलेल्या मंगळवेढ्यात द्राक्ष बागा असून या द्राक्षांना बाजाराची प्रतीक्षा असताना वादळी पावसामुळे द्राक्ष गळून खाली पडली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडून  पडले आहे. 


हे जरूर वाचा : >>>


अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !