BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ फेब्रु, २०२२

यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीतही भरणार शाळा !

 




सोलापूर ; कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रदीर्घ काळ शाळा बंद राहिल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले असून यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत देखील शाळा भरविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. 


कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून शाळांचे दरवाजे बंदच राहिले आहेत. कोरोनाची तीव्रता कमी होऊ लागताच शासनाने शाळा सुरु करायचा निर्णय घेतला पण स्थानिक प्रशासनावर अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी सोपवली होती. त्यातच तिसरी लाट आली आणि अनेक शाळा बंद झाल्या. अनेक जिल्ह्यातील शाळांची घंटा तर वाजलीच नाही. जवळपास दोन वर्षापासून शाळांचे दरवाजे बंद राहिले आहेत. शाळा लवकर सुरु व्हाव्यात ही विद्यार्थ्यांची इच्छा आणि मागणी असली तरी पालकातून मात्र दोलायमान अवस्था दिसून येत आहे. शाळा सुरु करण्याच्या हालचाली पुन्हा सुरु झाल्या तेंव्हा अनेक शाळातील शिक्षक कोरोनाबाधित आढळून आले त्यामुळे तर पालकातून अधिकच चिंता व्यक्त करण्यात आली. कोरोनाच्या या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे न भरून निघणारे नुकसान झालेलेच आहे. 


कोरोनाचे आक्रमण झाल्यापासून म्हणजे २३ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ६०० दिवस शाळा बंदच राहिल्या आहेत. ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय स्वीकारण्यात आला पण लाखो विद्यार्थायांकडे स्मार्ट फोन नसल्यामुळे त्यांना या शिक्षणापासूनही वंचित राहण्याची वेळ आली. शाळांना कुलूप लागल्याने अनेक विद्यार्थ्यांना शाळेचा विसर पडला आहे आणि शाळेची ओढ देखील कमी झाली आहे. सद्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत पण विद्यार्थ्यांची संख्या अत्यंत कमी प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेकडे आकर्षित करण्यासाठी ऐन उन्हाळ्यात शाळा सुरु ठेवण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत.  


उन्हाळ्याचे दिवस आता सुरु झाले असून विद्यार्थी उन्हाळ्यातील नियोजन करीत असतानाचा शिक्षण विभाग मात्र उन्हाळ्याच्या सुट्टीच्या काळात शाळा भरविण्याचा विचार करीत आहे. २ मे पासून १३ जूनपर्यंत उन्हाळ्याची सुट्टी आहे. या सुट्टीच्या काळात काही तास तरी शाळा सुरु ठेवण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत.  अलीकडेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी आणि रविवारीही शाळा सुरु ठेवण्याबाबत भाष्य केले आहे. शनिवारी आणि रविवारी शाळा सुरु ठेवण्याचे देखील नियोजन केले जात असून त्याआधी शिक्षक संघटना आणि शिक्षक आमदार यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे आणि त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे अशी माहिती मिळत आहे. 


कोरोनाच्या कालावधीत बहुतेक दिवस शाळा बंदच राहिल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. शिक्षक संघटनांना विश्वासात घेऊन शिक्षकांच्या मदतीने सुट्टीच्या काळात देखील शाळा सुरु ठेवण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी देखील सांगितले आहे.  विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी पूर्वपदावर आणून त्यांच्यात शिक्षणाविषयी गोडी निर्माण करण्याच्या दृष्टीने उपचारात्मक अध्यापनावर भर दिला जाणार असून शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत पूर्ण दिवस नसल्या तरी काही तासांसाठी शाळा सुरु करण्याचे नियोजन असून तशा प्रकारच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.  




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !