पंढरपूर : एस. टी. कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते सतत नवनव्या अडचणीत येत असताना सोलापूर येथे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून आता पंढरीच्या गुन्ह्याची प्रतीक्षा आहे.
वकील असलेले गुणरत्न सदावर्ते हे शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ल्यापासून सातत्याने अडचणीत येत आहेत. बेताल विधानांमुळे चर्चेत राहिलेले सदावर्ते आता कायद्याच्या कचाट्यात अडकू लागले असून मराठा आरक्षणाच्या विषयाने त्यांनी केलेली विधाने मराठा समाजाला असह्य झालेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे आणि छत्रपती संभाजीराजे यांच्यासंदर्भात केलेल्या विधानामुळे सातारा पोलिसांनी त्यांना अटक केली होती. चार दिवस पोलीस कोठडीची हवा खाल्ल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे तथापि राज्यातील इतर पोलीस ठाण्यात देखील त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असून त्या प्रकरणी देखील त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
सातारा नंतर आज कोल्हापूर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून पुणे, अकोला पोलीसही ताब्यात घेण्याची चिन्हे आहेत. आज सोलापूर येथे देखील विविध कलमान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा समाजाच्या बाबत आक्षेपार्ह भाषा वापरून मराठा विरोधात खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातील जातींना भडकावणे, चिथावणीखोर वक्तव्य करणे, जातीय तेढ निर्माण करणे याप्रकरणी 'राष्ट्रीय छावा' चे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फौजदार चावडी पोलीस ठाण्यात सदावर्ते विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे , न्या. भारती डांगरे यांनी दिलेल्या निकालासंदर्भात वृत्त वाहिनीच्या एका कार्यक्रमात सदावर्ते यांनी नापसंती दाखवली होती.
न्यायालयाच्या निर्णयावर शंका घेत न्या. मोरे हे मराठा जातीचे आहेत असे विधान करून मराठे हे शुद्र आहेत अशा प्रकारची विधाने केली होती. न्या. रणजित मोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे ऐकून त्यांच्या दबावाखाली मराठा समाजाच्या बाजूने सेटिंग बेटिंग करून निकाल दिला आहे असा आरोप देखील सदावर्ते यांनी केला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर योगेश पवार यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार भारतीय दंड विधान कलम १५३ अ, १५३ ब, ५००, ५०५ (१), ५०५ (२) तसेच न्यायालय अवमान अधिनियम १९७१ कलम २ नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंढरीतही मागणी !
गुणरत्न सदावर्ते यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी पंढरीतील मराठा संघटनांनी केली आहे. पंढरपूर येथेही सदावर्ते विरोधात गुन्हा दाखल करावा यासाठी मराठा समाज आक्रमक झालेला आहे. मराठा समाजाबद्धल सतत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्ये केल्याप्रकरणी सदावर्ते विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी मराठा समाजाने पंढरपूर शहर पोलिसांकडे केली आहे.
भावना दुखावल्या !
विविध माध्यमांतून गुणरत्न सदावर्ते मराठा समाजाच्या बद्धल बदनामीकारक वक्तव्ये करीत आहेत, छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज तसेच मराठा समाजातील महिला यांच्याबाबत करण्यात आलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. शिवाय जाती जातीत तेढ निर्माण होत आहे त्यामुळे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे एक निवेदन मराठा संघटनांनी पंढरपूर शहर पोलिसात दिले आहे.
आंदोलनाचा इशारा
मराठा समाजाच्या विविध संघटनांनी सदावर्ते विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत त्यांचा निषेध देखील केला आहे. पंढरीतील मराठा संघटना अत्यंत आक्रमक झालेल्या असून सदावर्ते विरोधात दोन दिवसात गुन्हा दाखल न झाल्यास मराठा समाज तीव्र आंदोलनाचे हत्यार उपसणार असून तशी घोषणा देखील करण्यात आली आहे.
कारवाईचे आश्वासन !
गुणरत्न सदावर्ते विरोधात तत्काळ गुन्हा दाखल करण्याचा मराठा संघटनांचा आग्रह होता परंतु याबाबत दोन दिवसात कार्यवाही करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.. वादग्रस्त वक्तव्याचे व्हिडीओ तसेच इतर माहिती घेवून याबाबत दोन दिवसात कार्यवाही करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे, (Awaiting filing of case against Gunaratna Sadavarte in Pandharpur) आता दोन दिवस झाले आहेत त्यामुळे आता पंढरीत देखील गुन्हा दाखल होण्याची प्रतीक्षा आहे.
हे देखील वाचा : (बातमीवर क्लिक करा )
- ⭕पंढरपूर तालुक्यातील उच्चशिक्षित तरुणाची आत्महत्या !
- ⭕ महाराष्ट्रात पुन्हा मास्क वापरण्याची सक्ती होण्याची शक्यता !
- ⭕सोलापूरसह राज्यात जोरदार पावसाचा इशारा !
- ⭕ पंढरपूर तालुक्यातून कुख्यात दरोडेखोराला अटक !
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !