BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ सप्टें, २०२२

आरोग्य कर्मचारीच ठरताहेत हृदयविकाराचे बळी !



शोध न्यूज : आरोग्य विभागात रिक्त पदे भरली जात नसल्याने आणि विविध कामांचा दबाव वाढत असल्यामुळे आरोग्य कर्मचारीच हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह या आजारांचे बळी ठरत असल्याची बाब जि. प. आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शिवराज जाधव यांनी आरोग्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून रिक्त पदे भरण्याची मागणी केली आहे. 


शासनाच्या विविध विभागात हजारो पदे रिक्त असून विविध संघटनाकडून ही रिक्त पदे भरण्याबाबत सातत्याने मागणी होत आहे. रिक्त पदांमुळे प्रशासनात विस्कळीतपणा आलेला असून एकेका कर्मचाऱ्यांना अनेक कार्यभार सांभाळावे लागत आहेत त्यामुळे जनतेची कामे वेळेत होण्यात  मर्यादा येत आहेत. शासनाला या बाबीची पूर्ण जाणीव आहे तरी देखील रिक्त पदे भरली जात नाहीत आणि दरवर्षी या रिक्त पदांत वाढच होत आहे. आरोग्यासारख्या महत्वाच्या विभागात देखील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका यांची हजारो पदे रिक्त असल्याचा परिणाम आपोआपच आरोग्य सेवेवर होत असल्याने जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष शिवराज जाधव यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती दिली आणि रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी केली आहे. 


आरोग्य विभागातील हजारो पदे रिक्तच असल्याचे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेवर ताण येत असल्याने दुसऱ्यांचे आरोग्य सांभाळणाऱ्या आरोग्य विभागालाच उपचाराची गरज पडू लागली आहे. कर्मचारी अपुरे असताना विविध कामांसाठी वरिष्ठ विभागाकडून सातत्याने दबाव वाढत असतो आणि याचा परिणाम आरोग्य कर्मचारी यांच्याच आरोग्यावर होऊ लागला आहे त्यामुळे  सदर पदे त्वरित भरण्यात यावीत यासह अन्य काही मागण्या महाराष्ट्र राज्य जि प आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष शिवराज जाधव यांनी आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत आरोग्य मंत्री यांच्याकडे केल्या आहेत.


जिल्हा परिषद  आरोग्य विभागातील रिक्त पॅरामेडिकल पदे तात्काळ भरण्यात यावीत,. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र स्तरावरील साथ रोग प्रतिबंधात्मक सेवा करणारी आणि माता बालसंगोपन करणारी आरोग्य सेवक आरोग्यसेविका यांची एकूण २६ हजार ९५८ पदे असून यापैकी १३ हजार ५८ पदे रिक्त आहेत, त्यामुळं ग्रामीण भागातील आरोग्य सेवेवर प्रचंड ताण पडत असून ही पदे तात्काळ भरण्यात यावी अशी  शिवराज जाधव यांनी आरोग्य मंत्री यांच्याकडे केलीआहे. आरोग्य मंत्री ना. सावंत  हे पंढरपूर येथे आले असता संघटनेच्या वतीने शिवराज जाधव यांनी त्यांचे स्वागत केले आणि आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. रिक्त पदे भरण्याच्या मागणीसह अन्य काही मागण्याची संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत.


२००५ नंतर च्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी, एनएचएम  कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे. वेतन दरमहा १ तारखेस व्हावे, एकूण पदाच्या ५० टक्के पदे भरलेली असताना अतिरिक्त कार्यक्षेत्र चा कार्यभार सांभाळून १०० टक्के रिपोर्टींग व्हावे यासाठी वरिष्ठ स्तरावरून सतत दबाव आणला जात आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचारीच हार्ट अटॅक बी पी शुगर इत्यादी आजाराचे बळी ठरत आहेत याकडे ही मंत्री महोदयांचे लक्ष वेधण्यात आले. सुमारे २० मागण्याचे निवेदन देण्यात आले.  या निवेदनावर अध्यक्ष शिवराज जाधव, पुरुषोत्तम वैष्णव, बालाजी सातपुते, सुनंदा निकम, कविता देशमुख, अर्चना देशमुख, ज्योती पवार यांच्या सह्या आहेत. शिवराज जाधव यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा पाढाच आरोग्यमंत्र्यांजवळ वाचला तेंव्हा या समस्यावर विचार करण्यासाठी मंत्रालयात येण्याचे आरोग्य मंत्र्यांनी सूचित केले आहे. 


याप्रसंगी शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख श्री चरणराज चवरे, संघटनेचे राज्य अध्यक्ष शिवराज जाधव, सोलापूर जिल्हयाचे पदाधिकारी शिवाजी कांबळे, श्रावण मोरे, (Health workers are the victims of heart disease) प्रमोद जावळे, सुभाष तनमोर, सुनंदा सुरवसे, शशिकांत साळुंखे, धनाजी मस्के, रियाज शेख, बबन कसबे, अंशुमन शिंदे, ,श्रीमती उत्कर्षां महानवर,'एनएमएच' चे श्री सरडे, श्री बाजारे,श्रीमती ननवरे, श्रीमती भगरे, श्रीमती कांबळेआदी उपस्थित होते. 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !