BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१७ जाने, २०२३

पंढरपूर - मिरज मार्गावरील दरोड्यातील टोळी जेरबंद !



पंढरपूर -  मिरज मार्गावर वाहने अडवून लुटमार करणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली असून अलीकडेच एक लुटीची घटना घडली होती.

 

पंढरपूर मिरज मार्गावर वाहतूक वाढलेली असली तरी रात्रीच्या वेळेस या महामार्गावरील काही भाग हा धोक्याचा मानला जातो. रात्रीच्या वेळेस धावती वाहने अडवून लुटल्याच्या अनेक घटना घडल्या असल्यामुळे या मार्गावरील रात्रीचा प्रवास करणे अनेकजण टाळतही असतात परंतु अत्यावश्यक काम असणारे अथवा या रस्त्यावर घडत असलेल्या घटनांबाबत माहिती नसलेले काहीजण हमखास फसतात. पंधरा दिवसांपूर्वीच या मार्गावर कुची गावाच्या जवळ एक चारचाकी वाहन अडवून चाकूचा धाक दाखवत रोख रक्कम आणि दागिने असा जवळपास दोन लाखांचा ऐवज लुटून नेला होता. 


रात्रीच्या वेळी गाडी अडवून घातलेल्या या दरोड्याच्या घटनेपासून तर हा मार्ग रात्रीच्या प्रवासाला अत्यंत धोकादायक मानला जाऊ लागला होता. या रस्त्यावर पूर्वीपासूनच असे प्रकार घडतात परंतु अलीकडे हा रस्ता रुंद आणि चकाचक झाल्यापासून रात्रीची वाहतूक देखील वाढली आहे आणि निर्जन परिसरात वाहने अडवली तर आजूबाजूलाही काही मदत मिळू शकत नाही असे परिसर अनेक ठिकाणी आहेत त्यामुळे चोरट्यांचा धोका वाढलेला आहे. रस्त्याच्या दुतर्फा लोकवसाहत नाही आणि रस्त्याच्या वळणाच्या दरम्यान चोरते दाबा धरून बसलेले असतात. मध्यरात्रीनंतर या रस्त्यावर वाहतूक कमी झाल्यावर चोरीचा हा धोका अधिक वाढतो. मध्यरात्रीपासून पहाटेच्या वेळेपर्यंत या मार्गावर अशा घटना घडण्याची अधिक शक्यता असते.


कोल्हापूर येथील माधवी जनार्दन जानकर, भाग्यश्री पाटील तसेच त्यांच्यासोबत अन्य काही जण ३० डिसेंबर रोजी पंढरपूरकडे निघालेले होते. अठठावीस वर्षे वयाच्या भाग्यश्री पाटील  या गाडी चालवत होत्या. मिरजवरून पंढरपूरच्या दिशेने निघाल्यानंतर कुची गावाच्या परिसरात आल्यावर पहाटेच्या दरम्यान एका ढाब्याच्याजवळ त्यांच्या वाहनावर दगड मारण्यात आला. यावेळी भाग्यश्री पाटील यांनी आपली गाडी रस्त्याचा कडेला घेवून थांबवली. गाडी थांबतच क्षणात पाच चोरटे गाडीजवळ आले आणि त्यातील दोघांनी चाकूचा धाक दाखवत दहशत निर्माण केली. रोख रक्कम, मोबाईल आणि चांदीचे दागिने असा १ लाख ९१ हजाराचा ऐवज या चोरट्यांनी हस्तगत केला. विशेष म्हणजे गाडीतील दोघांनी या चोरट्यांशी झटापट देखील केली पण ते यात जखमी झाले होते. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झालीच परंतु रस्त्यावरून जाण्यास देखील भीती वाटू लागली होती.


पहाटेच्या वेळी रस्त्यावर पडलेल्या या दरोड्यातील आरोपी जेरबंद करणे हे पोलिसांपुढे एक आव्हान होते परंतु स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने चोरट्यांचा छडा लावला आहे. मिरज तालुक्यातील लिंगनूर येथील जलवा उर्फ त्रिदेव सिसफूल भोसले याला बेड्या ठोकण्यात आल्या असून त्याचे चार साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे या दरोड्याचा तपास होता त्यामुळे या पथकाने माहिती काढली असता जलवा भोसले आणि त्याच्या साथीदाराने हा दरोडा घातला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी लिंगनूर येथे छापा टाकून एकाला ताब्यात घेतले पण त्याचे साथीदार मात्र फरार झाले आहेत. पकडलेल्या आरोपीकडून चोरीतला मोबाईल मिळून आला असून पोलिसांनी तो ताब्यात घेतला आहे. 


दरोडा प्रकरणातील पाचही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून यातील जलवा भोसले याच्याविरुद्ध सांगली जिल्ह्यातील तासगाव आणि पुणे जिल्ह्यातील रांजणगाव पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल आहेत. (Robbery on Pandharpur - Miraj road, robber arrested) फरार झालेल्या त्याच्या साथीदारांच्या नावावर देखील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या टोळीचा छडा लागल्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा लाभला असला तरी या मार्गावरून रात्रीच्या वेळेस प्रवास करणे हे धोक्याचे बनलेले आहे. 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !