BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ मार्च, २०२२

झाली सुटका ...... कोरोनाचे निर्बंध ३१ मार्चपासून हटविले !

 



नवी दिल्ली : कोरोनाच्या चौथ्या लाटेची चर्चा सुरु असतानाच मोठी दिलासादायक बातमी आली असून ३१ मार्चपासून कोरोना संबंधित सगळे  निर्बंध हटविण्याचा निर्णय (Corona restrictions removed) केंद्र सरकारने घेतला आहे.


कोरोनाची चौथी लाट येणार असल्याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु झाली आहे त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना धडकी भरवत असताना केंद्र सरकारने आज सर्वात मोठा दिलासा दिला आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचे निर्बंध, नियम, संचारबंदी, जमावबंदी अशा विळख्यात प्रत्येकजण गुदमरून गेला आहे. विविध नियम आणि निर्बंध यामुळे आर्थिक चक्रे कोरोनाच्या गाळात एवढी रुतून बसली आहेत की ती आता सहजगत्या बाहेर काढता येणार नाहीत. तिसरी लाट आली आणि फारसा उपद्रव न देता परतीच्या मार्गाला लागली त्यामुळे दिलासा मिळाला असतानाच आता निर्बंधाच्या जाचातून देखील मुक्तता मिळू लागली आहे. 


कोरोनाची चौथी लाट येण्याची चर्चा सुरु झाल्याने पुन्हा निर्बंधाचे फास आवळले जाण्याची मोठी भीती होतीच शिवाय सद्या कोरोनाचे आस्तित्व नगण्य असल्यामुळे निर्बंध हटविले जावेत अशी मागणीही पुढे येत होती. त्यातच आज केंद्र शासनाने हा दिलासा दिला आहे.  देशातून कोरोना आता हद्दपार होत असून दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या दोन हजारापेक्षाही कमी आली आहे त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठीच्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदी रद्द केल्या आहेत. (Corona restrictions lifted by central government) त्यामुळे आता मोठा दिलासा लाभणार आहे


निर्बंधातून मुक्तता !

येत्या ३१ मार्चपासून कोरोना संबंधित सर्व निर्बंध हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे देशवासियांना खूप मोठा दिलासा लाभणार आहे.  दोन वर्षापूर्वी म्हणजे २४ मार्च २०२० रोजी देशात कोरोना संबंधित निर्बंध लागू करण्यात आले होते. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत अनेक मार्गदर्शक तत्वे केंद्राने लागू केली होती आणि  त्याची अंमलबजावणी आजही सुरूच आहे. 


दोन निर्बंध कायम !

३१ मार्च पासून कोरोना संबंधित निर्बंध हटविण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी मास्क वापरणे आणि  परस्परातील अंतर ठेवणे हे दोन नियम कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे मास्क वापरापासून सुटका होणार नाही. (Masks and social distance required) सदर दोन नियम पाळावेच लागणार आहेत. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्या मतानुसार मार्च २०२० मध्ये लागू केलेल्या कोरोना नियमांची मुदत ३१ मार्च रोजी संपत असून त्यानंतर गृह मंत्रालयाकडून कोरोना संदर्भात कोणतेही नवे आदेश जारी करण्यात येणार नाहीत.   


राज्यांना पत्र !

केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना याबाबत पत्र लिहिले असून यापुढे डीएम कायद्यातील तरतुदी लागू करण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले गेले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत विविध मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आलेली होती आणि वेळोवेळी त्यात बदल करण्यात आले होते. कोरोनाला सामोरे जाण्यासाठी आवश्यक योग्य वर्तनाबाबत आता सामान्य जनताही अत्यंत जागरूक आहे, जागतिक महामारीच्या घटत असलेल्या उद्रेकाची परिस्थिती आणि शासनाची तयारी लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने यापुढे कायद्यातील तरतुदी लागू करण्याची आवश्यकता नसल्याचा निर्णय घेतला आहे.  


 हे देखील वाचा  :>>



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !