BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ एप्रि, २०२२

भाजपची नामुष्की, कोल्हापुरात महाविकास आघाडीचा गुलाल !



कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी भारतीय जनता पक्षाच्या सत्यजित कदम यांचा पराभव करून १८ हजार ८०० मतांनी दणदणीत विजय मिळविला आहे. 

 

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक ही महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष यांनी प्रतिष्ठेची केली होती परंतु मतमोजणी सुरु झाल्यापासूनच महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव (काँग्रेस) या आघाडीवर राहिल्या आणि अखेरीस भाजपच्या सत्यजित कदम यांना धोबीपछाड दिली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून जयश्री जाधव याच आघाडीवर राहिल्या आणि त्यांचे मताधिक्य वाढत गेले. भाजपचे सत्यजित कदम यांच्या बालेकिल्ल्यात देखील कदम यांना अपेक्षित मतदान झाले नाही त्यामुळे कोल्हापूरकरांनी भाजपला नाकारले हे स्पष्ट झाले.


माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भारतीय जनता पार्टीवर लोक नाराज आहेत, वाढत्या महागाईने हैराण झालेले आहेत त्यामुळे महाराष्ट्रात भाजप उमेदवार विजयी होणे कठीण असल्याच्या प्रतिक्रिया कोल्हापूर निवडणुकीच्या सुरुवातीपासून व्यक्त होत होत्या आणि आजच्या मतमोजणीत सुरुवातीपासूनच जनभावना प्रकट होऊ लागल्या आणि शेवटी त्यावर शिक्कामोर्तब झाले. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय आधीपासूनच निश्चित मानला जात होता.  (Kolhapur by Election lead to Mahavikas-Aghadi) मतमोजणीत प्रत्येक फेरीत जाधव या आघाडीवर राहिल्या आणि कदम पाठलाग करीत राहिले पण शेवटपर्यंत ते जाधव यांच्या मताधिक्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. 


मतमोजणी पूर्ण झाली तेंव्हा महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव (काँग्रेस) यांना ९६२२६ एवढी मते मिळाली तर भाजपचे सत्यजित कदम यांना ७७४२६ मते मिळाली. एकूण पंधरा उमेदवारांनी या निवडणुकीत आपले नशीब आजमावले होते ! करुणा मुंडे यांची दखलही मतदारांनी घेतली नाही. 


महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विजयाचा प्रचंड आत्मविश्वास होता. निकालाच्या आधीच कोल्हापूर जिल्ह्यात बावडा येथे झळकलेले विजयाचे पोस्टर हे हा आत्मविश्वास दाखवत राहिले. मतमोजणीच्या काही फेऱ्या होताच सगळीकडे जाधव यांच्या विजयाचे फलक झळकू लागले होते. (Kolhapur by-election, Mahavikas Aghadi wins)  कोल्हापूरच्या ज्योतिबाची आज यात्रा असल्याने डोंगरावर गुलालाची उधळण होत होती तशी उधळण कोलापुरात देखील सुरु झाली आणि एक वेगळा जल्लोष पाहायला मिळत आहे. 


आघाडी कायम ठेवली !

महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव या मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच आघाडीवर होत्या आणि ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. प्रत्येक फेरीत जाधव यांना मताधिक्य मिळत गेले आणि  भारतीय जनता पक्षाचे सत्यजित कदम सतत पिछाडीवर जात राहिले. भाजपचे प्राबल्य असलेल्या भागात देखील भाजपला आघाडी घेता आली नाही. या निवडणुकीत भाजपवर नामुष्कीची वेळ आली असून निवडणुकीत दाखवली जात असलेली चुरस मतमोजणीत कुठेच दिसली नाही. 


प्रतिष्ठेची निवडणूक !

भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक असली तरी पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजपने प्रचारात हिंदू कार्ड चालविण्याचा केलेला प्रयत्न पुरोगामी कोल्हापूरने ते स्वीकारले नाही. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांचे स्मरण आणि भाजपावरील रोष व्यक्त करीत मतदारांनी मतदान केले असल्याचे दिसून आले. 


गुलालाची उधळण !

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विजय घोषित होण्याआधीच जल्लोष सुरु केला आणि विजयाचा गुलाल उधळला ! अर्धी मतमोजणी झाली तेंव्हाच कोल्हापुरात जयश्री जाधव यांच्या अभिनंदनाचे फलक लागू लागले होते. मतमोजणीचा कल सुरुवातीपासूनच स्पष्ट झाला होता. माजी आमदार चंद्रकांत जाधव यांच्या आठवणीने अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले होते. विजय निश्चित होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी सुरु केली. 


स्वाभिमान जिंकला !

'कोल्हापूरचा स्वाभिमान जिंकला' अशी प्रतिक्रिया  विजयी जयश्री जाधव यांनी दिली. भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक बिनविरोध करण्याचा मनाचा मोठेपणा दाखवायला हवा होता. जनता आमच्यासोबत होती आणि विजय होणार हे निश्चित होता. आनंद तर होतोच आहे पण आण्णांचे स्वप्नं पूर्ण करायचे आहे असे नवनिर्वाचित जयश्री जाधव यांनी सांगितले.    


निकाल मान्य  !

मतदारांनी जे ठरवले होते ते त्यांनी केले असून मतदारांचा निर्णय आम्हाला मान्य आहे असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ही प्रतिक्रिया व्यक्त करताना पाटील यांचा नेहमीचा जोश दिसून आला नाही. निकालाची निराशा त्यांच्या चेहऱ्यावर ठळकपणे दिसत होती. निकालानंतर पाटील यांच्या घरासमोर शुकशुकाट पाहायला मिळत होता. 


हे देखील वाचा :   (बातमीवर क्लिक करा )



 अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !     


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !