पंढरपूर : नुकतेच जन्मलेले बाळ मरण्यासाठी रस्त्यावर फेकून पळालेल्या प्रकरणाचे रहस्य पोलिसांनी (Pandharpur Crime) उघडकीस आणले असून या प्रकरणी चार जणांना पंढरपूर तालुका पोलिसांनी अटक केली आहे
नवजात बालकाला कुठेतरी निर्जन रस्त्यावर फेकून देण्याच्या अनेक घटना घडत असतात. अनैतिक संबंधातून जन्मलेल्या निष्पाप बाळावर हमखास अशी दुर्दैवी वेळ येत असते. अशीच एक घटना पंढरपूर तालुक्यात नारायण चिंचोली येथे समोर आली होती आणि नवजात बाळाच्या मदतीला देव धावून आल्याप्रमाणे घटना घडली. पंढरपूर - मोहोळ रस्त्यावर असलेल्या नारायण चिंचोली या गावाजवळ साईराज ढाब्याच्या समोरच्या बाजूला अंधाराचा फायदा घेऊन नुकत्याच जन्मलेल्या बाळाला रस्त्याच्या मध्यभागी ठेवून मातृत्वाला कलंक असलेली कुणी माता अथवा अनितिक पिता निघून गेल्याचे समोर आले होते.
अंधाराचा रस्ता आणि रस्त्याच्या मध्यभागी ठेवलेल्या या बाळाला एखादे वाहन सहज चिरडून गेले असते पण ज्याला देव तारतो त्याला मारणार तरी कोण ? फुलचिंचोली येथील अविनाश नागनाथ वसेकर हे रात्री साडे दहा वाजण्याच्या दरम्यान चार चाकी गाडीने मायाक्का चिंचणी येथे दर्शनासाठी निघाले होते. अचानक त्यांना रस्त्यावर काही दिसले. वसेकर यांनी लगेच गाडी बाजूला घेऊन थांबवली आणि मोबाईलच्या बॅटरीच्या प्रकाशझोतात त्यांनी जवळ जाऊन पहिले असता नुकतेच जन्मलेले एक पुरुष जातीचे बालक त्यांना दिसले. साधारण एक ते दोन तासापूर्वीच या बालकाचा जन्म झाला असावा. वसेकर यांनी आजूबाजूला कानोसा घेतला पण त्यांना कुणीच दिसले नाही. एकूण परिस्थिती पाहून वसेकर याना घडलेल्या प्रकाराचा अंदाज आला. त्यांनी बालकाला कपड्यात गुंडाळून अलगद बाजूला घेतले.
वसेकर यांनी नारायण चिंचोली येथील त्यांच्या परिचयाचे असलेले महेश गुंड याना याबाबत माहिती दिली आणि त्या ठिकाणी बोलावून घेतले. महेश गुंड आणि चार पाच गावकरी लगेच त्या ठिकाणी आले. त्यांनी मिळून या बालकाला उपचारासाठी पंढरपूर येथील रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांना याची माहिती दिली होती. अंधारात रस्त्यावर फेकेलेल्या बाळाला मात्र वसेकर यांच्यामुळे एक दोन तासात दुसरा जन्म मिळाला होता. हा प्रकार करणारे कोण असावेत याचा काहीच अंदाज नव्हता परंतु मरण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी ठेवलेल्या नवजात बालकाला वसेकर यांच्यामुळे मात्र जीवदान मिळाले होते. (Accused of throwing a newborn baby arrested) पोलिसांनी आता 'त्या' नराधमांच्या मुसक्याही आवळल्या आहेत.
चार जणांना अटक !
या घटनेबाबत पोलीस तपास करीत होते आणि त्यांच्या या तपासात या संपूर्ण प्रकरणाचे सत्य बाहेर आले असून पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. सदर बाळाला जन्म देणारी माता, रिक्षाचालक, मुलीचा भाऊ, आई वडील यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे निदर्शनास आल्याने पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी या सर्वावर गुन्हा दाखल केला आहे.
अल्पवयीन माता !
सदर बाळाची आई ही अल्पवयीन असल्याची माहिती आता समोर आली असून या प्रकरणातील सगळेच रहस्य बाहेर येवू लागले आहे. सदर अल्पवयीन मुलीसोबत तिघांनी वेळोवेळी शारीरिक संबध ठेवले होते आणि त्यातून जन्माला आलेल्या अपत्याला रस्त्याच्या मध्यभागी फेकून देण्याचे आणखी एक पाप करण्यात आले होते. नवजात बाळाला फेकून दिल्याचे प्रकरण समोर आले तेंव्हाच हा गुन्हा अनैतिक संबंधातून घडला असण्याची शक्यता व्यक्त होत होती परंतु जन्म देणारी माता ही अल्पवयीन असल्याचे आता समोर आले आहे.
गुन्हा दाखल !
पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून किरण उर्फ भैय्या शशिकांत दावणे, दत्ता परमेश्वर खरे या दोघांना पोलिसांनी याप्रकरणी अटक केली असून तिसऱ्या एका तरुणाचा शोध पोलीस घेत आहेत. सदर तिघांनी अल्पवयीन मुलीसोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते आणि त्यातून अपत्य जन्माला आले होते.
नक्की पिता कोण ?
अल्पवयीन मुलीशी तिघांनी वारंवार शारीरिक संबध प्रस्थापित केले होते त्यामुळे जन्मलेल्या आणि रस्त्यावर फेकलेल्या बाळाचा बाप नक्की कोण हे तपासण्यासाठी दोन नाराधामांसह चौघांचे डीएनए तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर या घटनेवर अधिक प्रकाश पडणार आहे.
.
पोलिसांचे कौतुक !
अल्पवयीन मुलीशी तिघांनी शारीरिक संबध प्रस्थापित करून नंतर जन्मलेले अपत्य रस्त्यावर फेकून देण्याचे पाप करीत आपले पाप लपविण्याचा केलेला प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला असून घटनेच्या मुळापर्यंत पोलीस पोहोचले. कसलाही धागादोरा नसताना पोलिसांनी अवघ्या काही दिवसात नराधमांच्या मुसक्या आवळल्या त्यामुळे पंढरपूर तालुका पोलिसांचे कौतुक होत आहे.
देखील वाचा :>>

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !