सोलापूर : कोरोनाच्या चौथ्या लाटेची चर्चा सुरु असतानाच सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरसह सहा तालुके कोरोनामुक्त झाले असून (Out of Corona ) सोलापूर जिल्ह्यातून कोरोना हद्दपारीच्या उंबरठ्यावर उभा आहे. जिल्ह्यात केवळ सात रुग्ण उरले आहेत.
कोरोनाची चौथी लाट येणार असल्याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु झाली आहे त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना धडकी भरवत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव कमी कमी होत असल्याने मोठा दिलासा मिळू लागला आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचे निर्बंध, नियम, संचारबंदी, जमावबंदी अशा विळख्यात प्रत्येकजण गुदमरून गेला आहे. विविध नियम आणि निर्बंध यामुळे आर्थिक चक्रे कोरोनाच्या गाळात एवढी रुतून बसली आहेत की ती आता सहजगत्या बाहेर काढता येणार नाहीत. तिसरी लाट आली आणि फारसा उपद्रव न देता परतीच्या मार्गाला लागली त्यामुळे दिलासा मिळाला असतानाच सोलापूर जिल्ह्याची (Six talukas in Solapur district are corona free) कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुके आता पूर्णपणे कोरोनामुक्त झालेले असून जिल्ह्यात आता केवळ सात रुग्ण उरले आहेत. सोलापूर शहर तर या आधीच पूर्णपणे कोरोनामुक्त झाले असून सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस, अक्कलकोट, करमाळा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर हे तालुके पूर्ण कोरोनामुक्त झाले असून या तालुक्यात आता कोरोनाच एकही रुग्ण उरलेला नाही. आता सांगोला तालुक्यात २, माढा तालुक्यात २ तर बार्शी, मंगळवेढा, मोहोळ तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आहे. येत्या काही दिवसात हे रुग्ण देखील बरे होतील आणि संपूर्ण सोलापूर जिल्हा कोरोनामुक्त होईल.
नवे रुग्ण नाहीत !
कोरोनाची चाचणी घेण्यात येत आहे पण या चाचणीत नवे रुग्ण आढळून येत नाहीत. काल प्राप्त झालेल्या अहवालानुसार २८७ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या पण यात एकही रुग्ण कोरोनाबाधित आढळला नाही. यातील सात अहवाल प्रलंबित आहेत. सोलापूर शहरात १९१ व्यक्तींच्या चाचण्या करण्यात आल्या परंतु यात एकही बाधित आढळला नाही.
केंद्राकडून आदेश
कोरोनाची चौथी लाट येण्याची चर्चा सुरु झाल्याने पुन्हा निर्बंधाचे फास आवळले जाण्याची मोठी भीती होतीच शिवाय सद्या कोरोनाचे आस्तित्व नगण्य असल्यामुळे निर्बंध हटविले जावेत अशी मागणीही पुढे येत होती. त्यातच केंद्र शासनाने हा दिलासा दिला आहे. देशातून कोरोना आता हद्दपार होत असून दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या दोन हजारापेक्षाही कमी आली आहे त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठीच्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदी रद्द केल्या आहेत. (Corona restrictions lifted by central government) त्यामुळे आता मोठा दिलासा लाभणार आहे
निर्बंधातून मुक्तता !
येत्या ३१ मार्चपासून कोरोना संबंधित सर्व निर्बंध हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे देशवासियांना खूप मोठा दिलासा लाभणार आहे. दोन वर्षापूर्वी म्हणजे २४ मार्च २०२० रोजी देशात कोरोना संबंधित निर्बंध लागू करण्यात आले होते. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत अनेक मार्गदर्शक तत्वे केंद्राने लागू केली होती आणि त्याची अंमलबजावणी आजही सुरूच आहे.
दोन निर्बंध कायम !
३१ मार्च पासून कोरोना संबंधित निर्बंध हटविण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी मास्क वापरणे आणि परस्परातील अंतर ठेवणे हे दोन नियम कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे मास्क वापरापासून सुटका होणार नाही. (Masks and social distance required) सदर दोन नियम पाळावेच लागणार आहेत. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्या मतानुसार मार्च २०२० मध्ये लागू केलेल्या कोरोना नियमांची मुदत ३१ मार्च रोजी संपत असून त्यानंतर गृह मंत्रालयाकडून कोरोना संदर्भात कोणतेही नवे आदेश जारी करण्यात येणार नाहीत.
हे देखील वाचा :
- उजनी धरणातून कालव्यात सोडणार पाणी !
- अजितदादा पवार म्हणाले, 'नाही तर ते काय घंटा देणार '?
- इशारा ! पुढील पाच दिवसात उष्णतेची लाट !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !