BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२० डिसें, २०२१

चेष्टेचा विषय बनलेल्या अभिनेते गणपत पाटील यांचा आक्रोश !

 






एखादा बायकी माणूस असला की त्याला 'गणपत पाटील' म्हणून हिणवायचे ! गणपत पाटील हे नाव खेडोपाडी आणि वाडी वस्त्यावर पोहोचलेलं आहे. ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटाच्या जमान्यातील हा कलावंत आपल्या भूमिकेत प्रचंड यशस्वी झाला होता. या कलावंताएवढे यश अन्य कुठल्या कलाकाराला मिळाले असल्यास ते विरळाच ठरणार आहे. प्रचंड यश मिळालेला हा कलावंत मात्र आयुष्यभर चेष्टेचाच विषय बनून राहिला आणि केवळ दुःखच त्यांच्या वाट्याला आले. 'आता गं बया' म्हणत या कलावंतानं मराठी प्रेक्षकांची उदंड करमणूक केली पण त्यांच्या नशिबी केवळ आणि केवळ उपेक्षेचं जगणं आलं. समाजात, पै पाहुण्यात सन्मानाऐवजी अवमानच होत गेला. प्रचंड प्रतिभेचा एक कलावंत म्हणून त्यांच्याकडे पाहण्यापेक्षा केवळ एक 'नाच्या' म्हणूनच पाहिलं गेलं .. अगदी अखेरपर्यंत !


१९५० ते १९७० अशा कालखंडात तमाशा हेच ग्रामीण महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख बनलेली होती. साहजिकच याचे प्रतिबिंब मराठी चित्रपटात उमटले आणि ही तीन दशके मराठी चित्रपट हा तमाशापट बनून गेला होता. तमाशा आणि लावणी हे दोन विषय महाराष्ट्राच्या आवडीचे बनलेले होते. लावणी आणि तमाशा म्हटलं की त्यात 'नाच्या' हा महत्त्वाचाच घटक ! याच्याशिवाय तमाशा केवळ अशक्य ! याच नाच्याची भूमिका स्वीकारली गणपत पाटील नावाच्या उमद्या कलावंतानं ! गणपत पाटील यांच्याशिवाय मराठी चित्रपट झालाच नाही आणि गणपत पाटील असल्याशिवाय मराठी रसिकांना चित्रपट पाहिल्याचं समाधान मिळणं शक्यही नव्हतं ! त्यांनी पडद्यावर 'आत्ता गं बया' म्हटल्याशिवाय प्रेक्षकांना आनंद मिळत नव्हता. हे बोलताना त्यांची असणारी  लकब आजतागायत कुठल्याही कलाकाराजवळ असल्याचे समोर आले नाही.


या प्रचंड ताकदीच्या कलाकाराला मात्र संपूर्ण जीवन एका वेदनेत काढावं लागलं ! धिप्पाड शरीरयष्टी असलेल्या या कलावंताला महाराष्ट्रानं कधी पुरुष मानलंच नाही पण त्यांच्या कुटुंबालाही याची झालं पोहोचली.  कोल्हापूरच्या गरीब घरात जन्माला आलेल्या गणपत पाटील यांचे वडील लहानपणीच वारले. गणपत पाटील आणि त्यांच्या इतर सहा भावांची जबाबदारी एकट्या आईवर आली. एवढया जणांचं कुटुंब चालवणं एकट्या आईला अशक्य होत होतं. आईला हातभार लागावा म्हणून गणपत पाटील यांनी भाज्या विकासापासून मोलमजुरीपर्यंत सगळी कामं करायला सुरुवात केली. पण हे करीत असताना त्यांच्यात अभिनयाचं विलक्षण वेड होतं. त्याकाळात कोल्हापुरात मेळे सादर व्हायचे आणि या मेळ्यांमधून ते रामायणातील सीतेची भूमिका करायचे. त्यातून वयाच्या १४ व्या वर्षीच त्यांना 'बाल ध्रुव' या मराठी चित्रपटात भूमिका करण्याची संधी मिळाली. रुपेरी पडद्यावरचा हा प्रवेश पुढे दमदार होत गेला. छोट्या मोठ्या भूमिका साकारतानाच त्या काळातील सुपरस्टार असलेले अभिनेते राजा गोसावी यांच्याशी त्यांचा परिचय झाला. राजा गोसावी यांच्या माध्यमातून मा. विनायक यांच्या शालिनी सिनेटोनमधून त्यांचा चित्रसृष्टीत प्रवेश झाला. असे असले तरी त्यांना लगेच पडद्यावर येत आले नाही. सुतारकाम, मेकअप करणे अशी कामं त्यांना शालिनी सिनेटोन मध्ये करावी लागत होती. हा सडपातळ दिसणारा तरुण उद्याचा महाराष्टाचा 'गणपत पाटील' असणार आहे याची चाहूलही कुणाला नव्हती. अभिनयाव्यतिरिक्त इतर कामे करीत करीत त्यांचा अनेक व्यक्तींशी परिचय होत गेला. त्यातच राजा परांजपे यांच्याशीही परिचय झाला आणि त्यांनी गणपत पाटील याना काही चित्रपटातून संधी दिली. 

राम गबाले, राजा परांजपे यांच्या चित्रपटात काम मिळाल्याचे अनेकांचे लक्ष गणपत पाटील यांच्याकडे गेले होते आणि त्यांचे काम पाहिल्यावर भालजी पेंढारकर यांच्यासारख्या मोठ्या माणसाने गणपतला आपल्या 'मीठ भाकर' 'संख्या सजना' या चित्रपटातून काम दिले. या भूमिका चित्रपटात महत्वाच्या होत्या. गणपत पाटील याना चित्रपटातून कामे मिळू लागली होती पण त्या तुलनेत कमाई काहीच नव्हती. घरच्या परिस्थितीमुळे त्यांना चार पैसे कमावणे हे अधिक महत्वाचे होते. त्यामुळे मेकअपची कामे त्यांनी सुरूच ठेवली होती आणि सोबत नाटकातूनही ते भूमिका करीत होते. हे करीत असताना 'ऐका हो ऐका' आणि 'जाळीमंदी पिकली करवंदं' या दोन नाटकातून गणपत पाटील यांनी तृतीयपंथी सोंगाड्या साकारला. त्यांची बायकी लकब उभ्या महाराष्ट्रानं डोक्यावर घेतली.  अभिनयासह आवाज, बायकी चाल, विनोदाचे टायमिंग असं सगळंच काही अगदी परफेक्ट होतं.  मराठी प्रेक्षक त्यांच्यावर प्रचंड खुश होते आणि याच भूमिकांनी त्यांना महाराष्ट्राचा 'गणपत पाटील' म्हणून ओळख दिली. मराठी चित्रपट आणि गणपत पाटील हे पुढे समीकरणच बनलं. चित्रपटही अन्य कलाकार कुणीही असो, चित्रपटात गणपत पाटील असणारच !


पोटासाठी चित्रपटात आलेल्या गणपत पाटील याना महाराष्ट्र ओळखू लागला आणि अनेक पुरस्काराचे ते मानकरी ठरले. 'वाघ्या मुरळी' या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या तृतीयपंथी भूमिकेसाठी त्यांना उत्कृष्ठ चरित्र अभिनेत्याचा पुरस्कार प्राप्त झाला. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा 'चित्रभूषण' पुरस्कार याना मिळाला. 'झी मराठी' ने त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं.  राज्यभर गाजलेल्या सगळ्याच चित्रपटातून गणपत पाटील झळकत राहिले. अनंत माने यांनी दिग्दर्शित केलेला 'लावण्यवती' (१९९३)  हा मात्र त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला !   महाराष्ट्रानं त्यांच्या भूमिका डोक्यावर घेतल्या, त्यांचा अभिनय अद्वितीय होता आणि मराठी प्रेक्षकांनी तो स्वीकारला होता. 'नाच्या' ही भूमिका दुसऱ्या कुणीही केली असती तरी प्रेक्षकांनी ती स्वीकारलीच नसती एवढे प्रेम त्यांच्या या नाच्यावर महाराष्ट्रानं केलं पण ---! हा 'पण' खूप मोठा आहे. त्यांच्या भूमिकेवर उदंड प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रानं त्यांना खाजगी जीवन जगताना दिल्या त्या केवळ यातना आणि भोगायला लावलं केवळ दुःख ! कलावंत म्हणून नव्हे तर एक तृतीयपंथी, नाच्या अशाच नजरेनं त्यांच्याकडं पाहिलं गेलं !


गणपत पाटील यांच्या  भूमिका आणि अभिनयाची छापच एवढी पडली होती की गणपत पाटील नावाचा हा कलावंत पुरुष आहे हेच लोक विसरून गेले होते. यामुळे त्यांना स्वतःचं लग्न जमवणंही कठीण झालं होतं. प्रचंड अडचणीतून कसेतरी त्यांचे लग्न झाले पण पुढे त्यांच्या कुटुंबाच्या नशिबी वेदना आणि यातनाच आल्या. त्यांच्या दोन मुलं  आणि दोन मुलींच्या लग्नाच्या वेळीदेखील हीच समस्या समोर आली आणि गणपत पाटील सतत अपमानाचे धनी झाले. गणपत पाटील यांच्या मनात अपमानाची ही सल कायम होती आणि त्यांच्या अखेरपर्यंत ती राहिलीही ! ही सल त्यांना किती बोचत होती हे त्यांच्याच एका मुलाखतीमधून बाहेर आले. दूरदर्शनवरील एका मुलाखतीच्या वेळी त्यांचा बांध फुटला आणि त्यांनी या वेदनांना डोळ्यातून वाट मोकळी करून दिली होती. सन्मानाऐवजी या कलावंताला समाजाने उपेक्षेचे जीवन दिले होते. अवमान, उपेक्षा, टिंगल असं सगळं काही त्यांच्या झोळीत टाकलं गेलं होतं ! एका कलावंताच्या नशिबी कशा वेदना येतात हे समाजाला कधी दिसलं नाही. अलीकडच्या काळात 'नटरंग' चित्रपट आल्यानंतर त्या चित्रपटातील 'नाच्या' च्या वेदना मराठी प्रेक्षकांनी पहिल्या त्यामुळं याची जाणीव समाजाला काही प्रमाणात झाली पण गणपत पाटील हे केवळ चेष्टेचे विषय बनून राहिले आणि जगलेही ! 


मुलाखतीत बोलता बोलता गणपत पाटील गंभीर झाले होते, त्यांच्या मुलीच्या लग्नाचा प्रसंग आणि त्यानिमित्त झालेले अपमान त्यांच्या ओठावर आले होते. ते म्हणाले, ' लोक म्हणत, या माणसाला मुलगी कशी असू शकते ? यांची मुलगी करायला आमच्या अकलेचे दिवाळे निघाले आहेत काय ? यांच्या घरचीच तिकडून काही भानगड असणार आहे, आम्हाला माहित नाही का या मुलीचे वडील "हे " आहेत ते ! आम्हाला समाजात तोंड दाखवायचे आहे. आम्हाला अब्रू आहे, समाजात आमचे नाव आहे, पत आहे. यांच्यासारखे आमचे टाळी वाजवून थोडेच भागणार आहे ! लोक असेच बोलत राहायचे आणि प्रयेकवेळी माझ्या पत्नीच्या भावनांचा बांध फुटत असायचा. पुरती कोलमडून गेली होती ती ! मुलांच्या लग्नावेळीही हेच अनुभवाला आलं. फार वाईट वागणूक दिली या समाजानं .. माज्या अभिनयाची शिक्षा माझ्या बायको पोरांना भोगावी लागली आणि ते सगळीकडे चेष्टेचे विषय बनले" आणि पुन्हा हा कलंदर कलावंत हमसून हमसून रडत राहीला.        


      - अशोक गोडगे        




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !