'शहेनशाह' अमिताभ
महानायक अमिताभ बच्चन ! पडद्यावरचा हा 'अँग्री यंग मॅन'... ८० वर्षांचा सळसळता तरुण ! या वयातही ते ना थांबता, न थकता काम आणि कामच करीत आहेत. ते ८० वर्षाचे झाले यावर कुणाचा तरी विश्वास बसतोय काय ?
महानायक अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात अनेक आणि तीव्र चढउतार आले. तसं पाहिलं तर सगळ्यांच्याच आयुष्यात चढ उतार असतात पण अमिताभ यांच्या जीवनातील चढउतार अगदीच जगावेगळे ठरले आहेत. 'कुली' चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी त्यांना झालेला अपघात हा त्यांच्या आयुष्यातील अखेरचा श्वास घ्यायला लावणारा ठरला होता पण सुदैवाने ते बचावले, नव्हे, मृत्यूशी ते लढले आणि जिंकलेही ! कलावंत जितका मोठा त्यापेक्षा अमिताभ 'माणूस' म्हणून अधिक मोठा आहे. एखाद्या गरजवंताला लाखो रुपयेही ते मोकळ्या मनाने देऊन टाकतात आणि त्याचा 'ढोल' कुठेही वाजवत नाहीत. आत्तापर्यंत करोडो रुपये त्यांनी असेच अडल्या नडल्याना वाटून टाकले आहेत पण हाच बिग बी एके काळी रुपया रुपयाला महाग झाला होता.
पडद्यावर 'शहेनशाह' असलेले अमिताभ यांच्यावर अशी वेळ आली की ते दिवाळखोरीत निघाले, त्यांच्या बँकेच्या पुस्तकात शून्य रुपयांची शिल्लक होती. त्यावेळची परिस्थिती स्वतः बिग बी यांनीच एकदा २०१७ साली रिलायन्स कंपनीच्या ४० व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात बोलताना सांगितली. हे सांगताना त्यांच्याही डोळ्यात पाणी आले होते. ते म्हणाले होते, ' एक वेळ अशी आली होती की, माझी कंपनी प्रचंड नुकसानीत आली होती, करोडो रुपयांचे कर्ज झाले होते आणि कंपनी दिवाळखोरीत निघाली होती. एका बाजूला कमाई बंद झाली होती तर दुसरीकडे सरकारने घरावर जप्ती आणली होती. चारी बाजूनी कर्जदारांच्या विळख्यात अडकलो होतो. ही माहिती रिलायन्स समूहाचे धीरूभाई अंबानी याना समजली. त्यावेळी त्यांनी काहीही न विचारात त्यांचे कनिष्ठ पुत्र अनिल अंबानी याना बोलावून घेतले आणि सांगितले, 'याच्यावर सद्या वाईट वेळ आहे, काही रक्कम देऊन त्यांना मदत करावी, ते जेवढे पैसे देत होते त्यावर माझ्या सगळ्या अडचणी एका क्षणात संपणार होत्या. त्यांच्या या उदारतेने मी भावूक झालो होतो पण मला वाटले की त्यांच्या या उदारतेच स्वीकार मी करू शकणार नाही. यानंतर काही काळात देवाची माझ्यावर कृपा होऊ लागली आणि मला कामे मिळणे सुरु झाले. त्यानंतर हळू हळू मी साऱ्या कर्जातून मुक्त झालो. '
धीरूभाई अंबानी यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना अमिताभ बच्चन यांनी ही आठवण सांगितली होती आणि हे सांगताना अमिताभ सद्गदित झाले होते. ऐकणाऱ्यांचेही डोळे पाणावले होते आणि काही काळ धीरगंभीर वातावरण निर्माण झाले होते. यावेळी बिग बी म्हणाले, 'धीरूभाई अंबानी यांचे ते शब्द, ते देत असलेल्या रकमेपेक्षा कितीतरी पटीने अधिक होते. माझ्या वाईट वेळेत साथ देण्यासाठी ते पुरेसे होते' अमिताभ बच्चन आपला भूतकाळ सांगत असताना अनिल अंबानी यांच्या डोळ्यातूनही पाणी वाहत होते. ते आपले अश्रू थांबवू शकले नाहीत.
- अशोक गोडगे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !