सोलापूर : अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणे आता भलतेच महागात पडणार असून वाहन मालकाला मोठ्या दंडासह थेट तुरुंगवास देखील भोगावा लागणार आहे. त्यामुळे अठरा वर्षाच्या आतील वयाच्या मुलाच्या हातात वाहन देताना शंभरवेळा विचार करावा लागणार आहे.
सगळीकडेच रस्त्याचे रुंदीकरण झाले असून सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार झाल्यापासून वाहनांचा वेग अफाट झाला आहे. अत्यंत वेगाने आणि बेदरकारपणे वाहने चालवली जात आहेत आणि यामुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. या रस्त्यावर दिवसरात्र अनेकांचे प्राण जात आहेत परंतु बेपर्वा वाहन चालविण्यावर कसलीच मर्यादा येताना दिसत नाही. शहरांच्या बाहेर असे अपघात होतच आहेत पण शहरातून देखील अनेक अपघात होत आहेत.
अल्पवयीन मुले शहराच्या रस्त्यावरून वेगवेगळी वाहने चालविताना दिसतात आणि त्यांच्यामुळे शहरातील अपघातांची संख्या देखील वाढताना दिसत आहे. लहान मुलांच्या हातात वाहने देण्यात पालकांना मोठे कौतुक वाटत असते. मुलगा गाडी चालवायला शिकतोय याचे एक अप्रूप पालकांना असते परंतु अठरा वर्षे वयाच्या आत वाहन चालवणे अथवा चालवायला देणे हे कायद्यानेच प्रतिबंधित केलेले आहे याचा विसर पडत असतो.
शाळा महाविद्यालये, शिकवणी वर्ग अशा ठिकाणी जाणाऱ्या- येणाऱ्या मुलांसाठी पालकांकडून वाहन खरेदी केले जाते आणि मुलगा अथवा मुलगी गाडीवर शाळा महाविद्यालयांना जातात याचे कौतुक केले जाते. त्यामुळे रस्त्यावर अनेक अल्पवयीन मुले मुली वाहने चालवताना दिसतात. या लहान मुलांना वाहतुकीच्या नियमांची कल्पना नसते त्यामुळे त्यांच्याकडून वाहतुकीच्या नियमांचे पालन होण्याची शक्यता आजिबात नसते. या अल्पवयीन मुलामुलींमुळे अपघात होऊन इतरांचा प्राण जाण्याची शक्यता मात्र सतत असते. केवळ दुचाकींचा नव्हे तर अनेक अल्पवयीन मुले शहरातून रिक्षा चालवताना देखील दिसतात. या रिक्षा वेडीवाकडी वळणे घेत रस्त्यावरून भरधाव धावत असतात. अल्पवयीन मी मुलांच्या वाहन चालविण्यामुळे अपघाताची टांगती तालावर सतत डोक्यावर असते.
लहान मुलांच्या वाहन चालविण्यावर कुणाचे नियंत्रण नसते हे अनेकदा दिसून येते. वाहतूक पोलीस प्रशासनाने मात्र आता कारवाई सुरु केली असून वाहन मालकांना आता चांगलाच चाप लागणार आहे. अठरा वर्षे वय पूर्ण झाल्याशिवाय वाहन चालविण्याचा परवाना देखील मिळत नाही परंतु रस्त्यावर अनेक अल्पवयीन मुले वाहने चालविताना दिसत असतात. असे चित्र दिसले तर आता मोठ्या दंडाला आणि तुरुंगवासाला देखील सामोरे जावे लागणार आहे. अठरा वर्षे वयापेक्षा कमी असलेल्या वयाच्या मुलाने अथवा मुलीने वाहन चालविल्यास पाच हजार रुपये दंड तर भरावाच लागणार आहे, शिवाय ज्या वाहन मालकाने आपले वाहन या अल्पवयीन मुलाच्या हातात दिले आहे अशा वाहन मालकास तीन महिने तुरुंगात देखील जावे लागणार आहे.
अठरा वर्षे वयाच्या आतील मुलाच्या अथवा मुलीच्या हातात वाहन देऊ नये असे आवाहन वाहतूक पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. विनापरवाना अल्पवयीन मुले वाहने चालवताना रस्त्यावर दिसतात परंतु याला आता चांगलाच लगाम लागण्याची शक्यता आहे. (Imprisonment for giving vehicle in hands of minors) पाच हजार दंड आणि वाहन मालकास तीन महिन्याचा तुरुंगवास भोगावा लागण्याची शक्यता आहे त्यामुळे लहान मुलांच्या अथवा मुलींच्या हाती वाहन देताना पालकांना विचार करावा लागणार आहे. या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहन मालकास मात्र मोठा फटका बसणार आहे .


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !