BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२० फेब्रु, २०२३

चुलत्याने केला चार वर्षांच्या पुतणीचा अमानुष खून !


शोध न्यूज : सख्ख्या चुलात्यानेच चार वर्षाच्या पुतणीचा खून करून, 'होय, तुझ्या पोरीला खल्लास करून मीच नदीत फेकलेय' अशा शब्दात कबुली दिल्याची अत्यंत धक्कादायक आणि अमानवी घटना सोलापूर जिल्ह्यात घडली असून या घटनेने प्रचंड खळबळ उडवून दिली आहे.

 

'सख्खे भाऊ पक्के वैरी' असल्याचा अनेकदा अनुभव येत असतो. भाऊबंदकीचा वाद हा बहुतांश वेळी संपत्ती, वाटणी, शेतजमीन याच्यासाठीच असतो आणि यातून सख्खे भाऊ देखील एकमेकांच्या जीवावर उठत असतात. सोलापूर जिल्ह्यातील  मोहोळ  तालुक्यात मात्र यापेक्षाही धक्कादायक घटना घडली असून शेतजमिनीच्या वादातून सख्ख्या भावाच्या अवघ्या चार वर्षाच्या गोजिरवाण्या मुलीला मारून नदीत फेकून देण्यात आले आहे आणि भावाने चौकशी केली असता निर्ढावलेपणे त्याची कबुलीही दिली आहे. मोहोळ तालुक्यातील डिकसळ येथील यशोदीप शिवाजी धावणे आणि यशोधन शिवाजी धावणे या दोन सख्ख्या भावात शेतजमिनीचा वाद होता. त्याच्या आईच्या नावावर असलेल्या जमिनीसाठी दोघात वाद होता. यशोदीप हा आईच्या नावावर असलेली जमीन माझ्या नावावर करून द्या म्हणून सतत वाद घालत होता. त्यातून तो घरात सतत भांडत होता आणि जमीन आपल्या नावावर होत नसल्याने तो चिडून होता. या भावातील वादात गावकऱ्यानी देखील मध्यस्थी केली होती आणि आपसातील वाद आपसात मिटविण्याचा प्रयत्न देखील केला होता. पण यशोदीपच्या डोक्यातील राग आणि जमिनीचा तुकडा काही केल्या जात नव्हता. यातूनच त्याने हे अमानवी कृत्य केले. 


आईच्या नावावरील जमीन तुम्हा  पतीपत्नीमुळेच मला मिळत नाही, त्यामुळे तुमच्या वंशजालाच जिवंत राहू देत नाही अशी धमकी देखील यशोदीप याने दिली होती. जमिनीसाठी त्याच्या डोक्यात काही वेगळेच कारस्थान शिजत होते. दोघांत भांडण झाले आणि त्यानंतर यशोधन आणि त्यांची पत्नी हे चार वर्षाची ज्ञानदा यशोधन धावणे या चिमुकल्या मुलीला घरात झोपवून शेतात निघून गेले होते. शेतातील काम आटोपून ते परत आले तेंव्हा त्यांना ज्ञानदा घरात दिसली नाही त्यामुळे पती पत्नी घाबरून गेले आणि त्यांनी ज्ञानदाची शोधाशोध सुरु केली. शोध घेत असतांनाच त्यांनी सख्खा भाऊ यशोदीप याला मुलीबाबत विचारले. फोन करून 'ज्ञानदाला कुठे पहिले का ?' असे विचारले असता, ' होय, मी तिला जीवे मारून मलिकपेठ येथील सीना नदीच्या पात्रात फेकून दिले आहे' असे सांगितले. त्याचे हे निर्ढावलेले बोल ऐकून ज्ञानदाच्या आई वडिलांना जबर धक्काच बसला.


 यशोधन आणि त्यांच्या पत्नीच्या पायाखालील जमीन सरकली. त्यांनी धावत जाऊन सीना नदीत पहिले असता खरोखरच ज्ञानदाचा मृतदेह नदीच्या पात्रात तरंगत असल्याचे दिसले. हे भयानक चित्र पाहून पती पत्नीने हंबरडा फोडला  चार वर्षे वयाच्या आपल्या पुतणीचा खरोखरच खून केला असल्याचे चित्र समोर दिसत होते आणि पती पत्नीच्या डोक्यावरील आभाळ फाटून गेले होते. (Uncle killed four-year-old girl due to farm land dispute) त्यांनी ज्ञानदाचा मृतदेह उचलून मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात आणला, डॉक्टरांनी तपासून पहिले पण ज्ञानदाच्या शरीरातून प्राणपक्षी केंव्हाच उडून गेला होता. याप्रकरणी मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपासाला लागले आहेत पण सख्ख्या भावाच्या या अमानवी कृत्याने प्रत्येक जण हादरून गेला आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !