पंढरपूर : कोरोनाचे निर्बंध हटल्याने आता पंढरपूर व्यापारी कमेटीचा हनुमान जयंतीचा उत्सव (Hanuman Jayanti) धुमधडाक्यात साजरा करण्यात येणार असून दोन वर्षापासून रखडलेला कुस्तीच्या आखाड्यातील हलगी पुन्हा कडाडणार आहे.
पंढरीतील व्यापारी कमिटीचा हनुमान जयंतीचा उत्सव ही एक वेगळीच पर्वणी असते. कमेटीमार्फत भरविण्यात येणारा कुस्तीचा आखाडा तर अत्यंत प्रेक्षणीय असतो पण कोरोनाने गेल्या दोन वर्षांपासून हनुमान जयंतीच्या उत्सवाला मर्यादा आली होती. साधेपणाने हनुमान जयंती साजरी करताना कुस्तीचा आखाडा आयोजित करण्यात आलेला नव्हता पण आता कोरोनाच्या निर्बंधातून मुक्तता मिळाल्यामुळे पूर्वीच्याच उत्साहात आणि तेवढ्याच जोशात हा उत्सव साजरा करण्याचे नियोजन व्यापारी कमेटीने केले आहे. (Hanuman Jayanti celebration of Pandharpur Merchant Committee) याबाबत कमिटीची एक बैठक होऊन १६ एप्रिल पासून हा उत्सव धडाक्यात करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती व्यापारी कमेटीचे सेक्रेटरी विश्वेश्वर भिंगे यांनी दिली आहे.
व्यापारी कमेटीच्या हनुमान जयंती उत्सवास १४१ वर्षांची परंपरा असून कुस्त्यांचा फड देखील तेंव्हापासून आयोजित केला जात आहे. सुरुवातीला हा कुस्त्यांचा फड पाच दिवस चालत होता परंतु नंतर तो तीन दिवसांवर आला आणि आता एक दिवस आयोजित केला जातो. व्यापारी कमेटीच्या कुस्त्यांचा फड महाराष्ट्रात बहुचर्चित आहे. हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी मल्ल पंढरीच्या या आखाड्यात कुस्ती खेळल्याची परंपरा या आहे. पै. हरिश्चंद्र बिराजदार, पै. मारुती माने, श्रीपती खटनाळे यांच्यासारखे मल्ल या आखाड्यात उतरलेले आहेत. यावर्षी १८ एप्रिल रोजी दुपारी ४ ते ८ या वेळेत कुस्त्यांचा फड आयोजित करण्यात आला असून त्याच दिवशी दुपारी कुस्त्या नेमल्या जाणार आहेत.
हनुमान जयंतीचा उत्सव १६ एप्रिल रोजी होत असून त्यादिवशी पहाटे ५ वाजता मनोहर उर्फ छबुराव उत्पात यांचे श्री हनुमान जन्माचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे, दोन वर्षे बंद असलेली छबिना मिरवणूक यावर्षी १७ एप्रिल रोजी शहराच्या प्रमुख रस्त्यावर्ण निघणार आहे. १६ ते २० एप्रिल दरम्यान पाच दिवस ह.भ.प. कन्नडकर महाराज यांच्या कीर्तन प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी चेअरमन सतीश लिगाडे, अध्यक्ष महावीर फडे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जगलपुरे, संजय भिंगे, भगीरथ म्हणणे, राहुल म्हमाणे, भारत भिंगे, अनिलकुमार फडे, प्रदीपकुमार फडे, विपुल फडे, राजकुमार गांधी, धीरज म्हमाणे, दयानंद सुपेकर, किरण गांधी, मुकुंद मर्दा, संजय जवंजाळ, पद्माकुमार गांधी, वसंत परचंडराव, सचिन म्हमाणे आदी प्रयत्नशील असल्याचे ( Pandharapur Vyapari Commitee) संस्थेचे सेक्रेटरी विश्वेश्वर भिंगे यांनी सांगितले
हे देखील वाचा : >>
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !