BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ फेब्रु, २०२२

काना मात्रा नसलेला एक विनोदी नट होता !





शरद तळवलकर.. काना, मात्रा, उकार अथवा वेलांटी नसलेलं साधं सरळ नाव. असं नाव तसं दुर्मिळच नाही का!  नाव जसं साधं सरळ तसा हा कलावंतही तितकाच साधा आणि सरळ... आयुष्यभर सामान्यपण जपत आलेला.. म्हणूनच त्यांच्याकडं असामान्यत्व आलं आणि ते कायम राहीलं. जुन्या पिढीतील बहुतेक कलावंत असेच हाेते.. आधी माणूस आणि नंतर कलावंत. आजकाल कलावंत भरपूर आहेत पण कलावंत असेलेली माणसं तशी दुर्मिळ झाली आहेत. माणूस कलावंत हाेऊ शकताे पण कलावंत हा ‘माणूस’ असेलच असं अलिकडच्या काळात सांगता येत नाही. 


एखादा चित्रपट केला आणि ताे आपटला तरी सुपरस्टारच्या थाटात वावरणारे आणि आपल्याच हाताने आपली पाठ थाेपटून घेणारे अनेक तथाकथित कलावंत पहायला मिळतात. पूर्वीच्या काळी कलावंत आधी 'माणूस' असायचा. निळू फुले,वसंत शिंदे, राम नगरकर, अरूण सरनाईक, राजा गाेसावी, दिनानाथ टाकळकर अशी कितीतरी नावं सांगता येतील. शरद तळवलकरही याच ओळीत बसणारे कलावंत. मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीत आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला तरी त्याची जाणीव त्यांना झाल्याचेही कधी दिसले नाही. शरद तळवलकर हे जुन्या पिढीतले कलावंत असले तरीही नव्या पिढीतही त्यांची तेवढीच प्रभावी ओळख आहे. नुसतं त्यांचं नाव घेतलं तर आजच्या तरूणांच्या चेहऱ्यावरही हास्य फुलतं. बस्स.. अजून कसली पावती हवी? विेनाेदी अभिनेता म्हणून त्यांची ओळख अजरामर राहीलच पण त्यांच्यातला माणूसपणाची ओळखही तितकीच टवटवीत राहणार आहे.



शरद तळवलकरांनी 180 पेक्षा अधिक चित्रपट केले आणि 45 पेक्षा अधिक नाटकांतून त्यांनी भूमीका केल्या. तळवलकर हे बालपणापासूनच कलेच्या विश्वात रमत हाेते. पुण्याच्या भावे हायस्कूलमध्ये शिकतानाच त्यांनी नाटकांतून कामं करायला सुरूवात केली हाेती आणि पुढे महाविद्यालयीन जीवनात त्यांनी नाटकांच्या दिग्दर्शनालाही सुरूवात केली. हा तरूण कलावंत वेगवेगळे प्रयाेग करीत कलाक्षेत्रात काहीतरी नाविन्य साधण्याचा प्रयत्न करीत असतानाच केशवराव दाते हे तळवलकरांच्या ‘टॅलेंट’वर प्रभावित झाले. दाते यांनी त्यांना 1938 साली नाट्य विकास कंपनीसाठी तळवलकरांची निवड केली आणि सुरू झाला एका विनाेदी अभिनेत्याचा प्रवास... 


हा प्रवास पुढे अखेरपर्यंत सुरू राहीला आणि मराठी चित्रपटाला एक ताजातवाना सक्षम कलावंत मिळाला.1952 साली त्यांचा ‘अखेर जमलं’ हा चित्रपट आला आणि ताे हिटही झाला. राजा गाेसावी आणि शरद तळवलकरांची जाेडी या चित्रपटात जमून आली आणि मराठी चित्रपटांना दाेन विनाेदी अभिनेत्यांची जाेडगाेळीच मिळाली. पुढे या जाेडीने एकापेक्षा एक धम्माल चित्रपट दिले. ब्लॅक व्हाईटच्या जमान्यातही रूपेरी पडद्यावर चमचम करणाऱ्या या कलावंताचा‘अवघाचि संसार’ हा त्यांचा पहिला रंगीत चित्रपट! भांगेची गाेळी ही अनेकांच्या आयुष्याचं मातेरं करते पण हीच भांगेची एक गाेळी तळवलकरांना ‘शरद तळवलकर’ बनऊन गेली आहे. सुशिक्षीत सुसंस्कृत घरात वाढलेले तळवलकर स्वत: कष्ट करून एम.ए. झाले हाेते. पुढं विद्यापीठात नाैकरीही करू लागले. बॅ. जयकरांचं सहकार्य त्यांना मिळालं त्यामुळं ते नाैकरी आणि नाटकांचे प्रयाेग सांभाळत राहीले. 


बॅ. जयकरांच्या नंतर मात्र तळवलकरांना अधिकारी जाणीवपूर्वक छळू लागले. सतत अडचणीत आणू लागले, एवढंच काय, तळवलकरांचं आकाशवाणीतलं कामही बंद करायला भाग पाडलं. एकीकडे भरपूर कामं मिळू लागली हाेती तर दुसरीकडं अधिकारी त्रास देत हाेते त्यामुळं नाेकरी साेडावी की अभिनय साेडून द्यावा असं व्दंव्द तळवलकरांच्या मनात सुरू झालं. नाेकरी साेडण्याचा निर्णय घेतला पण अनेकांनी त्याला विराेध केला. थाेडे दिवस सहन केलं तर पुढे रजिस्ट्रारची जागा त्यांना मिळणार हाेती. असं असलं तरी तळवलकरांना त्यापेक्षा अभिनय अधिक महत्वाचा वाटत हाेता. त्यांनी अखेर नाेकरी साेडायचा विचार केला. नाेकरीचा राजीनामा देण्याचे पक्के करूनच ते कार्यालयाकडे निघाले. विचार तर पक्का झालेला हाेता पण ऐनवेळी ताे विचार बदलला जाईल याची भीतीही त्यांना वाटून गेली. 


राजीनामा देण्याचा निर्णय काेणत्याही क्षणी बदलला जाऊ नये म्हणून तळवलकरांनी चक्क भांगेची एक गाेळी खाल्ली. कार्यालयात आल्यावर त्यांनी एक कागद घेतला आणि राजीनामा लिहीला. समाेर अनेक प्रश्न हाेते परंतू भांगेच्या गाेळीने आपले काम केले आणि त्यांनी राजीनामा देऊन राेजच्या छळातून आपली सुटका करून घेतली. भांगेच्या एका गाेळीमुळे राेजच्या कटकटीत अडकलेल्या तळवलकरांची मुक्तता झाली आणि नवा प्रवास वेगाने सुरू झाला. भांगेच्या या गाेळीनेच आपल्याला ‘शरद तळवलकर’ बनविल्याचं ते नेहमी सांगत राहीले आणि त्या गाेळीचे आभारही मानत राहीले.



‘एकच प्याला’, ‘लग्नाची बेडी’, ‘घराेघरी हीच बाेंब’, ‘सखी शेजारीणी’ अशा सुमारे 45 नाटकांतून त्यांनी एकापेक्षा एक सरस भूमीका सादर केल्या. ‘एकच प्याला’ मधील त्यांचा ‘तळीराम’ इतका सहजसुंदर व्हायचा की, पाहणाèयाला आपण नाटक पाहताेय याची जाणीवही हाेत नव्हती. पहिल्या अंकातील त्यांच्या पहिल्या प्रवेशावेळी ते दारूबराेबर घेण्यासाठी साेड्याची बाटली अशी काही उघडायचे की प्रेक्षक या कृतीलाही टाळ्या द्यायचे. चित्रपटांत तर काय, पडद्यावर त्यांचा प्रवेश झाला तरी प्रेक्षक हसतात. त्यांच्या विनाेदी इमेजचा मात्र त्यांना गंभीर भूमीकांत त्रासही झाला. तळवलकर म्हणजे विनाेदीच भूमीका करणार हे समीकरण दृढ झालेलं हाेतं. तळवलकरांचा चेहरा गंभीर असला तरी प्रेक्षकांना त्यात विनाेदच सापडायचा त्याला बिच्चारे तळवलकर तरी काय करणार? ‘लेक चालली सासरला’ हा गंभीर चित्रपट आला आणि त्यात तळवलकरांनी गंभीर स्वरूपाची भूमीका केली. मुलीच्या लग्नाची जमवाजमव करीत असताना वरपक्षाला अपेक्षित असणारा हुंडा ऐकून तळवलकरांच्या घशाला काेरड पडते आणि ते पाणी मागतात. 


असा हा करूण प्रसंग असतानाही तळवलकरांची इमेज इथं आडवी आली आणि त्याची खंत तळवलकरांना कायम राहीली. अत्यंत केविलवाणे हाेऊन ते ‘मला जरा पाणी देता का..’ असं म्हणतात. त्यातून त्यांना कारूण्य दाखवायचं हाेतं पण चित्रपटगृहात या वाक्याला प्रेक्षकांतून हशाच येत राहीला. तळवलकरांच्या ताेंडी ते वाक्य हाेतं त्यामुळं प्रेक्षकांनी ते विनाेदी अंगानं घेतलं आणि प्रसंगातलं सगळं गांभिर्यच निघून गेलं. स्वत: तळवलकरांनी अनेकदा याबाबत खंत व्यक्त केली हाेती.



जवळपास 180 चित्रपट करणाèया शरद तळवलकरांना नांव मिळालं, ‘एकटी’, ‘मुंबईचा जावई’,‘जावई विकत घेणे आहे’, ‘रंगल्या रात्री अशा’, ‘धुमधडाका’,‘लेक चालली सासरला’, ‘तू तिथं मी’ अशा अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिकांसाठी अवाॅर्डही मिळाले. चित्रपटसृष्टीतलं एक माेठं नाव म्हणून शरद तळवलकरांचं नाव घेतलं जातं तसं ‘माणूस’ म्हणूनही त्यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं. 


1991 च्या दरम्यान मी एका दैनिकांसाठी ' तो क्षण' हे एक सदर लिहीत हाेताे. त्यासाठी मी तळवलकरांच्या घरी गेलाे. पुण्यातलं असलं तरी फ्लॅटसंस्कृतीतलं त्यांचं घर नव्हतं. थेट आतपर्यंत जाईपर्यंत काेणी अडवलं नाही की काेणी हटकलं नाही. दारावरची बेल वाजवताच छाेटीशी मुलगी आली आणि तिनं दार उघडलं.. तळवलकर हे आजारी आहेत असं तिच्याकडून समजलं. मी परत फिरलाे तेवढ्यात त्या मुलीनं थांबवलं.. घरातल्या संस्काराचं एक वेगळं दर्शन या मुलीपासूनच पहायला मिळालं. मुलगी पळत आत गेली आणि तळवलकरांना माझ्या येण्याची सूचना दिली. त्यांचा निराेप घेऊन ती आली आणि मला तळवलकरांच्या बेडरूमपर्यंत घेऊन गेली. 


शरद तळवलकर जास्तच आजारी हाेते. त्यांनी हातानंच खूण करून मला बेडवरच बसण्याची खूण केली. आपण येऊन त्यांना त्रास द्यायला नकाे हाेता असं वाटून गेलं. थांबत अडखळत कसेतरी तळवलकर म्हणाले, ‘बाेलायला लागलाे की माझ्या उलट्या हाेत आहेत. तुम्ही दाेन दिवस पुण्यात थांबणार असाल तर आपण उद्या परवा गप्पा मारू. लगेच परत जाणार असाल तर उठून बसताे’ मला संकाेचल्यासारखं झालं. मी पुण्यात थांबणार आहे असं सांगितलं. तेवढ्यात ती लहान मुलगी पुन्हा चहा घेऊन आली. चहासाेबत मी तळवलकरांचा निराेपही घेतला. घरात संस्कार आणि माणसांत माणुसकी पहायला मिळाली हाेती. तळवलकर मला निराेप पाठऊनही परत पाठऊ शकत हाेते. त्यांनी तसं केलं नाही, आजारी असतानाही आणि त्रास हाेत असतानाही माझ्याशी बाेलण्याची तयारी त्यांनी दाखविली हाेती. चित्रपटक्षेत्रात एवढं नाव आणि प्रसिध्दी मिळालेल्या या कलावंतास तशी माझी काहीच गरज नव्हती पण ते जेवढे माेठे हाेते तेवढे नम्र हाेते. त्यांच्या कलेपेक्षाही त्यांचं मन अधिक माेठं आणि विशाल हाेतं हे जाणवलं.



पुण्यातलं जाेशी अभ्यंकर हत्याकांड प्रचंड गाजलं हाेतं. या हत्याकांडाबाबत ऐकून वाचून महाराष्ट्राचं काळीज थरारलं हाेतं. ज्यांचा काही संबंध नाही त्यांनाही याचं अत्यंत दु:ख झालं हाेतं. घरच्या मंडळींचं दु:ख तर शब्दात बांधता येण्याजाेगं नव्हतं. हे दु:खी झालेलं कुटुंब म्हणजे श्री आणि साै. अभ्यंकर कुठंतरी मन रमवावं म्हणून तळवलकरांचं नाटक पहायला आले हाेते. प्रयाेग संपल्यावर अभ्यंकर तळवलकरांना भेटले आणि आपलं हरवलेलं चैतन्य तुमच्या विनाेदी अभिनयानं परत मिळालं, घटनेपासून आपल्या पत्नीच्या चेहऱ्यावर आज पहिल्यांदाच हसू पाहिलं असं त्यांनी सांगितलं. तळवलकरांच्यातला माणूस पाझरला. अक्षरक्ष: तळवलकर गहीवरले हाेते, कृतकृत्य झाल्याची भावना त्यांची झाली हाेती. 


तळवलकर चित्रपट नाटकांतून काम करताना आपल्या साेबत असलेल्या नवख्या कलावंतालाही कधी आपलं माेठेपण दिसू देत नव्हते. रंगमंचावर तर बराेबरच्या कलावंताला सांभाळून घेण्याचे असे कितीतरी प्रसंग त्यांच्यावर आले पण त्यांनी कलावंतापेक्षा आपल्यातल्या माणूसपणाचेच दर्शन दिले. एकदा ‘एकच प्याला’ करताना त्यांच्यावर असाच प्रसंग आला हाेता. ते तळीरामाची भूमीका करीत हाेते. या नाटकात तळीराम आणि भगीरथ यांचा मिळून एक प्रवेश आहे. तळीराम दारूचे महत्व पटऊन देत असताे आणि भगीरथ शिक्षणाचे महत्व पटऊन देत असताे. व्यावसायिक नाटकांत अशा प्रयाेगावेळी अनेकदा ऐनवेळी म्हणजे अगदी रंगमंचावरच दाेन कलावंतांची भेट हाेत हाेती. इथंही तसंच झालं हाेतं. 


एकच प्याला नाटकातील 'तो' प्रवेश सुरू झाला, तळीरामाच्या भूमीकेतील शरद तळवलकरांनी आपले संवाद सुरू केले, ‘म्हणे सुटत नाही... एकदा घेतली म्हणजे सुटत नाही म्हणे...’ तळवलकरांचे संपूर्ण संवाद बाेलून झाले पण भगीरथ पुढे काहीच बाेलेना.. तळवलकरांनाही काही कळेना. ‘अहाे बाेला ना भगीरथ.. तुम्ही असे गप्प का..?’ असेही तळवलकर म्हणाले पण ताे काही केल्या बाेलेना आणि नाटक काही पुढे जाईना.. शेवटी भगीरथाने तळवलकरांच्या कानात काही सांगितले आणि तळवलकर म्हणाले, ‘असं आहे हाेय.. बरं बरं.. मी सांगताे ना..’ असं म्हणत त्यांनी पुन्हा दारूचे महत्व सांगायला सुरूवात केली.. पुढे भगीरथ काहीच बाेलत नव्हता, आपले संवाद संपले की, तळवलकर म्हणायचे, ‘आता मी असं म्हणलं की तुम्ही म्हणणार..’ असं म्हणत भगीरथाचेही संवाद तळवलकरच म्हणायचे आणि पुढं त्याचे उत्तरही तेच द्यायचे. तळवलकरांनी असं करीत संपूर्ण प्रवेश संपवला...  


भगीरथाचे काम करणाèया कलावंतानं तळवलकरांच्या कानात सांगितलं हाेतं, ‘ अहाे मी काय बाेलणार? भगीरथाचं काम करणारा कलावंत ऐनवेळी आलेला नाही, मॅनेजरनं मला इथं नुसतं जाऊन बसा म्हणून सांगितलंय..’ तळवलकरांनी समजायचं ते समजून घेतलं आणि संपूर्ण प्रवेश एकट्यानं सादर केला. प्रेक्षकांना काहीच कळलं नाही, पुढं तळवलकरांनीच हे एका मुलाखतीत सांगितलं तेंव्हा याची उकल झाली.



1 नाेव्हेंबर 1918 राेजी अहमदनगर जिल्ह्यात जन्मलेला हा विनाेदाचा तारा वयाच्या 82 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेला पण रूपेरी पडद्यावरून त्यांची प्रतिमा कधीही पुसली जाणार नाही. त्यांना जाऊन काही वर्षे उलटली तरी त्यांच्या जाण्याची यत्किंचितही जाणीव हाेत नाही.. शरद तळवलकर..  एक कलाकार आणि एक सच्चा माणूस...! एक पर्वच क्षितीजाआड गेलं.. अगदी कायमचं..!!

- अशाेक गाेडगे 


हे देखील वाचा :> 

******


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !