BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२० मार्च, २०२२

अनधिकृत आकडे काढताना वीज कर्मचाऱ्यांना मारहाण !



पंढरपूर : अनधिकृत वीज कनेक्शन तोडण्यासाठी गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या (Mahavitaran) कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे ९ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


शेतकरी आणि महावितरण यांच्यातील दुरावा वाढत चालला असून वीज तोडल्याच्या रागातून महावितरण कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून धमकी दिल्याचा एक गुन्हा ( Pandharpur Crime) पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ आता करकंब पोलीस ठाण्यात देखील शासकीय कामात अडथळा आणल्याचा एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  करकंब येथील घाटूळे वस्ती येथील एका रोहित्रावर आकडे टाकून वीज कनेक्शन (Power theft)  घेतले गेले असल्याची माहिती महावितरण यंत्रणेला मिळाली होती. त्यानुसार कर्मचारी येथे गेले असता काल ही घटना घडली आहे. 


महावितरण करकंबचे वायरमन सिद्धेश्वर भीमराव शेळके, पांडुरंग सदाशिव पाटील, भारत तुकाराम आरकस, गुरुलिंग आदिनाथ पाटील, ओमप्रकाश सुभाष धुमाळे, गणेश सत्यवान माने हे सदर ठिकाणी पोहोचले. त्याठिकाणी अनधिकृतरित्या आकडे टाकून वीज घेतली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या कर्मचाऱ्यांनी हे आकडे काढण्यास सुरुवात केली पण याचवेळी काही जणांनी या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी करीत अंगावर धावून गेले. वायरमन गुरुलिंग आदिनाथ पाटील, गणेश सत्यवान माने यांची गच्ची पकडण्यात आली. त्यांच्या तोंडावर हाताने चापट मारण्यात आली (MSEDCL employee beaten) असल्याबाबत वीज कर्मचारी शंकर सुखदेव बनसोडे यांनी करकंब पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.   


दाखल झालेल्या फिर्यादीनुसार करकंब येथील अक्षय औदुंबर व्यवहारे, महेश औदुंबर व्यवहारे, कैलास भारत घाटूळे, धनंजय हनुमंत घाटूळे, जयराम गंगाराम घाटूळे, सुधीर दत्तात्रय घाटूळे,  मारुती सुधाकर घाटूळे, रवींद्र नवनाथ घाटूळे, दत्तात्रय गेना घाटूळे यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत तसेच अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या घटनेबाबत करकंब परिसरात चर्चा सुरु झाली आहे. 


महावितरण- ग्राहक संघर्ष !     

वीज बिल थकल्याने महावितरणकडून ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरु होते. कृषी पंपाचा वीज पुरवठा तोडला गेल्याने तर शेतकरी संतप्त होते आणि अनेक ठिकाणी महावितरण कार्यालय जाळण्याचा तसेच अधिकारी, कर्मचारी यांना मारहाण करण्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत. महावितरण आणि ग्राहक यांच्यात यामुळे संघर्ष सुरु झाला असून शासनाने कृषी पंपाची वीज तोडण्याची मोहीम तात्पुरती थांबवली आहे पण ग्राहकांच्या मनात महावितरणबाबत असलेला असंतोष अजूनही खदखदताना दिसत आहे आणि यातूनच पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील एका घटनेबाबत (Wireman beaten for power outage ) पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


वीज तोडल्याचा राग 
महावितरणचे कर्मचारी सोमनाथ प्रकाश चौगुले यांनी या प्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. सदर फिर्यादीनुसार, विजेचे बिल भरले नसल्यामुळे भाळवणी येथील नितीन विठ्ठल गायकवाड यांचा विद्युत पुरवठा तोडण्यात आला होता परंतु गायकवाड यांच्या मनात याबाबत राग होता. महावितरणच्या आदेशानुसार गायकवाड यांच्या घरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. या घटनेचा राग गायकवाड यांच्या मनात होता.    


गुन्हा दाखल 
वीज तोडण्याची घटना साधारण एक महिन्यापूर्वी घडली होती,  महावितरण कर्मचारी सोमनाथ चौगुले हे भाळवणी येथे खाजगी कामासाठी थांबले असताना नितीन गायकवाड यांनी त्यांना बोलावून घेतले. त्यानंतर गायकवाड यांनी शिवीगाळ आणि दमदाटी केली अशी फिर्याद चौगुले यांनी पोलिसात दिली आहे. या फिर्यादीनुसार पोलिसांनी गायकवाड याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

हे देखील वाचा :


अधिक बातम्यासाठी येथे क्लिक करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !