सोलापूर : पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून या पावसाने ( Unseasonal Rain in Solapur District) काहीसा गारवा निर्माण केला असला तरी शेतकरी मात्र धास्तावून गेले आहेत.
राज्यात आलेली उष्णतेची लाट आणि वाढते तापमान यामुळे घामाच्या धारा लागत असतानाच अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त होत होती. येत्या चार पाच दिवसात राज्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने कालच व्यक्त केली होती, चार जिल्ह्यांना यलो अलर्ट देखील देण्यात आला असतानाच रात्री अचानक सोलापूर जिल्ह्यातील काही भागात वेगवान वाऱ्यासह पाऊस पडला आहे. पावसाचे वातावरण निर्माण होऊ लागताच शेतकरी धास्तावला पण रात्रीच्या अंधारात सोसाट्याच्या वाऱ्यासह अनेक भागात पाऊस पडला आहे.
शेतातील पिकांची काढणी अंतिम टप्प्यात असताना आलेल्या पावसामुळे नुकसानीची मोठी भीती असतानाच रात्री पावसाचे आगमन झाले. द्राक्ष बागा अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. पावसामुळे द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान होण्याच्या धोका आहे. वाढलेल्या तापमानात पावसाची कल्पना देखील अस्वस्थ करू लागली असतानाच काल रात्री सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. सोलापूर जिल्ह्यात काल उकाडा वाढलेला होताच पण दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे पावसाची शक्यता दिसत होती. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यात या पावसाने सुरुवात केली. कुंभारी परिसरात तर वेगवान वाऱ्यासह पाऊस सुरु झाला तर सोलापूर- पुणे महामार्गाच्या परिसरात देखील पाऊस झाला.
पंढरपूर तालुक्यात पाऊस
पंढरपूर शहर आणि तालुक्यात देखील तापमान वाढलेले असताना काल प्रचंड उकाडा जाणवत होता आणि सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण झाले. वातावरण पाहून पाऊस येण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरु झाला. त्यानंतर पावसाचे आगमन झाले. या दरम्यान सोसाट्याचे वारे देखील वाहू लागले होते. घरातील उकाड्यामुळे रात्री छतावर झोपलेल्या नागरिकांची अचानक तारांबळ उडाली.
द्राक्षबागांचे नुकसान
पंढरपूर तालुक्यातील काढणीस आलेल्या द्राक्षबागांचे या पावसाने नुकसान केले आहे. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, टाकळी, खर्डी, पुळूज परिसरातील अनेक बागांचे आणि बेदाण्याचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. पावसाळी वातावरण होताच धास्तावलेला शेतकरी पाऊस पडताना पाहून पुरता हैराण झाला. गेल्या काही दिवसांपासून भीती व्यक्त होत होती आणि भीती असलेले हे संकट शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत पोहोचले.
आणखी पावसाची शक्यता !
पुढील चार पाच दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाने अंदाज व्यक्त केलेला आहे. पुढील चार ते पाच दिवसात राज्यात पाऊस पडणार असून यावेळी जोरदार वारे देखील वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आज पाऊस होण्याची शक्यता असून यामुळे तापमानात घट होऊन उकाडाही कमी होणार आहे. सदर दोन्ही जिल्ह्यात जोरदार वारे वाहण्याचाही अंदाज आहे. ५ आणि ६ एप्रिल रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात दमदार पावसाचे आगमन होणार असून जोरदार वाऱ्यासह आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने या चारही जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
हे देखील वाचा : >>
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !