बाळाचं नाव ठेवण्याचा कार्यक्रम ठरवला, नातेवाईक, पाहुणे या कार्यक्रमासाठी घरी आलेले ... पण नाव ठेवण्याआधीच, बारसे होण्याआधीच आईने घेतला चिमुकल्याचा जीव !
सोलापूर :जन्मदात्या आईने आपल्या अवघ्या पंचवीस दिवसांच्या बाळाला पाण्याच्या ड्रममध्ये टाकले आणि त्याचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी शोधून काढला आहे.
आईची ममता इतर कुठेही सापडत नाही आणि कुठल्याही परिस्थितीत आई आपल्या लेकरांना जीव लावते. आईचे महत्व आणि तिची माया याची तुलनाच होऊ शकत नसते पण आईच आपल्या लेकराच्या जीवावर उठते याची साक्ष देणाऱ्या काही घटना समाजात घडताना दिसतात आणि आईच्या महान नात्याला कलंक लावला जातो. सोलापुरात आज अशीच एक घटना उघडकीस आली असून पोलिसांच्या कौशल्यामुळे हा प्रकार समोर आला आहे. अपघात भासविण्याचा आईचा प्रयत्न फसला आणि तिला तुरुंगात जाऊन बसावे लागले आहे.
सोलापूरच्या मुरारजी पेठेतील मंगळवेढा चाळीत ही घटना घडली आहे. पहिल्या मुलाचा वाढदिवस आणि या चिमुकल्याचे बारसे करण्याच्या कार्यक्रमासाठी नातेवाईक, पाहुणे संकेत सुरवसे यांच्या घरी आले होते. या कार्यक्रमाच्या आदल्याच दिवशी चिमुकल्याला घेऊन त्याची आई प्रतीक्षा ही घरात झोपली होती. संकेत सुरवसे हे घरात गेले तेंव्हा त्यांना चिमुकले बाळ दिसले नाही म्हणून त्यांनी शोधाशोध आणि चौकशी सुरु केली. सगळ्यांनीच बाळाचा शोध सुरु केला. अवघ्या २५ दिवसांचे बाळ कुठे गेले असेल असा सर्वांनाच प्रश्न पडला. या बाळाला अजून चालता अथवा रांगताही येत नसताना बाळ जागेवरून इतरत्र जाउच शकत नव्हते त्यामुळे सगळेच गोंधळात पडले.
बाळाचा शोध सुरु असतानाच संकेत सुरवसे हे पाणी घेण्यासाठी भिंतीजवळ ठेवलेल्या पाण्याच्या ड्रमकडे गेले आणि त्यांना धक्काच बसला. पाणी घेण्यासाठी ड्रमजवळ गेलेल्या सुरवसे यांना त्याच ड्रममध्ये बाळ पाण्यात तरंगत असल्याचे दिसले. हे चित्र पाहून सुरवसे यांनी आरडाओरडा केला. चिमुकल्या बाळाला लगेच शासकीय रुग्णालयात नेले पण बाळाचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेबाबत माहिती मिळाल्याने फौजदार चावडी पोलीस निरीक्षक आणि सहायक पोलीस आयुक्त यांनी सुरवसे यांच्या घरी धाव घेतली.
पंचवीस दिवसाच्या बाळाला अजून रांगताही येत नव्हते मग बाळ पाण्याच्या ड्रमपर्यंत गेलेच कसे ? ते त्या ड्रममध्ये पडले कसे ? असे काही प्रश्न पोलिसांच्या पुढेही उभे राहिले होते. या वयातील बाळ आईशिवाय अन्य कुणाकडे असण्याची शक्यताही नव्हती त्यामुळे पोलिसांनी आई प्रतीक्षा सुरवसे हिचा जबाब घेतला. पोलिसांना आईचाच संशय आल्याने तिला ताब्यात घेऊन अटक केली आहे. पोलीस आता तिच्याकडून कसून चौकशी करीत असून बाळाची अशा प्रकारे हत्या करण्याचे कारण शोधू लागले आहेत. चिमुकल्या बाळाचे कोडकौतुक करण्यासाठी आईला वेळ कमी पडतो पण ही आई चिमुकल्याची दुष्मन बनली. परिसरात या घटनेने हादरा दिला असून मातृत्व आणि आईच्या ममतेला या प्रतीक्षाने कलंक लावला असून नागरीकातूनही संताप व्यक्त करण्यात येत आहे.
माता न तु वैरिणी
उत्तर द्याहटवा