BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ ऑक्टो, २०२१

पंढरपूर कार्तिकी यात्रेबाबत जिल्हा प्रशासन सकारात्मक !





पंढरपूर : पंढरीच्या कार्तिकी यात्रेबाबत जिल्हा प्रशासन सकारात्मक असून याबाबत येत्या ३० ऑक्टोबरपर्यंत निर्णय होणार असल्याची माहिती आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 

कोरोनामुळे गेल्या पावणे दोन वर्षापासून देवाचे दर्शन मिळणे अवघड झाले होते पण नंतर टप्प्याटप्प्याने मंदीरे खुली झाली आहेत. आषाढीसारख्या मोठ्या यात्राही भरू शकल्या नाहीत आणि भाविकांना आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेता आले नाही. केवळ प्रतीकात्मकरित्या गेल्या दीड वर्षातील पंढरीच्या वाऱ्या साजऱ्या कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे भाविक अस्वस्थ होते परंतु कोरोनाची परिस्थितीत भाविकांनी समजून घेतली होती. आता मात्र तशी परिस्थिती नसल्याने कार्तिकी वारीसाठी परवानगी देण्याची मागणी जोर धरीत आहे. या वारीबाबत मात्र ३० ऑक्टोबरच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज सांगितले आहे. 

कार्तिकी यात्रेला परवानगी मिळणार की नाही हे अद्याप अनिर्णीत असले तरी प्रशासन मात्र कार्तिकीच्या तयारीला लागले असल्याचे दिसत आहे. याचीच पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी आज पंढरपूर येथे आले होते. जिल्हाधिकारी यांनी आज कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर आढावा देखील घेतला आहे. कार्तिकी यात्रेच्या महापूजेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण देण्याची तयारीही करण्यात आली असल्याची माहिती आहे. ३० ऑक्टोबर रोजीच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार असला तरी प्रशासनाच्या हालचाली पाहता काही अटींवर का होईना पण कार्तिकी यात्रेस परवानगी मिळेल असे संकेत मिळत आहेत. अंतिम निर्णयासाठी मात्र ३० ऑक्टोबरची वाट पहावी लागणार आहे. 

गेल्या पावणे दोन वर्षात पंढरी सुनी सुनी दिसत आहे, कोरोनामुळे मंदिरे आणि धार्मिक स्थळे बंद असल्यामुळे पंढरीचे मूळ स्वरूपच नष्ट झाले आहे. रोज गजबजत असणारी पंढरी आणि मंदिर परिसर ओकाबोका दिसत होता. आषाढी कार्तिकी यात्रांना अवघ्या पंढरीत भक्तिरसाचा महापूर येत होता आणि भक्तीच्या वर्षावात पंढरीचे क्षितीज न्हाऊन निघत होते. कोरोनामुळे मात्र काळवंडलेले पंढरीचे आभाळ आता कुठे मुळ स्वरुपात येऊ लागले आहे. 

मंदिरे दर्शनासाठी खुली झाल्याने मंदिराच्या परिसरात भाविकांची गजबज दिसू लागली आहे. आता वारीलाही परवानगी मिळण्याची शक्यता आहे. पंढरीची वारी ही पंढरीच्या आर्थिक चक्राला पूरक असते. वर्षातील वारी आणि नियमितपणे येणारे भाविक यावरच पंढरीचे अर्थचक्र सुरु असते. गेल्या पावणे दोन वर्षात वारीच न भरल्यामुळे हे अर्थचक्र कोरोनाच्या गाळात रुतून बसले आहे आणि ते एवढ्या सहजासहजी बाहेर येणार नाही. आता कार्तिकीला परवानगी मिळण्याची शक्यता असल्यामुळे मंदावलेल्या स्थानिक अर्थव्यवस्थेला उर्जितावस्था येणास सुरुवात होण्याची अपेक्षा मात्र नक्की आहे. 

वारीला परवानगी मिळावी म्हणून वारकरी, भाविक आणि छोटे मोठे व्यापारी आसुसलेले आहेतच पण आंदोलनाची मागणी करीत राजकारणही होत आहे. मंदिरे उघडा म्हणून मागील काळात राजकीय आंदोलने झाली पण वारकरी आणि भाविकांनी मात्र कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले होते. आता कार्तिकी वारीला परवानगी मिळण्याची  चिन्हे दिसताच काहींनी आंदोलनाचे इशारे दिले आहेत. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असले तरी वारीला परवानगी मिळाल्यास पंढरीच्या आर्थिक डागडूजीसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. कोरोणाचा प्रादुर्भाव कमी झाला असून सगळ्याच बाबी खुल्या झाल्या असल्याने वारीसाठी काही अटींवर परवानगी मिळेल अशी आशा आणि खात्री  सर्वांनाच वाटू लागली आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !