मंगळवेढा : हॉटेलचे बिल देण्याचे नाटक करीत हॉटेल मालकाचाच महागडा मोबाईल चोरून तो निसटला पण पोलिसांनी अवघ्या ४८ तासांच्या आत मोबाईलसह या चोराच्याही मुसक्या आवळल्या आहेत.
अलीकडे दुचाकी चोरी बरोबरच मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. खिशातून तर मोबाईल चोरले जातच आहेत पण रस्त्यावरून मोबाईलवर बोलताना देखील दुचाकीवरून येऊन मोबाईल हिसकावून नेण्याच्या घटना घडत आहेत. मंगळवेढा येथे मात्र अशी वेगळीच घटना घडली पण चोराच्या चांगलीच अंगलट आली. हॉटेलचे बिल देण्याचे नाटक करत तब्बल २२ हजार रुपये किमतीचा एक मोबाईल उच्च शिक्षित चोराने चोरून नेला पण महागडा मोबाईल मिळाल्याचा त्याचा आनंद फार काळ टिकला नाही.
मंगळवेढा येथील 'हॉटेल सुगरण' येथे ही मोबाईल चोरीची घटना घडली होती. हॉटेलमधील गर्दी कमी झाल्याचे पाहून हॉटेल मालक राहुल अशोक खांडेकर (सप्तशृंगी नगर, मंगळवेढा) हे जेवण करण्यासाठी बाजूला जाऊन बसले होते. यावेळी त्यांनी त्यांचा रेडमी मोबाईल हॉटेल काउंटरवर चार्जिंगसाठी लावलेला होता. खांडेकर हे जेवण करून परत काउंटरजवळ आले असता आपला मोबाईल जागेवर नसल्याचे त्यांना दिसले. त्यांचा मोबाईल हा २२ हजार रुपये किमतीचा असल्याने त्यांनी तातडीने मंगळवेढा पोलिसांशी संपर्क साधला आणि मोबाईल चोरीची तक्रार दिली.
पोलिसांनी तातडीने अत्यंत कौशल्याने लगेच तपास सूरु केला आणि अवघ्या ४८ तासांच्या आत चोरासह मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले. मूळचा गुजरात येथील परंतु सद्या पुणे येथे राहणाऱ्या स्वप्नील सुरेश सिदवाडकर या ३३ वर्षीय आरोपीस अटक करण्यात आली. सदर आरोपी हा उच्चशिक्षित असून पुण्याच्या आय टी कंपनीत नोकरी करीत आहे. त्याने या हॉटेलमध्ये जेवणाचे बिल देण्याचे नाटक करून खांडेकर यांचा चार्जिंगला लावलेला २२ हजार रुपये किमतीचा रेडमी मोबाईल हातोहात लांबवला होता पण पोलिसांनी त्याला हातोहात पकडला आणि गजाआड केला आहे. अत्यंत जलद गतीने तपास केल्याबद्धल मंगळवेढा पोलिसांचे कौतुक होऊ लागले आहे.
उच्चशिक्षित आणि आय टी कंपनीत नोकरी करणाऱ्या या स्वप्नील सिदवाडकर याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत आणि चोरीचा महागडा मोबाईल जप्त केला आहे पण या सिदवाडकर याने यापूर्वी देखील अशाच प्रकारच्या आणखी काही चोऱ्या केल्या आहेत काय याचाही आता पोलीस शोध घेत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !