BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ एप्रि, २०२२

अजितदादा पवार संतापले, म्हणाले, 'सरड्यासारखे रंग बदलायचे काम सुरु '!

 



पुणे : राज्याचे उप मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार ( Ajit Pawar) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा खरपूस समाचार घेत ' हे तर सरड्यासारखे रंग बदलायचे काम सुरु' असल्याचे म्हटले. 


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  काल जाहीर सभेत केलेले भाषण हे नेहमीच्या भाषणापेक्षा 'वेगळे' ठरले आणि त्याचे पडसाद आज महाराष्ट्रात उमटले. राज ठाकरे यांचे भाषण सगळ्याच पक्षातील लोक ऐकत असतात पण राजकारणाशी काही संबंध नसलेले लोक देखील ऐकत असतात आणि उत्स्फूर्त दाद देखील देत असतात. कालच्या भाषणाबाबत मात्र सर्वसामान्य जनतेनेही नाक मुरडले. 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदीपासून अनेकांवर नेमकी टीका करणारे राज ठाकरे कालच्या सभेत भाजपच्या विरोधात अवाक्षर बोलले नाहीत उलट त्यांनी भाजपचे कौतुक केले आणि शिवसेना, राष्ट्रवादी, शरद पवार आणि अजित पवार यांच्यावरच टीका केली.  (Ajit Pawar's criticism of Raj Thackeray) एकांगी केलेल्या या भाषणामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मूळ भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असून अनेकांनी राज ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. 


राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज पुण्यात बोलताना नेमके बोट ठेवले. राज ठाकरे यांनी विधानसभेवेळी काय केले हे तुम्ही पहिले आहे आणि कालचे भाषण ऐकलं, त्यामुळे सरड्यासारखे रंग बदलण्याचे काम सुरु आहे अशा शब्दात पवार यांनी समाचार घेतला.  केवळ भाषणे करून जनतेचे प्रश्न आणि रोजी रोटीचा प्रश्न सुटत नाही. लोकसभेच्या वेळी राज ठाकरे यांनी केंद्रातील सरकार विरोधात भूमिका घेतली तर विधानसभेच्या वेळी सगळ्यांनी पाहिलं, ते नुसती पलटी मारतात टीका करणे आणि नकला करणे याशिवाय काही जमतं का ? असा सवाल देखील अजित पवार यांनी उपस्थित केला.  त्यांची विश्वासार्हता राहिलेली नसून आपले आमदार, नगरसेवक का सोडून गेले याचे देखील त्यांनी आत्मपरीक्षण करावे असा सल्ला देखील पवार यांनी  दिला.


तेंव्हा कौतुक कसे ?

शरद पवार साहेबांवर राज ठाकरे टीका करतात,  पवार साहेबांची मुलाखत घेताना कौतुक करीत होते, त्यावेळी शरद पवार जातीयवादी वाटले नाहीत, आत्ताच कसे जातीयवादी वाटायला लागले ? यांच्या जन्माच्या आधीपासून पवार साहेब ( Sharad Pawar) राजकारणात आहेत. अशा लोकांनी टीका टिपण्णी करणे म्हणजे सूर्याकडे पाहून थुंकण्यासारखे आहे. राज ठाकरे यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती असे देखील अजित पवार यांनी सांगितले. 


अक्कलदाढ उशिरा ?

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर आज टीका केली आहे. 'अक्कलदाढ इतक्या उशिरा कशी येते ? काल शिवतीर्थावर भाजपचा भोंगा वाजत होता. स्क्रिप्ट आणि टाळ्याही भाजपच्या होत्या' असे शिवसेना नेते संजय राउत यांनी म्हटले आहे.  एक नोटीस आली तर भाषा एवढी बदलते असा टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. शरद पवार यांनी तर एका वाक्यात खिल्ली उडवली असून अन्य अनेक नेत्यांनी खरपूस समाचार घेतला आहे.  भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मात्र राज ठाकरे यांच्या भाषणाचे कौतुक केले आहे.  


हे देखील वाचा :

        

अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !