BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ जाने, २०२२

पंढरपूर पोलिसांनी घेतली तेरा गाढवं ताब्यात !




 
पंढरपूर : कोरोना बंदोबस्त करून दमलेल्या पोलिसांना आता गाढवं देखील सांभाळायची वेळ पुन्हा पुन्हा येऊ लागली असून पंढरपूर पोलिसांनी आणखी तेरा गाढवं पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.   

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे आणि अनेक पोलीस कोरोना बधीतही झाले आहेत. वाढत्या चोऱ्या, अन्य गुन्हेगारी या सगळ्या गोष्टी तर पोलिसांनाच सांभाळाव्या लागत आहेत. त्यात कोरोनाच प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून पोलिसांची झोप उडाली आहे. दिवसरात्र काम करून पोलीस थकून जात आहे पण हे जनतेच्या लक्षातही येत नाही. रस्त्यावर पोलिसांनी हटकले तरी लगेच गल्लीतला पुढारी फोन करतो. कुणीतरी या पोलिसांशी अकारण हुज्जत घालत बसतो. आरोपींना पकडून आणायचं आणि पुढचे सोपस्कार पार पाडायचे हे काम कराव्या लागणाऱ्या पोलिसावर आता गाढवं सांभाळण्याचीही वेळ आली आहे. 

वाळू चोरांनी सगळ्या मर्यादा आधीच सोडल्या आहेत आणि त्यांना पैशाशिवाय काही दिसतही नाही पण त्यांचा ताण पोलिसावर येत आहे. वाळूची वाहने पोलीस आणि महसूल विभाग पकडतो म्हणून गाढवावरून रात्रीच वाळू वाहतूक करून एके ठिकाणी साठा केला जातो आणि तेथून ती वाहनातून भरून विक्री केली जाते. अनेक वर्षापासून गाढवांचे हे प्रकार सुरु आहेत. वाहने पकडली तर ती आणून पोलीस ठाण्यात लावली की पोलीसाना चिंता राहत नाही पण गाढवांना ताब्यात घेणे ही पोलिसांसमोर असलेली एक वेगळीच डोकेदुखी आहे. वाळू चोरी करून वाहतूक करणारी १३ गाढवे पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतली आहेत. 

भीमा नदीच्या पत्रातून वाळू चोरी करताना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने १३ गाढवे पकडली असून त्यांना ताब्यात घेतले आहे. गाढवे ताब्यात घेण्याची पोलिसांची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा असे प्रकार करावे लागले आहेत. शिवाय महिन्यापूर्वीच २३ गाढवांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चार पाच दिवसांपूर्वी पुन्हा चोरट्या वाळू वाहतुकीची ९ गाढवे ताब्यात घेतली होती आणि आता पुन्हा १३ गाढवांना ताब्यात घेण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. चार दिवसात २२ गाढवांना पोलीस ठाण्याचे दर्शन द्यावे लागले आहे. पोलिसांची संख्या मर्यादित आणि वाढती गुन्हेगारी यात आता पोलिसांना गाढवं सांभाळण्याचेही काम वाढू लागले आहे. 

वाळू चोरी करून रात्रीच्या अंधारात गाढवांचा वापर करून ती विक्रीसाठी नेली जाते. अनके गाढवावरून चोरटी वाळू कुठेतरी एका ठिकाणी साठवली जाते आणि तेथून वाहनात भरून विक्री केली जाते. पोलिसांनी वाळू चोरी पकडण्याचे नियोजन केले तरी अंधाराचा फायदा घेत वाळू चोर पळून जातात आणि गाढवांना त्यांच्या पाठीवरील वाळूसह पोलीस ठाण्यात आणावे लागते. पकडलेल्या १३ गाढवांच्या मालकाविरुद्ध पंढरपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पण गाढवांना मात्र सांभाळत बसण्याची वेळ त्यांचावर येत आहे.  








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !