सोलापूर : यंदाच्या उन्हाळ्यात विक्रमी उष्णता वाढत असतानाच आणि राज्यात उष्णतेची लाट आलेली असताना सोलापूरच्या तापमानात देखील मोठी वाढ होत असून काल ४२.८ अंश सेल्सियसची नोंद झाली आहे.
राज्यात सगळीकडेच तापमान वाढत चालले असताना सोलापूरही उच्चांकी तपामानाकडे जाऊ लागले आहे. मार्च महिन्यात उष्णता वाढत राहिली पण एप्रिल महिना सुरु होताच सूर्य आग ओकायला लागला असून सकाळपासूनच उन्हात 'कडक' पणा जाणवू लागला आहे त्यामुळे घराबाहेर पडणे त्रासाचे ठरू लागले आहे. विदर्भ, नागपूर येथे विक्रमी तापमानाची नोंद होत असते तसे सोलापूर देखील नागपूरच्या बरोबरीने तापत असल्याचे नेहमीच दिसते. सद्या तर राज्यात उष्णतेची लाट असून राज्यातील अनेक जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक तापमान वाढले आहे.
दिवसभर कडक ऊन आणि त्यामुळे तापणारी हवा त्रस्त करीत असतानाच दिवसभर तापलेल्या छतामुळे रात्रभर प्रचंड उकाडा जाणवू लागला आहे. उकाड्यात पंख्याचा वापर केला तरी हवेत मात्र उष्णता असल्याने घाम कमी होत नसून पत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना तर दिवसभर आणि रात्रीही घरात थांबणे कठीण होताना दिसत आहे. सोलापूर हे नेहमीच उन्हाळ्यात 'ताप' दायक ठरत असून एप्रिल महिन्यातच इथले तापमान ४३ अंशाजवळ (Large rise in temperature in Solapur district) पोहोचल्यामुळे पुढील महिन्यात तापमान विक्रम करण्याची भीती व्यक्त होत आहे.
सोलापुरात काल शनिवारी ४२.८ अंश सेल्सियस तपमान नोंदले गेले असून आज सकाळपासून उन्हाचा कडाका वाढलेला आहे. सोलापुरात ३१ मार्च रोजी ४१.०६ अंश सेल्सियस एवढे तापमान नोंदले गेले, त्यानंतर मात्र पारा ४२ अंशाच्या पुढेच निघाला असल्याचे दिसत आहे. १ एप्रिल रोजी तपमान काहीसे कमी होत ४१.१ अंशावर आले आणि त्यानंतर मात्र २ एप्रिल रोजी थेट ४२.८ अंश सेल्सियसवर गेले. गुढीपाडव्याच्या दिवशी घामाच्या धारा वाहू लागल्या. या वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही लाही होत असून उन्हात काम करणाऱ्या शेतकरी आणि कष्टकरी यांनी दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताची तालावर सतत टांगती राहिली आहे.
उष्माघाताचे संकट !
राज्यात उष्णतेची लाट आली असून तीन शेतकऱ्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अशा घटनामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले असतानाच हवामान विभागाच्या नव्या अंदाजाने चिंता वाढवली आहे. उन्हाची तीव्रता वाढत निघाली असून उन्हाचे जोरदार चटके बसू लागले आहेत. सद्याच्याच उन्हामुळे नागरिक हैराण झालेले असताना एप्रिल महिना अत्यंत कडक उन्हाळ्याचा असणार आहे असा इशाराच हवामान विभागाने ( Summer Forecast in Maharashtra) दिला आहे. कडक उन्हाळ्याचा मे महिना अजून यायचा असल्याचे चिंता वाढू लागली आहे. एप्रिल महिन्यात राज्यातील किमान आणि कमाल तापमान हे सरासरीपेक्षा अधिक राहील. त्यामुळे सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक झाले आहे.
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !